Sunday, November 30, 2025

किस्से क्रिकेटचे

पूर्वप्रसिद्धी: क्रिककथा २०२५ (संपादक: कौस्तुभ चाटे)

१.  तुम्हांला माहित आहे का माउंट एव्हरेस्ट वरही क्रिकेट खेळलं गेलं आहे..

2009 साली एवरेस्ट बेस कॅम्प शेजारी गोराक शेप येथे एका चॅरिटी साठी सामना झाला होता. त्यात UK मधून साधारण 50 खेळाडू सहभागी झाले होते. यां सामन्यातून 250,000£ निधी गोळा झाला होता. आजतागायत तो सर्वोच्च उंचीवर (16945 फूट / 5165 मीटर) खेळला गेलेला क्रिकेट सामना म्हणून त्याची नोंद आहे.

२. क्रिकेट  इतिहासातला सर्वात लांब षटकार हा 900 किमी लांब मारल्याची नोंद आहे. 
त्याचं झालं असं की दक्षिण आफ्रिकेच्या जिमी सिनक्लेअर याने वॉन्डरर्स मैदानातून एक षटकार मारला तो मैदानाच्या बाहेर असलेल्या रेल्वे स्टेशन वर उभ्या असलेल्या एका ट्रेन मध्ये जाऊन पडला. ती ट्रेन वॉन्डरर्स च्या स्टेशन वरून सुटली ती 900 किमी लांब असलेल्या पोर्ट एलीझाबेथ स्टेशन ला थांबली. साहजिकच तो बॉल परत मिळवता आला नाही.

३. जगात असे दोन अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहेत जिथे मैदानात मोठे वृक्ष आहेत. 
दक्षिण आफ्रिकेतील सिटी ओव्हल, पीटर मारिट्झबर्ग आणि सेंट लॉरेन्स ग्राउंड, केंट इंग्लंड. 
पीटर मारिट्झबर्ग येथे 2003 च्या विश्वचषकातील भारत वि नामिबिया सामना खेळवला गेला होता.
सेंट लॉरेन्स ग्राउंड, केंट, इंग्लंड च्या मैदानावर ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश हा सामना 2005 साली झाला होता. आता हे मैदान मुख्यत्वे अंतरराष्ट्री महिला क्रिकेट सामन्यासाठी वापरले जाते.

४. 2006 साली भारतात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधील ब्रेबॉर्न स्टेडियम वर झालेल्या ऑस्ट्रेलिया वि  वेस्ट इंडिज सामन्यात मुंबई चा रणजी खेळाडू विनायक सामंत वेस्ट इंडिज साठी क्षेत्ररक्षण करायला बदली खेळाडू म्हणून आला होता. त्याने काही षटके क्षेत्ररक्षण केले.

५. विराट कोहली हा एकमेव गोलंदाज आहे ज्याने टी 20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एकही वैध बॉल न टाकता पहिली विकेट मिळवली आहे.

2011 साली इंग्लंड विरुद्ध खेळताना कोहली ने पहिलाच बॉल वाईड टाकला आणि त्यावर महेंद्रसिंग धोनी ने केव्हीन पीटरसन ला यष्टीचीत केले.
या विकेट नंतर कोहली चे गोलंदाजी पृथकरण होतं,
 0.0 - 0 - 1 - 1

आहे की नाही कमाल !!!

६. 2003 चा क्रिकेट विश्वचषक लक्षात राहतो तो केनिया च्या आश्चर्यकारक सेमिफायनल प्रवेशामुळे.

त्या स्पर्धेत केनिया ने गटसखाळीत कॅनडा आणि बांगलादेश चा पराभव केला शिवाय त्यांनी मायभूमीत श्रीलंकेला ही धूळ चारली. न्युझिलंड ने सुरक्षेच्या कारणास्तव केनिया ला जाण्यास नकार दिला आणि तो सामना केनिया ला बहाल (forfeit) झाला. पुढे गंमत अशी झाली की जिंकलेल्या चार संघांपैकी श्रीलंका आणि न्युझिलंड सुपर सिक्स साठी पात्र झाले त्यामुळे प्रत्यक्ष सामना खेळायच्या आधीच केनिया कडे दोन विजयाचे 8 गुण होते त्यांनी सुपर सिक्स मध्ये झिम्बाबवे चा पराभव केला आणि विश्वचषकाच्या सेमी फायनल ला पोहोचणारा पहिला सहयोगी संघ ठरला.

७. एक चक्रवर्ती शूरवीर योद्धा आणि अवलिया शास्त्रज्ञ एकाच नावात असतील अशी कल्पना कधी केलीये का?
नाही ना... अहो पण असं नावं असलेला एक क्रिकेट खेळाडू कधी काळी विराट कोहली बरोबर एकच संघात होता.

मूळचा तामिळनाडू चा असलेला नेपोलीयन आईन्स्टाईन 2008 साली मलेशिया इथे झालेल्या अंडर 19 विश्व चषक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. आयपीएल मध्ये त्याला चेन्नई सुपर किंग्ज ने करारबद्ध केलं होतं.

८. षटकार मारा, देशाचे नागरिकत्व मिळवा..
ऐकून धक्का बसला ना? 
पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये हे झालंय..

2007 च्या वन डे वर्ल्ड कप मध्ये हर्शल गिब्ज ने नेदरलँडस च्या डॅन वॅन बुंग ला एकाच षटकात सलग सहा षटकार मारले असं करणारा तो त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला पहिला खेळाडू ठरला. 

या पराक्रमाचे बक्षीस म्हणून सेंट किट्स अँड नेव्हीस चे तत्कालीन पंतप्रधान डेंझिल डग्लस यांनी गिब्ज ला मानद नागरिकत्व बहाल केले

समर ऑफ '25

दरवर्षी जून च्या पहिल्या आठवड्यात भारतात आयपीएल चा धांगडधिंगा संपल्यावर जगभर क्रिकेटचा नवीन मोसम सुरु होतो आणि त्याची सुरुवात इंग्लंड मध्ये होते. गेल्या WTC च्या स्पर्धेत भारताचा मायभूमी वर न्युझिलंड कडून लाजिरवाणा परभव झाल्यावर आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 1-3 अशी मात खाल्ल्यावर जानेवारी ते मे या पाच महिन्यात भारतीय क्रिकेट मध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. मार्च मध्ये भारताने न्युझिलंड ला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. मग रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त झाला पाठोपाठ विराट कोहली ने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. खरं पाहता दोघे किमान इंग्लंड च्या दौऱ्यावर जातील आणि मग निवृत्ती जाहीर करतील अशी सर्वांना अपेक्षा होती मात्र, दोघांची पाठोपाठ निवृत्ती हा भारतीय क्रिकेट रसिकांना एक प्रकार चा मानसिक धक्का होता.

अखेर इंग्लंड दौऱ्यासाठी निवड समिती ची बैठक पार पडली.
कोणाला संधी द्यावी, कोणाला वगळावे अशी चर्चा करत करत करूण नायर ला आठ वर्षांनी कसोटी संघात स्थान मिळाले, पण मग श्रेयस अय्यर मागे राहिला. मोहम्मद शमी दुखपती मुळे निवडीस पात्र झाला नाही बुमराह, सिराज, रेड्डी, आकाशदीप, अर्शदीप, प्रसिध कृष्णा अशी वेगवान गोलंदाजी ची फळी निवडली. कुलदीप, जडेजा, वॉशिंगटन सुंदर हे फिरकीपटू घेतले. पंत आणि जुरेल यष्टीरक्षक निवडले. रोहित आणि विराट यांच्या निवृत्ती ने नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. दोघांनंतर आता कोणाकडे भारताच्या कसोटी संघांचे नेतृत्व सोपवायचे हा प्रश्न निर्माण झाला. यात सर्वात आघाडीवर असलेल्या जसप्रीत बुमराह याने फिटनेस चे कारण देत कसोटीतून कर्णधार पदाच्या शर्यतीतून माघार घेतली. रिषभ पंत, के एल राहुल यांच्या नावाचा विचार झाला पण अखेर शुभमन गिल च्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली. त्यावर मीडिया आणि क्रिकेट रसिकांमध्ये अनेक उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. कसोटी संघात ज्याचे स्थान निश्चित नाही त्याला कसा कर्णधार केला वगैरे.. 

दुसरीकडे इंग्लंड मध्ये ECB ने भारत इंग्लंड कसोटी मालिकेचे पतौडी ट्रॉफी बदलून त्याला अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी नाव देण्याचा एकतर्फी निर्णय घेतला. त्यावरून हीं क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चा झाल्या. अखेर सचिन तेंडुलकर यांनी मध्यस्थी करून मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूला पतौडी यांच्या नावाने एक मेडल द्यावे असा प्रस्ताव मांडला, जो ECB ने मान्य केला.. आणि सगळे काही मागे सारून अखेर कसोटी मालिकेला लीड्स येथे सुरुवात झाली...

पहिली कसोटी | लीड्स | 20 ते 24 जून 2025:

इंग्लंड ने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.. इंग्लिश वातावरणात यशस्वी जैस्वाल आणि के एल राहुल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. जैस्वाल चा हा पहिलाच इंग्लंड दौरा असल्याने सगळ्यांचे लक्ष त्याच्या कामगिरी कडे होते. त्यानेही दौऱ्याची सुरुवात धडाक्यात केली. पहिल्याच डावात शतकी खेळी करत त्याने इंग्लंड च्या क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले. कर्णधार शुभमन गिल ने हीं आपल्या कर्णधार म्हणून पहिल्या डावात शतक झळकावत 147 धावा केल्या. त्याला उपकर्णधार आणि यष्टीरक्षक रिषभ पंत च्या ही शतकाची उत्तम साथ मिळाली पंत ने 134 धावा केल्या. तळाच्या फलंदाजंनी हाराकिरी केल्याने 3 बाद 430 वरून सर्वबाद 471 असा भारताचा डाव गडगडला. इंग्लंड ने त्यांच्या पहिल्या डावात ओली पोप च्या 106 आणि हॅरी ब्रुक च्या 99 धावांच्या जोरावर 465 धावा केल्या व भारताला 6 धावाची नाममात्र आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात के एल राहुल च्या 137 आणि पंत च्या 118 धावाच्या खेळी ने 364 धावा केल्या. रिषभ पंत हा एकच कसोटी च्या दोन्ही डावात शतक करणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज बनला. इंग्लंड ला विजयासाठी 371 धावांचे आवाहन मिळाले. बेन डकेट च्या 149 आणि जो रूट, झाक क्रॉली च्या अर्धशतकाने इंग्लंड ने तो सामना 5 विकेट राखून सहज जिंकला.
इंग्लंड 1 - 0 भारत 

दुसरी कसोटी | एजबॅस्टन | 2 ते  6 जूलै  2025:

371 धावांचे मोठे आवाहन देऊन ही पराभव झाल्याने भारतीय संघात काहीशी खंत होती. ते अपयश मागे टाकत भारतीय संघ एजबॅस्टन ला पोहोचला. बुमराह तीनच कसोटी खेळणार असल्याने तो या कसोटीत खेळला नाही इंग्लंड ने या वेळीही टॉस जिंकून भारताला पुन्हा पहिल्यांदा फलंदाजी ला पाचारण केलं. या डावात कर्णधार शुभमन गिल ने आणखी एक पाऊल पुढे टाकत पहिल्या डावात 267 धावांची खेळी केली (हा भारतीय कर्णधाराने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे) त्याला यशस्वी जैस्वाल (87), रविंद्र जडेजा (89), वॉशिंगटन सुंदर (42) यांनी छान साथ दिली. भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्या. इंग्लंड ने त्यांच्या पहिल्या डावात हॅरी ब्रुक (158) आणि जेमी स्मिथ (187) धावाच्या जोरावर 407 धावा केल्या. भारताने 180 धावांची मोठी आघाडी घेतली.
दुसऱ्या डावात भारतीय कर्णधार शुभमन गिल ने पुन्हा शतक (161) ठोकले. एका सामन्यात विक्रमी 428 धावा गिल ने केल्या. त्यात जडेजा (69), पंत (65), राहुल (55) च्या साथीने 6 बाद 427 धावा करत इंग्लंड ला 608 धावांचे अशक्यप्राय आव्हान दिले. इंग्लंड कडून जेमी स्मिथ च्या 88 धावा वगळता फारसा चमकदार खेळ केला नाही. भारताकडून आकाशदीप ने 99 धावात 6 बळी घेत चमकदार कामगिरी केली व इंग्लंड चा डाव 271 धावात गुंडाळला. भारताने सामना 336 धावांनी जिंकला..
इंग्लंड 1 - 1 भारत 

तिसरी कसोटी | लॉर्ड्स | 10 ते 14 जुलै 2025:

दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून गेल्या आठ महिन्यातील पहिला कसोटी जिंकला. लॉर्ड्स च्या कसोटीत इंग्लंड ने प्रथम फलंदाजी करत जो रूट चे शतक (104) जेमी स्मिथ (51), ब्रायडन कार्स (56) यांच्या जोरावर सर्वबाद 387 धावा केल्या. भारताने प्रत्युत्तर देत के एल राहुल (100), रिषभ पंत (74), जडेजा (72) यांच्या खेळी मुळे 387 धावा केल्या आणि पहिल्या डावात दोन्ही संघांनी समान धावा केल्या. अशी घटना कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवव्यांदा घडली. पहिल्या डावात एका वेळी भारताला आघाडी घ्यायची संधी असताना 5 बाद 326 वरून सर्वबाद 387 अशी अवस्था झाल्याने आघाडी घेण्याची नामी संधी भारताने गमावली.
दुसऱ्या डावात वॉशिंगटन सुंदर च्या 22 धावात 4 बळीच्या कामगिरी च्या जोरावर भारताने इंग्लंड चा दुसरा डाव 192 धावात रोखला. शेवटच्या डावात भारताला विजया साठी 193 धावांची गरज असताना चौथ्या दिवस अखेर 4 बाद 58 अशी अवस्था झाली होती. जैस्वाल, गिल, आकाशदीप करुण नायर बाद झाले होते. अखेरच्या दिवशी भारताला 135 धावा तर इंग्लंड ला 6 विकेट आवश्यक होत्या. पाचव्या दिवशी सकाळी रिषभ पंत बाद झाला आणि भारताची 5 बाद 71 अशी अवस्था झाली. उपहारा पर्यंत के एल राहुल, वॉशिंगटन सुंदर आणि नितीशकुमार रेड्डी बाद झाल्याने उपहाराला 8 बाद 112 धावा अशी बिकट अवस्था झाली होती. फक्त रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि महंमद सिराज हेच फलंदाजी ला यायचे शिल्लक राहिले होते. उपाहार ते चहापान या दरम्यान बुमराह आणि जडेजा आणि किल्ला लढवत ठेवला आणि विकेट पडू दिली नाही. चहापानाला अगदी काही वेळ शिल्लक असताना बुमराह ची विकेट पडली आणि चहा पानाला भारताची धावसंख्या 9 बाद 163. भारताला विजयासाठी 30 धावा पाहिजे होत्या आणि इंग्लंड ला फक्त एक विकेट. त्यांचा मुख्य फिरकी गोलंदाज शोएब बशीर जखमी झाला होता आणि बेन स्टोक्स ने जो रूट च्या साथीने मारा सुरु ठेवला होता. चहा पानानंतर सिराज - जडेजा ची जोडी खेळायला उतरली तेव्हा सगळ्यांनी आशा सोडून दिल्या होत्या मात्र जडेजाने एक एक धाव घेत 193 चे लक्ष दृष्टिक्षेपात आणले होते. मात्र काही वेळाने शोएब बशीर पुन्हा गोलंदाजीला आला आणि त्याचा एकच चेंडू सिराज ने डिफेन्ड केला आणि तोच चेंडू अलगद जाऊन विकेट ला लागला आणि भारताने हा सामना 22 धावांनी गमावला.
इंग्लंड 2 - 1 भारत 

चौथी कसोटी | ओल्ड ट्रॅफर्ड | 23 ते 27 जुलै 2025:

लॉर्ड्स वरची तिसरी कसोटी अगदी हाता तोंडाशी येऊन गमावल्या मुळे भारतीय संघ निराश झाला होता. लॉर्ड्स वर 22 धावांनी झालेला पराभव आणि त्याला कारणीभूत ठरलेल्या 32 अवांतर धावा भारतीय संघाला बोचत होत्या. अश्या आशा निराशेच्या गर्तेतून बाहेर पडत दोन्ही संघ मँचेस्टर च्या ओल्ड ट्रॅफर्ड वर दाखल झाले. भारताने सलग चौथी नाणेफेक हरली. इंग्लंड ने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जैस्वाल (58), राहुल (46), पंत (54) अशी कामगिरी ने भारतीय संघाने सर्वबाद 358 धावा केल्या. इंग्लंड ने प्रत्युत्तर देताना जो रूट(150), बेन स्टोक्स (141) आणि ओली पोप (71) धावांच्या जोरावर सर्वबाद 669 धावा केल्या. 2014 नंतर प्रथमच भारतीय गोलंदाजांनी 600 हुन अधिक धावा एका डावात दिल्या होत्या. दुसऱ्या डावात 311 धावांनी पिछाडी वर पडलेल्या भारतीय संघाची अवस्था चौथ्या दिवसाच्या उपाहाराला 2 बाद 1 धाव अशी झाली होती. आणि सामन्यात पूर्ण पाच सत्र शिल्लक होती. इंग्लंड ला विजय केवळ आठ विकेट दूर होता आणि पहिल्या डावात जोफ्रा आर्चर चा चेंडू पायाला लागून रिषभ पंत जायबंदी झाला होता. त्यामुळे जवळपास 3 बाद 1 अशीच काहीशी स्थिती भारतीय संघाची झाली होती. मात्र एका बाजूने के एल राहुल आणि दुसऱ्या बाजूने शुभमन गिल यांनी चौथ्या दिवशी चहा पानापर्यंत आणखी पडझड न होता 2 बाद 86 अशी सावध सुरुवात करुण दिली. चौथ्या दिवस अखेर भारताच्या 2 बाद 150 धावा झाल्या होत्या. आणि संपूर्ण पाचव्या दिवसाचा खेळ शिल्लक होता. पाचव्या दिवशी सकाळी के एल राहुल स्टोक्स च्या झपकन आत येणाऱ्या चेंडू वर पायचित झाला आणि सगळं लक्ष आता कर्णधार शुभमन गिल आणि बाकीच्या फलंदाजांकडे लागून राहिलं. पाचव्या दिवशी उपहाराला शुभमन गिल शतकी खेळी (103) करुन बाद झाला आणि पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट रसिकांना पराभवाचे काळे ढग दिसू लागले. अश्यावेळी जखमी पंत ऐवजी बढती मिळालेला वॉशिंगटन सुंदर आणि संपूर्ण मालिकेत सातत्याने धावा करणारा रविंद्र जडेजा एकत्र आले आणि त्यांनी उपहार ते चहापान हे सत्र एकही विकेट न गमावता खेळून काढले भारताची पिछाडी भरून काढून 11 धावांची आघाडी मिळवली. चौथ्या दिवशी उपहाराच्या आधी पडलेल्या पहिल्या षटकातील दोन विकेट्स नंतर पुढच्या 117 षटकात केवळ दोन विकेट्स पडल्याने इंग्लंड च्या चेहऱ्यावर नैराश्य दिसू लागले होते. पाचव्या दिवसाचा अखेरच्या सत्राचा खेळ सुरु झाला. इंग्लंड जवळपास 125 ओव्हर मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना अक्षरशः पिचून गेले होते. इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स ने आपले मुख्य वेगवान गोलंदाज न खेळवता जो रूट आणि हॅरी ब्रुक या कामचलावू स्पिनर ला गोलंदाजी करायला लावली. रविंद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर अनुक्रमे 89 आणि 85 धावांवर नाबाद असताना इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्स ने सामना अनिर्णीत संपवण्यासाठी याचना केली. पण दोन्ही फलंदाज शतकाच्या जवळ असल्या कारणाने भारताने तो प्रस्ताव नकारला आणि खेळ कसोटीच्या शेवटच्या तासात गेला. लवकरच हॅरी ब्रुक आणि जो रूट च्या पोपटवाडी बॉलिंग चा फायदा घेत जडेजा आणि सुंदर यांनी आपली कसोटी शतके पूर्ण केली आणि मग दोन्ही संघांनी सामना अनिर्णीत ठेवण्याचा निर्णय घेतला. हा सामना संपेपर्यंत कर्णधार बेन स्टोक्स, जॉफ्रा आर्चर आणि इतर खेळाडूंची इतकी दमछाक झाली की शेवटच्या कसोटी साठी विश्रांती घेतली...
इंग्लंड 2 - 1भारत

पाचवी कसोटी |केनिंग्टन ओव्हल, लंडन | 31 जुलै ते 4 ऑगस्ट 2025:
ओल्ड ट्रॅफर्ड च्या त्या अनिर्णीत सामान्यानंतर दोन्ही संघात मोthe बदल झाले भारताकडून बुमराह, पंत, शार्दूल ठाकूर, अंशुल कंबोज यांच्या ऐवजी प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, करुण नायर आणि आकाशदीप यांना संधी मिळाली. इंग्लंडकडून बेन स्टोक्स, जॉफ्रा आर्चर, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स ऐवजी जेकब बेथेल, ओव्हरटन, ऍटकीन्सन, जोश टंग खेळले. भारताने या मालिकेतील सर्व टॉस हरले आणि पहिल्याच मालिकेत शुभमन गिल च्या नावे नको तो विक्रम झाला. जानेवारी 2025 पासून सलग 16 टॉस भारतीय संघ हरला आहे. असे होण्याची शक्यता केवळ 0.00305% आहे. टॉस जिंकून इंग्लंड ने भारतीय संघाला फलंदाजी साठी निमंत्रित केले. संपूर्ण मालिकेत पहिल्यांदाच गोलंदाजीला पोषक अशी खेळपट्टी ओव्हल च्या मैदानावर बघायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने करुण नायर च्या 57 आणि साई सुदर्शन च्या 38 धावा च्या मदतीने 224 धावा केल्या. गस ऍटकीन्सन ने 33 धावात 5 बळी घेतले. इंग्लंड ने आपल्या पहिल्या डावात क्रॉली (64), ब्रुक (53) च्या साथीने 247 धावा केल्या आणि 23 धावांची आघाडी मिळवली. भारताने दुसऱ्या डावात जैस्वाल (118), नाईट वाचमन आकाशदीप (66), जडेजा (53), सुंदर (53), जुरेल (34) च्या मदतीने 396 धवांचा डोंगर उभा केला आणि मालिकेत पहिल्यांदा बॅझबॉल ला आव्हान मिळाले. तिसऱ्या दिवस अखेर इंग्लंड 1 बाद 50 अश्या स्थितीत होता. बहुतांश क्रिकेट रसिकांना खात्री होती की सामना चौथ्या दिवशी संपणार म्हणून. डकेट आणि पोप ची विकेट पडल्यावर रूट (105) आणि हॅरी ब्रुक (111) यांनी चौथ्या विकेट साठी 195 धावांची भागीदारी केली आणि भारताच्या आशा मावळत चालल्या होत्या. 3 बाद 301 अश्या सुस्थितीत असताना एका क्षणी आकाशदीप चा एक चेंडू भिरकावून लावण्याच्या नादात हॅरी ब्रुक चा झेल सिराज च्या हाती विसवला आणि भारताला चंचुप्रवेश करण्याची संधी मिळाली. पाठोपाठ बेथेल, रूट यांची विकेट पडली. 3 बाद 301 वरून इंग्लंड अचानक 6 बाद 337 धावांवर हेलकावे खात होतं. चौथा दिवस संपण्यासाठी एक तास बाकी असताना अंपायर्स नी खराब लाईट मुळे खेळ थांबवला आणि 20 जून रोजी सुरु झालेली हीं पाच कसोटीची मालिका पाचव्या कसोटीच्या पाचव्या दिवसापर्यंत जाणार हे निश्चित झालं. 2017/18 च्या ऍशेस मालिकेनंतर पहिल्यांदाच सर्व पाच कसोटी सामने पाचव्या दिवसापर्यन्त गेले. पाचव्या दिवशी गोष्ट खूप सोपी होती. इंग्लंड ला जिंकण्यासाठी 35 धावा आणि भारताला 4 विकेट्स... 
पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला आणि प्रसिध कृष्णा च्या पहिल्या दोन चेंडू वर ओव्हरटन ने दोन चौकार मारले. इंग्लंड विजयापासून केवळ 27 धावा दूर. महंमद सिराज ने दुसऱ्या बाजूने मारा सुरु केला आणि षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जेमी स्मिथ ला बाद केलं. भारत विजयापासून केवळ 3 विकेट्स दूर. सिराज ने आपल्या दुसऱ्या षटकात ओव्हरटन ला पायचीत केले. रिव्हयू मध्ये अंपायर्स कॉल ने इंग्लिश चाहते हूर्यो उडवत होते. दरम्यान प्रसिध कृष्णा ने एका षटकात जॉश टंग याला खणखणीत यॉर्कर टाकून इंग्लंड ची अवस्था 9 बाद 357 अशी केली होती. इंग्लंड ला जिंकण्यासाठी आणखी 17 धावा पाहिजे होत्या आणि मालिकेचा निर्णायक क्षण आला. सामन्याच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना इंग्लंड चा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स जायबंदी झाला होता. तरीही राष्ट्रीय कर्तव्य म्हणून वोक्स मैदानावर जायबंदी हात घेउन परतला. 17 धावा हव्या असताना ऍटकीन्सन याने सिराज ला षटकार मारला आणि कित्येक भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. पुढच्या षटकात प्रसिध कृष्णाने 4 धावा दिल्या. विजयासाठी 7 धावा हव्या असताना सिराज ने एक परफेक्ट ऑफ स्टंप च्या बुंध्यात यॉर्कर टाकला आणि ऍटकीन्सन बाद झाला. पाचव्या दिवशी भारताने अशक्य असा विजय खेचून आणला.
इंग्लंड 2 - 2 भारत
 2025 साली झालेली हीं मालिका त्यात संपूर्ण 25 दिवस झालेला अत्युच्च पातळी चा खेळ निश्चितच हा समर ऑफ '25 यादगार ठरला. महंमद सिराज सामनावीर तर हॅरी ब्रुक आणि शुभमन गिल हे अनुक्रमे इंग्लंड आणि भारताचे मालिकावीर ठरले. या मालिकेत अनेकांना 2005 च्या ऍशेस मालिकेची तसेच भारताच्या गॅब्बा मैदानावरच्या विजयाची आठवण झाली. 

