Wednesday, September 25, 2024

हर्षल नेपच्यून प्लुटो चा बर्म्युडा ट्रँगल आणि मिलेनियल्स (१९८१-१९९५)

जवळ जवळ तीन चार वर्ष झाले रोजच्या अनुभवातून आमचे फ्रेंड फिलॉसोफर आणि गाईड दीपक पंडीत आणि एक साधारण पाचशे एक पत्रिका डोळ्याखालून घातल्यावर माझ्या डोक्यात एक विषय घोळत होता, त्याला आज शब्दबद्ध करत आपल्या समोर या ब्लॉग द्वारे ठेवत आहे. सोशल मीडिया आणि जवळपास सगळीकडे आजकाल आपण जेन-झी, मिलेनियल्स असे शब्द ऐकतो. हा काय प्रकार आहे बुवा म्हणून जरा गुगल महाराजांना विचारणा केली तर त्यांनी आणखी चार नवीन नावांची भर घातली. 

Baby boomers: 1946 ते 1964 

Gen X: 1965 ते 1980 

 Millenials : 1981  ते 1995 

Gen Z: 1996 ते 2010 

थोडक्यात काय तर आपल्या माय मराठीत आजी - आजोबा, आई - वडील, तरुण आणि नवतरूण.. 

आता या झमेल्यात मिलेनियल्स का विशेष आहेत ही समजून घेतल पाहिजे. 1980 ते 1995 ही ती पिढी आहे ज्याने जुन्यातले थोडं अनुभवलं आहे आणि नवीन सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत आहे.. असो.. तो विषय नाही या ब्लॉग चा.. या पिढीचा एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे विवाह. सध्या व्हाट्सअप्प आणि इतर समाज माध्यमावर "विवाह एक समस्या"  हा लेख फार जोरदार फिरतोय. आणि ही समस्या असलेली हीच ती मिलेनियल्स ची पिढी आहे...

टप्प्या टप्प्या ने एकावर एक थर चढवत आपण समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करूया, ज्योतिषीय दृष्टिकोनातून. 

या पिढीची सुरुवातच मुळात 1980-81 साली कन्या राशीत झालेल्या गुरू-शनी युती ने होते... आणि जेव्हा अश्या दोन celestial giants ची युती होते तेव्हा ते दीर्घकालीन परिणाम देतात किंबहुना या पिढीचा पाया base ही कन्या राशीतली गुरू - शनी युती आहे...

(फोटो: गुगल, हर्षल नेपच्यून प्लूटो यावर गुरुवर्य म दा भट यांनी वेगळं पुस्तक लिहिले आहे..)

आता पुढचा थर चढवू.. निसर्ग कुंडलीत सप्तम स्थानात तुळ रास येते आणि या तुळ राशीत प्लूटो 26 नोव्हेंबर 1980 ला एन्ट्री घेतो आणि इथून या पिढीच्या विवाहाचा विषय बिघडायला सुरुवात होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्लूटो चा शोध जरी 1930-31 साली मिथुन राशीत लागला असला आणि आपण वैज्ञानिक दृष्ट्या त्याला ग्रह मानत नसलो तरी आपण आपल्या पूजे मध्ये  यमधर्म म्हणून पूजन करतच होतो आता प्लूटो काही गुरू सारखा दर 12 वर्षानी किंवा शनी सारखा 30 वर्षांनी त्याच राशीत येत नाही.. प्लूटो ला राशीचक्र पूर्ण करायला सरासरी अंदाजे 240 वर्ष लागतात... त्यामुळे प्लूटो तुळ राशीत असणारी ही एकमेव जिवंत पिढी आहे.. साक्षात यम निसर्ग कुंडलीत सप्तम स्थानात आल्याने या पिढीचा विवाहाचा प्रश्न बिकट होत गेलाय..

हा प्लूटो नोव्हेंबर 1983 मध्ये स्वाती नक्षत्रात आणि नोव्हेंबर 1988 मध्ये विशाखा नक्षत्रात येतो आणि 1988 पर्यंत ची पिढी कशीतरी विवाह निभावून नेताना दिसत आहे पण हा विशाखा नक्षत्रातला प्लूटो डिसेंम्बर 1993 पर्यंत आहे आणि ही 1988 ते 1993 बॅच वैवाहिक जीवनात सगळ्यात जास्त त्रस्त आहे... कारण विशाखा हे उग्र नक्षत्र असून ते बऱ्याच अंशी धोकादायक ही आहे.. विशाखा नक्षत्रातले ग्रह बऱ्यापैकी त्रासदायक ठरतात... प्लूटो हा समूहाचा कारक असल्याने 1980 ते 1995 या संपूर्ण पिढीवर त्याचा अंमल आहे...

या पिढीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ही पिढी जरी वैवाहिक आयुष्यात रखडत असली तरी ती अध्यात्माकडे लवकर वळाली आहे म्हणजे आज ही पिढी 30- 45 वयोगटाची असेल तर इतक्या कमी वयात अध्यात्मकडचा ओढा आश्चर्यकारक नक्कीच आहे.. यांच्या आधीच्या पिढीने आधी संसार सुखाचा केला मग हरी हरी करायला मोकळे झाले.. ही पिढी मात्र गृहस्थाश्रमाचा टप्पा बायपास करून एकदम अध्यात्माकडे लवकर जायला बघत आहे.. त्यालाही काही कारण आहे.. नेपचून जो अंतर मनाचा कारक आहे तो या 1980 - 1995 या कालावधीत निसर्ग कुंडलीत नवम जे धर्माचे, नवसंशोधनाचे, नाविन्याचे स्थान आहे अश्या धनु राशीतून गोचर करतोय... तो 1981 ते 1987 मूळ नक्षत्रात, 1987 ते 1993 पूर्वषाढा नक्षत्रात आणि 1993 पासून पुढे उत्तराषाढा नक्षत्रात प्रवास करतोय उच्च आध्यात्मिक अनुभूती देणारा नेपच्यून जेव्हा धर्म स्थानातून प्रवास करतो तेव्हा नकळत पणे त्या पिढीवर याचा प्रभाव पडतो....

या पिढीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही पिढी खूप उच्चशिक्षित आणि तंत्रज्ञान लवकर आत्मसात करणारी आहे.. त्याला कारण या 1981 ते 1995 या काळात हर्षल जो लहरी ग्रह म्हणून कुप्रसिद्ध आहे त्याची दुसरी सकारात्मक बाजू म्हणजे संशोधक वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन कोणतीही गोष्ट तावून सुलाखून अगदी नियमात सिद्ध करून स्वीकारणारा हर्षल ग्रह आहे.. कोणीतरी सांगितलं म्हणून ऐकणाऱ्याला हर्षल ग्रह नव्हे.. हा हर्षल या 1981-1995 या कालावधीत निसर्ग कुंडलीत वृश्चिक आणि नवमतल्या धनु राशीतून प्रवास करतो तो वृश्चिकेत असताना 1984 च्या आसपास जगाला असाध्य अश्याया HIV - AIDS या रोगाची माहिती मिळते पहिला रुग्ण सापडतो. लक्षणे कळतात आणि तो 1987 साली नवमातल्या धनू गेल्यावर सर्वत्र नावीन्याचे धुमारे फुटतात... हा हर्षल 1990 पर्यंत धनु राशीतल्या मूळ नक्षत्रात आहे.. पुढे तो फेब्रुवारी 1993 पर्यंत पूर्वाषाढा नक्षत्रात आणि पुढे आणखी काही काळ उत्तरा नक्षत्रात आहे...

आता वर जे सांगितले आहे ते मोठया तीन ग्रहांचे गोचर आहे .. या तिन्ही ग्रहांचे गोचर या पिढीला आणि त्यांच्यातल्या स्वभाव आणि एकूण विचारसरणी साठी फार महत्त्वाचे आहे. कारण धनु राशीतला हर्षल दर 84 वर्षांनी येतो.. त्यामुळे तश्या पत्रिका मागच्या 100 वर्षातल्या लोकांच्या सापडतील.. पण धनु राशीतल्या नेपच्यून 144 वर्षानी आणि तुळेतला प्लूटो 240 वर्षांनी येत असल्याने असं COMBINATION असणारी ही एकमेव पिढी आहे.. त्यातल्या त्यात 1987 ते 1995 या काळात हर्षल नेपच्यून युती आहे धनु राशीत...

या पिढीची वैवाहिक समस्या का आहे हे समजून घेताना आता विशिष्ट स्थाने आणि ग्रह योग बघितले पाहिजे...

वैवाहिक सौख्याला 2 (कुटुंब), 5 (प्रणय), 7 (विवाह) आणि 11 (लाभ, जोडीदाराचे प्रणय) ही स्थाने कटाक्षाने पाहिली पाहिजेत.. 

