अंदाजे जन्म दिनांक व वेळेवरून जन्मवेळ निश्चिती
*
जातकाला जन्मतारीख अंदाजे माहिती होती वेळेचा पत्ता नाही. फक्त जन्म ठिकाण माहिती होते. यावरून त्याची जन्मतारीख व वेळ निश्चित करून कुंडली तयार करता येईल का असा जातकाने प्रश्न विचारला होता. यासाठी मी कोणकोणत्या प्रकारे विचार केला ते पुढील प्रमाणे-
*
जन्मतारीख- दोन जून 1966 (अंदाजे)
वेळ- माहित नाही
जन्मस्थळ- कुडाळ
*
प्रश्न पाहिला दिनांक- 19 एप्रिल 2025
प्रश्न वेळ- 09:45:37
प्रश्न स्थळ- जांभवडे, कुडाळ
*
प्रश्न वेळेचे RP (रुलिंग प्लॅनेटस्)
शुक्र*मंगळ, केतू, गुरु, शनि
शनि राहू युती
*
1966 हे जन्म वर्ष बरोबर आहे की नाही हे ठरविण्यासाठी शनि चा विचार करायचा आहे. शनि जन्मवेळी(1966 साली) मीन राशीत आहे आणि आज गुरू आरपी आहे. म्हणजे जन्म वर्ष बरोबर असण्याची शक्यता आहे.
*
जून महिना बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी रवि बघावा लागेल. जन्मपत्रिकेत रवि वृषभ राशीमध्ये आहे. साधारणपणे 14 मे ते 14 जून या कालखंडात रवि वृषभ राशीत असतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आज सर्वात महत्त्वाचा रुलिंग प्लॅनेट आहे. म्हणजे जून महिना सुद्धा बरोबर असण्याची शक्यता आहे.
*
दोन जून ही जातकाने सांगितलेली तारीख आहे. त्यादिवशी चंद्र वृश्चिक राशीत आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आज रुलिंग प्लॅनेट आहे त्यामुळे दोन जून ही तारीख ही बरोबर मानता येईल.
*
वृश्चिक राशी मध्ये विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा ही तीन नक्षत्रे आहेत. पैकी दोन जून या दिवशी विशाखा नक्षत्र नऊ वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे. आणि त्यानंतर अनुराधा नक्षत्र पूर्ण दिवस आहे. आता विशाखा या नक्षत्राचा स्वामी गुरु आणि अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनि हे दोन्ही ग्रह रुलिंग प्लॅनेट्स मध्ये आहेत पण शनि हा वाराचा स्वामी म्हणून आलेला आहे आणि गुरु हा राशी स्वामी म्हणून आलेला आहे. त्यामुळे विशाखा नक्षत्र निश्चित करावे लागेल. याचा अर्थ या जातकाचा जन्म सकाळी 09:09 पूर्वी झालेला असायला हवा.
*
सूर्योदयापासून 09:09 पर्यंत वृषभ, मिथुन आणि कर्क ही तीन लग्न आहेत. जातकाचे याच्यापैकीच एक लग्न असायला हवे. आता यापैकी वृषभेचा स्वामी शुक्र, मिथुनेचा बुध आणि कर्केचा चंद्र यांच्यापैकी बुध आणि चंद्र हे दोघेही आज आरपी नाहीत. म्हणून शुक्र आज आर पी असल्यामुळे वृषभ लग्नच निश्चित करावे लागेल.
*
यातही वार गुरुवारच धरावा लागेल. सूर्योदयापूर्वी बुधवार होईल आणि बुध आज रुलिंग मध्ये नाही. म्हणून गुरुवारच्या सूर्योदयापासून म्हणजे सहा वाजून एक मिनिटानंतर आणि वृषभ लग्न संपेपर्यंत या जातकाचा जन्म झालेला असायला पाहिजे.
त्यादिवशी पहाटे 04:56 पासून वृषभ लग्न सुरू झालेले आहे.06:56 पर्यंत वृषभ लग्न आहे.
*
आता या वृषभ लग्नामध्ये कृत्तिका रोहिणी आणि मृग ही तीन नक्षत्रे येतात सहा वाजून एक मिनिटानंतर म्हणजेच सूर्योदयानंतर आणि सहा वाजून 28 मिनिटे पर्यंत चंद्राचे नक्षत्र आहे त्यानंतर सहा वाजून 56 मिनिटापर्यंत मंगळाचे नक्षत्र आहे. पण चंद्र हा आज रुलिंग प्लॅनेट नाही. त्यामुळे मंगळाचेच नक्षत्र आपल्याला स्वीकारावे लागेल. म्हणजे या जातकाचा जन्म सकाळी सहा वाजून 28 मिनिटे ते सहा वाजून 56 मिनिटापर्यंतच झाला आहे.
*
आता आपले लग्न निश्चित झाले, लग्नाचा नक्षत्र स्वामी नक्की झाला. आता उपनक्षत्र स्वामी निश्चित करू. या 28 मिनिटांच्या दरम्यान मंगळ, राहू, गुरु आणि शनि हे चारच उपनक्षत्र स्वामी आहेत. राहू हा शनिच्या युतीत असल्यामुळे शनिपेक्षा त्यालाच अधिक महत्त्व द्यायला हवे. राहू हा उपनक्षत्र स्वामी म्हणून स्वीकारला तर जातकाची जन्मवेळ सहा वाजून 32 मिनिटे अशी येईल.
पण त्यामुळे सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी पण राहूच येईल आणि पत्नीचे जन्म नक्षत्र धनिष्ठा आहे. म्हणून या जातकाच्या लग्नाचा उपनक्षत्र स्वामी मंगळ करून घेतला तर सप्तमाचा उपनक्षत्र स्वामीही मंगळ येतो.
आता जातकाच्या कुंडलीच्या लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा जातकाच्या चंद्राच्या समसप्तक योगात आहे. हे एक आणि जातकाच्या सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी मंगळ हा जातकाच्या पत्नीच्या नक्षत्राशी जुळतो म्हणून जन्मवेळ सहा वाजून 31 मिनिटे अशी करावी लागेल.
*
आता त्यांच्या मुलांची माहिती घेऊन त्यानुसार याचे लाभस्थान तपासावे लागेल.
*
प्रथम अपत्य-जन्मतारीख 14 जानेवारी 1991
मूळ नक्षत्र आणि धनु राशी आहे.
*
द्वितीय अपत्य- जन्मदिनांक 01ऑगस्ट 1996
शततारका नक्षत्र आणि कुंभ राशी आहे.
*
पहिला मुलगा त्याचे नक्षत्र मूळ आणि धनु राशी आहे. पहिल्या मुलाचा विचार पुरुष जातकाच्या कुंडलीत लाभस्थानावरून करतात.
लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी बुध आहे. पहिल्या अपत्याचा राशी स्वामी गुरु जातकाच्या कुंडलीत मिथुन राशीत आहे त्यामुळे हा संबंध व्यवस्थित जुळतो
*
मुलीचे शततारका नक्षत्र आणि कुंभ राशी आहे. पुरुष जातकाच्या पत्रिकेत दुसऱ्या अपत्याचा विचार लग्न स्थानावरून करतात. जातकाच्या कुंडलीच्या लग्नाचा उपनक्षत्र स्वामी मंगळ आहे. जातकाच्या कुंडलीत अपत्याचा चंद्रराशी स्वामी शनि आणि मंगळ यांच्यामध्ये त्रिरेकादश योग आहे.
*
जातकाचा विवाह 18 फेब्रुवारी 1990 रोजी झाला. या दिवशी जातकाला बुधाची महादशा केतूची अंतर्दशा आणि राहूची विदशा होती. हे तीनही ग्रह दोन, सात आणि 11 या भावांशी संबंधित आहेत. त्यामुळे ही जन्मवेळ बरोबर आहे असे मानता येईल.
*
या कुंडली वरून जातकाच्या व्यवसायाचा विचार करू. या कुंडलीत दशम भावाचा उपनक्षत्र स्वामी बुध आहे. हा बुध मंगळाच्या नक्षत्रात असून सप्तमाचा बलवान कार्येश आहे. त्यामुळे हा जातक नोकरी करणारच नाही. फक्त व्यवसाय करील आणि करतो. हा मंगळ अग्नितत्वाचा असल्यामुळे अग्नीशी संबंधित व्यवसाय ही गोष्ट व्यवस्थित जुळते. त्याच बरोबर मंगळ भूमिपुत्र आहे. त्यामुळे जमिनीचा खरेदी विक्रय किंवा जमिनीतील उत्पादने विकणे, शेती इत्यादी जातकाचा व्यवसाय होईल आणि आहे.
दशम भावाचा उपनक्षत्र स्वामी बुध असल्यामुळे जातक एकापेक्षा जास्त व्यवसाय किंवा धंदे करील करतो.
दशम भावाचा उपनक्षत्र स्वामी बुध हा शुक्राशी संबंधित असल्यामुळे खानपान सेवा किंवा हॉटेल अशा प्रकारचे व्यवसाय करावेत आणि करतो.
*
लग्नाचा उपनक्षत्र स्वामी मंगळ असल्यामुळे शस्त्र प्रेमही आहे.
*
या सर्व गोष्टी विचारात घेता आपण वर जातकाची ठरवलेली जन्मवेळ 06:31 ही अचूक आहे असे म्हणता येईल.
*
संकलन : हर्षद चाफळकर
No comments:
Post a Comment