बोलंदाजी- क्रिकेट समालोचन काल, आज आणि उद्या

 “Dhoni finishes off in style.”, “Carlos Brathwaite! Carlos Brathwaite!! Remember the name, “England have won the world cup by the barest of the margins, “Kohli goes down the ground, Kohli goes out off the ground.” ही सगळी वाक्य आजही कानावर पडली की आपल्या समोर तो प्रसंग आजही डोळ्यासमोर उभा राहतो... ही सगळी किमया तो प्रसंग वर्णन करणाऱ्या क्रिकेट समालोचकांची. आज आपण या लेखात एकूणच क्रिकेट समालोचन याचा इतिहास आजचे वास्तव आणि भविष्यातील वाटचाल याबाबत माहिती घेणार आहोत. समालोचन ही एक कला आहे. आणि जसे जसे क्रिकेट वाढत गेलं तसं तसं क्रिकेट समालोचन ही विकसित हॉट गेलं. क्रिकेट रसिकांना सामन्याचा अनुभव कसं येतो त्यातील भावना, बारकावे आणि किस्से हे सर्व समालोचनाचे अविभाज्य घटक बनले आहेत.

भारतातील क्रिकेट हे नेहमी भावना , परंपरा आणि नाविन्यावर कसरत करते आहे. क्रिकेट ला मोठे करण्यात समालोचनाची मोठी भूमिका राहिली आहे. रुक्ष, रटाळ आणि संथ समालोचनाची कल्पना करून पहा. छे ! शक्यच नाही.ते नाट्य, प्रेक्षकांचा आवाज, बॅट बॉलला लागल्यानंतरचा आवाज या सर्वाचे हे अद्भुत मिश्रण आहे.

समालोचनाची सुरुवात १९२० – ३० च्या दशकात रेडियो बरोबर झाली. जॉन अर्लॉट, अॅलन मॅकगिलव्रे या दिग्गजांनी त्यांच्या वक्तृत्वाने आणि खास शैलीतून सर्वसामान्य क्रिकेट रसिकांसमोर सामने सादर केले, रंगवले. हे समालोचन क्रिकेट सामन्याचा अहवाल कमी आणि कथाकथन जास्त अश्या प्रमाणात होते. त्यात विनोद, कविता किस्से आणि खेळातील बारकावे यांचे मिश्रण ही होते. यामुळे क्रिकेट रसिकांबरोबर त्यांची एक नाळ जुळली आणि क्रिकेटचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला.

भारतात क्रिकेट समालोचन ची सुरुवात ए. एफ. एस ऊर्फ बॉबी तल्यारखान, नरोत्तम पुरी आणि महाराज ऑफ विझीयानगरम यांनी केली. सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेगौरव कपूर ला दिलेल्या एका पॉडकास्ट मध्ये तल्यारखान यांच्याबाबत आठवण सांगताना म्हणतात की, “अगदी सुरुवातीच्या काळात बॉबी तल्यारखान आपल्या सोबत एक व्हिस्की ची बॉटल घेऊन एकटे संपूर्ण कसोटी सामना समालोचन करायचे पाच दिवस दररोज.” मराठी मध्ये क्रिकेट समालोचन ची परंपरा वि. वि. करमरकर, बाळ. ज. पंडीत , चंद्रशेखर संत यांनी त्यांच्या अनोख्या शैलीने रंगवली. आखूड टप्प्याचा चेंडू,फलंदाजाने सीमापार फटकवला, उंचावरून षटकार मारला अश्या वाक्यांनी अक्षरश: डोळ्यासमोर सामना सुरू असल्याचे जाणवायचे.