कुंडलीतल्या 12 पैकी ही 4 स्थाने या वरच्या तीन ग्रहांनी व्यापली असतील तर 1980- 1995 या कालावधीतली 33% जनता वैवाहीक सुखाला मुकली आहे, मुकते आहे.. कारण रोज जन्माला येणाऱ्या जातकांमध्ये 1980 -1995 या कालावधीत 4/12 म्हणजे 33% मुला मुलींच्या पत्रिकेत हे ग्रह योग या चार स्थानात असणारच आहेत...

आता यापैकी जून 1989 ते जुलै 1991 (लेखक स्वतः याच बॅच चे आहेत) या काळात गुरू शनी प्रतियोगात आहेत फार थोडा काळ असा आहे जानेवारी 1990 ते मे 1990 मध्ये शनी मकरेत आणि गुरू मिथुनेत आणि जून 1990 ते नोव्हेंबर 1990 मध्ये गुरू कर्केत आहे नाहीतर या दोन वर्षात गुरू शनी प्रतियोगात आहे आणि या विशिष्ट कालावधीत जन्मलेली आणि वर सांगितलेल्या चार स्थानात हर्षल नेपच्यून प्लूटो चे ग्रह योग असणारी पिढी अध्यात्माच्या आहारी गेली आहे...

हे मिलेनियल्स (1981- 1995) एवढ्यासाठीच विशेष आहेत कारण ते एकीकडे तंत्रज्ञान नाविन्याचा उपभोग घेतात आणि त्याच वेळी अध्यात्म, मानसिक शांतता, एक प्रकारची ईश्वरप्रतिची आसक्ती याकडे कललेली आहे...

आता या सगळया कचाट्यातून वाचलं कोण??

वर म्हटल्याप्रमाणे फक्त 33% जनताच या गोष्टीची अनुभूती घेत आहे ... मग बाकी 67% जनतेचं काय?

या पिढीच्या पत्रिकेतही हे ग्रह योग आहेत.. पण ते या चार स्थानात नाहीत म्हणून यातून सुटलेत आणखी खोलात जायचं तर या 67% जनतेला विवाह योग्य वयात 2,5,7,11 या विवाह पूरक ग्रहांची दशा सुरू आहे.. यात असेही भाग्यवान आहेत जे एक विवाह मोडून दुसरा विवाह झाला आहे आणि समाधानी आहेत किंवा समाधान मानून घेतलं आहे...

या ग्रहयोगांची खरी झळ कोणाला बसली आहे??

तर या कालावधीत जन्मला आलेले आणि ज्यांना विवाह योग्य वयात (वय वर्ष 21- 40) 6 (रोग, विवाहाचे व्यय स्थान), 8 (मृत्यू स्थान) 9 (धर्म- संशोधन, अध्यात्म) 12 (व्यय स्थान) यांच्या दशा सुरू आहेत. शुक्र-केतू युती, मंगळ-केतू युती चंद्र-शनी युती, चंद्र-हर्षल युती असणारे ते खऱ्या अर्थाने या ग्रह योगात होरपळले गेले आहेत यांना विवाह करायचा नाही, झाला तरी समाधानी नाहीत, मनाला शांतता नाही आणि अक्षरशः भरकटले आहेत, त्यांना हे कळत नाही की इतकं शिकून, सावरून, चांगल्या नोकऱ्या मिळवून ही लग्न का होत नाहीत???लाखो रुपयांचे मल्टी नॅशनल कंपन्यांचे पॅकेज असून ही यांना मुले मिळत नाहीत.. 

आणखी बरेच बारकावे आहेत.. 

सध्या इतकेच भेटू पुन्हा...

- ज्योतिष विशारद हर्षद मोहन चाफळकर, पुणे

मोबाईल : 9765417361

4 comments:



  1. "मस्त विश्लेषण! मिलेनियल्सच्या वैवाहिक अडचणींना ज्योतिषीय दृष्टीकोनातून समजावून सांगितलंय ते खूपच विचारप्रवर्तक आहे. अध्यात्म, तंत्रज्ञान आणि ग्रहयोग यांचा संबंध फारच सुंदरपणे मांडला आहे. अशाच लेखनाची पुढेही उत्सुकता!" 🌟

    ReplyDelete
  2. अतिशय छान पद्धतीने ही माहिती मांडली आहे, आता कळतंय की या पिढीचे लग्नाचे एवढे तक्रारी का आहेत.

    ReplyDelete

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला