Sunday, November 30, 2025

समर ऑफ '25

दरवर्षी जून च्या पहिल्या आठवड्यात भारतात आयपीएल चा धांगडधिंगा संपल्यावर जगभर क्रिकेटचा नवीन मोसम सुरु होतो आणि त्याची सुरुवात इंग्लंड मध्ये होते. गेल्या WTC च्या स्पर्धेत भारताचा मायभूमी वर न्युझिलंड कडून लाजिरवाणा परभव झाल्यावर आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 1-3 अशी मात खाल्ल्यावर जानेवारी ते मे या पाच महिन्यात भारतीय क्रिकेट मध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. मार्च मध्ये भारताने न्युझिलंड ला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मग रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त झाला पाठोपाठ विराट कोहली ने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. खरं पाहता दोघे किमान इंग्लंड च्या दौऱ्यावर जातील आणि मग निवृत्ती जाहीर करतील अशी सर्वांना अपेक्षा होती मात्र, दोघांची पाठोपाठ निवृत्ती हा भारतीय क्रिकेट रसिकांना एक प्रकार चा मानसिक धक्का होता.

अखेर इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समिती ची बैठक पार पडली.
कोणाला संधी द्यावी, कोणाला वगळावे अशी चर्चा करत करत करूण नायर ला आठ वर्षांनी कसोटी संघात स्थान मिळाले, पण मग श्रेयस अय्यर मागे राहिला. मोहम्मद शमी दुखपती मुळे निवडीस पात्र झाला नाही बुमराह, सिराज, रेड्डी, आकाशदीप, अर्शदीप, प्रसिध कृष्णा अशी वेगवान गोलंदाजी ची फळी निवडली. कुलदीप, जडेजा, वॉशिंगटन सुंदर हे फिरकीपटू घेतले. पंत आणि जुरेल यष्टीरक्षक निवडले. रोहित आणि विराट यांच्या निवृत्ती ने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. दोघांनंतर आता कोणाकडे भारताच्या कसोटी संघांचे नेतृत्व सोपवायचे हा प्रश्न निर्माण झाला. यात सर्वात आघाडीवर असलेल्या जसप्रीत बुमराह याने फिटनेस चे कारण देत कसोटीतून कर्णधार पदाच्या शर्यतीतून माघार घेतली. रिषभ पंत, के एल राहुल यांच्या नावाचा विचार झाला पण अखेर शुभमन गिल च्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली. त्यावर मीडिया आणि क्रिकेट रसिकांमध्ये अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. कसोटी संघात ज्याचे स्थान निश्चित नाही त्याला कसा कर्णधार केला वगैरे.. 

दुसरीकडे इंग्लंड मध्ये ECB ने भारत इंग्लंड कसोटी मालिकेचे पतौडी ट्रॉफी बदलून त्याला अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी नाव देण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. त्यावरून हीं क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चा झाल्या. अखेर सचिन तेंडुलकर यांनी मध्यस्थी करून मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूला पतौडी यांच्या नावाने एक मेडल द्यावे असा प्रस्ताव मांडला, जो ECB ने मान्य केला.. आणि सगळे काही मागे सारून अखेर कसोटी मालिकेला लीड्स येथे सुरुवात झाली...

पहिली कसोटी | लीड्स | 20 ते 24 जून 2025:

इंग्लंड ने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.. इंग्लिश वातावरणात यशस्वी जैस्वाल आणि के एल राहुल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. जैस्वाल चा हा पहिलाच इंग्लंड दौरा असल्याने सगळ्यांचे लक्ष त्याच्या कामगिरी कडे होते. त्यानेही दौऱ्याची सुरुवात धडाक्यात केली. पहिल्याच डावात शतकी खेळी करत त्याने इंग्लंड च्या क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले. कर्णधार शुभमन गिल ने हीं आपल्या कर्णधार म्हणून पहिल्या डावात शतक झळकावत 147 धावा केल्या. त्याला उपकर्णधार आणि यष्टीरक्षक रिषभ पंत च्या ही शतकाची उत्तम साथ मिळाली पंत ने 134 धावा केल्या. तळाच्या फलंदाजंनी हाराकिरी केल्याने 3 बाद 430 वरून सर्वबाद 471 असा भारताचा डाव गडगडला. इंग्लंड ने त्यांच्या पहिल्या डावात ओली पोप च्या 106 आणि हॅरी ब्रुक च्या 99 धावांच्या जोरावर 465 धावा केल्या व भारताला 6 धावाची नाममात्र आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात के एल राहुल च्या 137 आणि पंत च्या 118 धावाच्या खेळी ने 364 धावा केल्या. रिषभ पंत हा एकच कसोटी च्या दोन्ही डावात शतक करणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज बनला. इंग्लंड ला विजयासाठी 371 धावांचे आवाहन मिळाले. बेन डकेट च्या 149 आणि जो रूट, झाक क्रॉली च्या अर्धशतकाने इंग्लंड ने तो सामना 5 विकेट राखून सहज जिंकला.
इंग्लंड 1 - 0 भारत 

दुसरी कसोटी | एजबॅस्टन | 2 ते  6 जूलै  2025:

371 धावांचे मोठे आवाहन देऊन ही पराभव झाल्याने भारतीय संघात काहीशी खंत होती. ते अपयश मागे टाकत भारतीय संघ एजबॅस्टन ला पोहोचला. बुमराह तीनच कसोटी खेळणार असल्याने तो या कसोटीत खेळला नाही इंग्लंड ने या वेळीही टॉस जिंकून भारताला पुन्हा पहिल्यांदा फलंदाजी ला पाचारण केलं. या डावात कर्णधार शुभमन गिल ने आणखी एक पाऊल पुढे टाकत पहिल्या डावात 267 धावांची खेळी केली (हा भारतीय कर्णधाराने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे) त्याला यशस्वी जैस्वाल (87), रविंद्र जडेजा (89), वॉशिंगटन सुंदर (42) यांनी छान साथ दिली. भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्या. इंग्लंड ने त्यांच्या पहिल्या डावात हॅरी ब्रुक (158) आणि जेमी स्मिथ (187) धावाच्या जोरावर 407 धावा केल्या. भारताने 180 धावांची मोठी आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात भारतीय कर्णधार शुभमन गिल ने पुन्हा शतक (161) ठोकले. एका सामन्यात विक्रमी 428 धावा गिल ने केल्या. त्यात जडेजा (69), पंत (65), राहुल (55) च्या साथीने 6 बाद 427 धावा करत इंग्लंड ला 608 धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. इंग्लंड कडून जेमी स्मिथ च्या 88 धावा वगळता फारसा चमकदार खेळ केला नाही. भारताकडून आकाशदीप ने 99 धावात 6 बळी घेत चमकदार कामगिरी केली व इंग्लंड चा डाव 271 धावात गुंडाळला. भारताने सामना 336 धावांनी जिंकला..
इंग्लंड 1 - 1 भारत 

तिसरी कसोटी | लॉर्ड्स | 10 ते 14 जुलै 2025:

दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून गेल्या आठ महिन्यातील पहिला कसोटी जिंकला. लॉर्ड्स च्या कसोटीत इंग्लंड ने प्रथम फलंदाजी करत जो रूट चे शतक (104) जेमी स्मिथ (51), ब्रायडन कार्स (56) यांच्या जोरावर सर्वबाद 387 धावा केल्या. भारताने प्रत्युत्तर देत के एल राहुल (100), रिषभ पंत (74), जडेजा (72) यांच्या खेळी मुळे 387 धावा केल्या आणि पहिल्या डावात दोन्ही संघांनी समान धावा केल्या. अशी घटना कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवव्यांदा घडली. पहिल्या डावात एका वेळी भारताला आघाडी घ्यायची संधी असताना 5 बाद 326 वरून सर्वबाद 387 अशी अवस्था झाल्याने आघाडी घेण्याची नामी संधी भारताने गमावली.
दुसऱ्या डावात वॉशिंगटन सुंदर च्या 22 धावात 4 बळीच्या कामगिरी च्या जोरावर भारताने इंग्लंड चा दुसरा डाव 192 धावात रोखला. शेवटच्या डावात भारताला विजया साठी 193 धावांची गरज असताना चौथ्या दिवस अखेर 4 बाद 58 अशी अवस्था झाली होती. जैस्वाल, गिल, आकाशदीप करुण नायर बाद झाले होते. अखेरच्या दिवशी भारताला 135 धावा तर इंग्लंड ला 6 विकेट आवश्यक होत्या. पाचव्या दिवशी सकाळी रिषभ पंत बाद झाला आणि भारताची 5 बाद 71 अशी अवस्था झाली. उपहारा पर्यंत के एल राहुल, वॉशिंगटन सुंदर आणि नितीशकुमार रेड्डी बाद झाल्याने उपहाराला 8 बाद 112 धावा अशी बिकट अवस्था झाली होती. फक्त रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि महंमद सिराज हेच फलंदाजी ला यायचे शिल्लक राहिले होते. उपाहार ते चहापान या दरम्यान बुमराह आणि जडेजा आणि किल्ला लढवत ठेवला आणि विकेट पडू दिली नाही. चहापानाला अगदी काही वेळ शिल्लक असताना बुमराह ची विकेट पडली आणि चहा पानाला भारताची धावसंख्या 9 बाद 163. भारताला विजयासाठी 30 धावा पाहिजे होत्या आणि इंग्लंड ला फक्त एक विकेट. त्यांचा मुख्य फिरकी गोलंदाज शोएब बशीर जखमी झाला होता आणि बेन स्टोक्स ने जो रूट च्या साथीने मारा सुरु ठेवला होता. चहा पानानंतर सिराज - जडेजा ची जोडी खेळायला उतरली तेव्हा सगळ्यांनी आशा सोडून दिल्या होत्या मात्र जडेजाने एक एक धाव घेत 193 चे लक्ष दृष्टिक्षेपात आणले होते. मात्र काही वेळाने शोएब बशीर पुन्हा गोलंदाजीला आला आणि त्याचा एकच चेंडू सिराज ने डिफेन्ड केला आणि तोच चेंडू अलगद जाऊन विकेट ला लागला आणि भारताने हा सामना 22 धावांनी गमावला.
इंग्लंड 2 - 1 भारत 

चौथी कसोटी | ओल्ड ट्रॅफर्ड | 23 ते 27 जुलै 2025:

लॉर्ड्स वरची तिसरी कसोटी अगदी हाता तोंडाशी येऊन गमावल्या मुळे भारतीय संघ निराश झाला होता. लॉर्ड्स वर 22 धावांनी झालेला पराभव आणि त्याला कारणीभूत ठरलेल्या 32 अवांतर धावा भारतीय संघाला बोचत होत्या. अश्या आशा निराशेच्या गर्तेतून बाहेर पडत दोन्ही संघ मँचेस्टर च्या ओल्ड ट्रॅफर्ड वर दाखल झाले. भारताने सलग चौथी नाणेफेक हरली. इंग्लंड ने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जैस्वाल (58), राहुल (46), पंत (54) अशी कामगिरी ने भारतीय संघाने सर्वबाद 358 धावा केल्या. इंग्लंड ने प्रत्युत्तर देताना जो रूट(150), बेन स्टोक्स (141) आणि ओली पोप (71) धावांच्या जोरावर सर्वबाद 669 धावा केल्या. 2014 नंतर प्रथमच भारतीय गोलंदाजांनी 600 हुन अधिक धावा एका डावात दिल्या होत्या. दुसऱ्या डावात 311 धावांनी पिछाडी वर पडलेल्या भारतीय संघाची अवस्था चौथ्या दिवसाच्या उपाहाराला 2 बाद 1 धाव अशी झाली होती. आणि सामन्यात पूर्ण पाच सत्र शिल्लक होती. इंग्लंड ला विजय केवळ आठ विकेट दूर होता आणि पहिल्या डावात जोफ्रा आर्चर चा चेंडू पायाला लागून रिषभ पंत जायबंदी झाला होता. त्यामुळे जवळपास 3 बाद 1 अशीच काहीशी स्थिती भारतीय संघाची झाली होती. मात्र एका बाजूने के एल राहुल आणि दुसऱ्या बाजूने शुभमन गिल यांनी चौथ्या दिवशी चहा पानापर्यंत आणखी पडझड न होता 2 बाद 86 अशी सावध सुरुवात करुण दिली. चौथ्या दिवस अखेर भारताच्या 2 बाद 150 धावा झाल्या होत्या. आणि संपूर्ण पाचव्या दिवसाचा खेळ शिल्लक होता. पाचव्या दिवशी सकाळी के एल राहुल स्टोक्स च्या झपकन आत येणाऱ्या चेंडू वर पायचित झाला आणि सगळं लक्ष आता कर्णधार शुभमन गिल आणि बाकीच्या फलंदाजांकडे लागून राहिलं. पाचव्या दिवशी उपहाराला शुभमन गिल शतकी खेळी (103) करुन बाद झाला आणि पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट रसिकांना पराभवाचे काळे ढग दिसू लागले. अश्यावेळी जखमी पंत ऐवजी बढती मिळालेला वॉशिंगटन सुंदर आणि संपूर्ण मालिकेत सातत्याने धावा करणारा रविंद्र जडेजा एकत्र आले आणि त्यांनी उपहार ते चहापान हे सत्र एकही विकेट न गमावता खेळून काढले भारताची पिछाडी भरून काढून 11 धावांची आघाडी मिळवली. चौथ्या दिवशी उपहाराच्या आधी पडलेल्या पहिल्या षटकातील दोन विकेट्स नंतर पुढच्या 117 षटकात केवळ दोन विकेट्स पडल्याने इंग्लंड च्या चेहऱ्यावर नैराश्य दिसू लागले होते. पाचव्या दिवसाचा अखेरच्या सत्राचा खेळ सुरु झाला. इंग्लंड जवळपास 125 ओव्हर मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना अक्षरशः पिचून गेले होते. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स ने आपले मुख्य वेगवान गोलंदाज न खेळवता जो रूट आणि हॅरी ब्रुक या कामचलावू स्पिनर ला गोलंदाजी करायला लावली. रविंद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर अनुक्रमे 89 आणि 85 धावांवर नाबाद असताना इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स ने सामना अनिर्णीत संपवण्यासाठी याचना केली. पण दोन्ही फलंदाज शतकाच्या जवळ असल्या कारणाने भारताने तो प्रस्ताव नकारला आणि खेळ कसोटीच्या शेवटच्या तासात गेला. लवकरच हॅरी ब्रुक आणि जो रूट च्या पोपटवाडी बॉलिंग चा फायदा घेत जडेजा आणि सुंदर यांनी आपली कसोटी शतके पूर्ण केली आणि मग दोन्ही संघांनी सामना अनिर्णीत ठेवण्याचा निर्णय घेतला. हा सामना संपेपर्यंत कर्णधार बेन स्टोक्स, जॉफ्रा आर्चर आणि इतर खेळाडूंची इतकी दमछाक झाली की शेवटच्या कसोटी साठी विश्रांती घेतली...
इंग्लंड 2 - 1भारत

पाचवी कसोटी |केनिंग्टन ओव्हल, लंडन | 31 जुलै ते 4 ऑगस्ट 2025:
ओल्ड ट्रॅफर्ड च्या त्या अनिर्णीत सामान्यानंतर दोन्ही संघात मोthe बदल झाले भारताकडून बुमराह, पंत, शार्दूल ठाकूर, अंशुल कंबोज यांच्या ऐवजी प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, करुण नायर आणि आकाशदीप यांना संधी मिळाली. इंग्लंडकडून बेन स्टोक्स, जॉफ्रा आर्चर, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स ऐवजी जेकब बेथेल, ओव्हरटन, ऍटकीन्सन, जोश टंग खेळले. भारताने या मालिकेतील सर्व टॉस हरले आणि पहिल्याच मालिकेत शुभमन गिल च्या नावे नको तो विक्रम झाला. जानेवारी 2025 पासून सलग 16 टॉस भारतीय संघ हरला आहे. असे होण्याची शक्यता केवळ 0.00305% आहे. टॉस जिंकून इंग्लंड ने भारतीय संघाला फलंदाजी साठी निमंत्रित केले. संपूर्ण मालिकेत पहिल्यांदाच गोलंदाजीला पोषक अशी खेळपट्टी ओव्हल च्या मैदानावर बघायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने करुण नायर च्या 57 आणि साई सुदर्शन च्या 38 धावा च्या मदतीने 224 धावा केल्या. गस ऍटकीन्सन ने 33 धावात 5 बळी घेतले. इंग्लंड ने आपल्या पहिल्या डावात क्रॉली (64), ब्रुक (53) च्या साथीने 247 धावा केल्या आणि 23 धावांची आघाडी मिळवली. भारताने दुसऱ्या डावात जैस्वाल (118), नाईट वाचमन आकाशदीप (66), जडेजा (53), सुंदर (53), जुरेल (34) च्या मदतीने 396 धवांचा डोंगर उभा केला आणि मालिकेत पहिल्यांदा बॅझबॉल ला आव्हान मिळाले. तिसऱ्या दिवस अखेर इंग्लंड 1 बाद 50 अश्या स्थितीत होता. बहुतांश क्रिकेट रसिकांना खात्री होती की सामना चौथ्या दिवशी संपणार म्हणून. डकेट आणि पोप ची विकेट पडल्यावर रूट (105) आणि हॅरी ब्रुक (111) यांनी चौथ्या विकेट साठी 195 धावांची भागीदारी केली आणि भारताच्या आशा मावळत चालल्या होत्या. 3 बाद 301 अश्या सुस्थितीत असताना एका क्षणी आकाशदीप चा एक चेंडू भिरकावून लावण्याच्या नादात हॅरी ब्रुक चा झेल सिराज च्या हाती विसवला आणि भारताला चंचुप्रवेश करण्याची संधी मिळाली. पाठोपाठ बेथेल, रूट यांची विकेट पडली. 3 बाद 301 वरून इंग्लंड अचानक 6 बाद 337 धावांवर हेलकावे खात होतं. चौथा दिवस संपण्यासाठी एक तास बाकी असताना अंपायर्स नी खराब लाईट मुळे खेळ थांबवला आणि 20 जून रोजी सुरु झालेली हीं पाच कसोटीची मालिका पाचव्या कसोटीच्या पाचव्या दिवसापर्यंत जाणार हे निश्चित झालं. 2017/18 च्या ऍशेस मालिकेनंतर पहिल्यांदाच सर्व पाच कसोटी सामने पाचव्या दिवसापर्यन्त गेले. पाचव्या दिवशी गोष्ट खूप सोपी होती. इंग्लंड ला जिंकण्यासाठी 35 धावा आणि भारताला 4 विकेट्स... 
पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला आणि प्रसिध कृष्णा च्या पहिल्या दोन चेंडू वर ओव्हरटन ने दोन चौकार मारले. इंग्लंड विजयापासून केवळ 27 धावा दूर. महंमद सिराज ने दुसऱ्या बाजूने मारा सुरु केला आणि षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जेमी स्मिथ ला बाद केलं. भारत विजयापासून केवळ 3 विकेट्स दूर. सिराज ने आपल्या दुसऱ्या षटकात ओव्हरटन ला पायचीत केले. रिव्हयू मध्ये अंपायर्स कॉल ने इंग्लिश चाहते हूर्यो उडवत होते. दरम्यान प्रसिध कृष्णा ने एका षटकात जॉश टंग याला खणखणीत यॉर्कर टाकून इंग्लंड ची अवस्था 9 बाद 357 अशी केली होती. इंग्लंड ला जिंकण्यासाठी आणखी 17 धावा पाहिजे होत्या आणि मालिकेचा निर्णायक क्षण आला. सामन्याच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना इंग्लंड चा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स जायबंदी झाला होता. तरीही राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वोक्स मैदानावर जायबंदी हात घेउन परतला. 17 धावा हव्या असताना ऍटकीन्सन याने सिराज ला षटकार मारला आणि कित्येक भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. पुढच्या षटकात प्रसिध कृष्णाने 4 धावा दिल्या. विजयासाठी 7 धावा हव्या असताना सिराज ने एक परफेक्ट ऑफ स्टंप च्या बुंध्यात यॉर्कर टाकला आणि ऍटकीन्सन बाद झाला. पाचव्या दिवशी भारताने अशक्य असा विजय खेचून आणला.
इंग्लंड 2 - 2 भारत
 2025 साली झालेली हीं मालिका त्यात संपूर्ण 25 दिवस झालेला अत्युच्च पातळी चा खेळ निश्चितच हा समर ऑफ '25 यादगार ठरला. महंमद सिराज सामनावीर तर हॅरी ब्रुक आणि शुभमन गिल हे अनुक्रमे इंग्लंड आणि भारताचे मालिकावीर ठरले. या मालिकेत अनेकांना 2005 च्या ऍशेस मालिकेची तसेच भारताच्या गॅब्बा मैदानावरच्या विजयाची आठवण झाली. 

No comments:

Post a Comment

परीक्षेतील घोळ घोटाळे अन बरंच काही....

12वी इंग्लिश च्या पेपर ला मुलांना सहा गुण मिळणार - बातमी.. प्रश्नपत्रिका च्या ऐवजी model answer छापलं तर हेच करावं लागेल.. पण समजा अशी चूक प...