पुढे टीव्ही वर सामने सुरू झाले. मग दूरदर्शन च्या राष्ट्रीय वाहिनी वरुन हिंदी- इंग्रजी आलटून पालटून समालोचन होत असे. यातही कालानुरूप अनेक बदल झाले. १९९१ च्या आर्थिक उदरीकरणानंतर अनेक खासगी उपग्रह क्रीडा वाहिन्या सुरू झाल्या. भारताचे परदेशातील क्रिकेट सामने टीव्हीवर दिसू लागले. न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया मधले सामने भल्या पहाटे, इंग्लंड- आफ्रिकेतील सामने दुपारी आणि वेस्ट इंडिज मधील कॅरेबियन बेटावरील सामने संध्याकाळी सुरू होत असत. त्यावेळी भारतीय प्रेक्षक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचन ऐकू लागला. ऑस्ट्रेलियातील बिल लॉरी, रिची बेनो, इयन चॅपल, ग्रेग चॅपल, मार्क निकोलस ते दीर्घकाळ रेडियो समालोचन करणारे मात्र गेल्या काही वर्षात प्रसिद्धी पावलेले केरी - ओ- किफ पर्यन्त ऑस्ट्रेलियन समालोचकांची मांदियाळी भारतीय प्रेक्षकांच्या कानावर पडू लागली. ऑस्ट्रेलियातील समालोचन ऐकून कधी कधी शांतता सुद्धा खूप काही वर्णन करून जाते हे क्रिकेट रसिकांच्या लक्षात आले. या शिवाय इंग्लंड चे टोनी ग्रेग, सर जेफ्री बॉयकॉट, डेविड गावर, डेविड लॉईड, ते अलिकडचे नासिर हुसेन माईक आथरटन पर्यन्त इंग्रजांची समालोचने ऐकू लागली. त्यात वेस्ट इंडिज चे मायकल होल्डिंग, टोनी कोझीएर, जेफ दूजॉ, इयन बिशप यांनी त्यांच्या खास कॅरेबियन लहेजा ने रंगत आणली.

२००३ साली इंग्लंड मध्ये पहिला टी २० सामना खेळला गेला. तो एक प्रकारे एकूणच क्रिकेट खेळासाठी मैलाचा दगड म्हणावा लागेल. कारण त्या सामन्याने जसे क्रिकेट आणि क्रिकेटचे नियम थोडेफार बदलले तसेच क्रिकेट समालोचनात ही बदळ झाले. आधी समालोचन केवळ स्टेडियमवरील एका कॉमेंटरी बॉक्स मधून व्हायचं. पण टी २० मध्ये समालोचन करण्याच्या पद्धतीत ही प्रयोग झाला. खेळाडू क्षेत्ररक्षण किंवा फलंदाजी करत असताना त्याला थेट वर्णन करता येऊ लागले. त्याचे अनेक गमतीदार किस्से ही घडले. असाच एक किस्सा ऑस्ट्रेलियामधील बिग बॅश स्पर्धेत घडला. मिशेल मार्श बॅटिंग करत होता आणि समोर जगद्विख्यात लेग स्पिनर शेन वॉर्न त्याला गोलंदाजी करत होता. इकडून कॉमेंटरी बॉक्स मधून समालोचकांनी शेन वॉर्न ला विचारलं, “आता तू मार्श ला कसा बाद करशील?” त्यावर शेन वॉर्न पुटपुटला, “मी त्याला ऑफ स्टंप च्या बाहेर लेग स्पिन टाकेन. तो मला पुढे सरसावत येऊन मारण्याचा प्रयत्न करेल. या प्रयत्नात तो अयशस्वी ठरला तर यष्टीचीत होईल किंवा जरी मारला तर बॉल हवेत जाऊन मिड विकेट ला झेल बाद होईल.” अक्षरश: वॉर्न बोलला तसाच बॉल त्याने टाकला, मार्श ने पुढे येऊन त्याला उंच फटकावला आणि वॉर्न म्हटल्याप्रमाणे मार्श मिड विकेट ला झेल देऊन बाद झाला. हा चमत्कार, कमाल केवळ समालोचनात आलेल्या तंत्रज्ञानामुळे झाली.


काळ बदलला तस तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाचा क्रिकेट प्रक्षेपण आणि समालोचनात वापर वाढला. उपग्रह वाहिन्या आणि डिजिटल क्रांति मुळे क्रिकेट प्रक्षेपणाचा दर्जा  आणखी सुधारला. भारतात क्रिकेट प्रक्षेपण आणि समालोचन हा कायमस्वरूपी चालणारा फायद्यातला व्यवसाय झाला आहे. सुनील गावस्कर, रवी शास्त्री, संजय मांजरेकर, नवज्योत सिंग सिद्धू, अंजुम चोप्रा यांचे सारखे माजी खेळाडू आणि हर्षा भोगले, जतीन सप्रू, संजना गणेशन, मयांती लँगर सारखे समालोचक आता आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामने अगदी सहज सरल भाषेत रसिकांपर्यंत पोहोचवतात. वर्षारंभी संपलेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात या समालोचकांना प्रचंड मागणी होती. आता केवळ टीव्ही हे माध्यम न राहता, मोबाइल, लाईव्ह स्ट्रीमिंग, क्रिकेट वेबसाइट वरचे पॉडकास्ट असे असंख्य मार्गाने क्रिकेट प्रसवले जात असल्याने समालोचक, क्रिकेट जाणकार, विश्लेषक यांना प्रचंड मागणी आहे.

टीव्ही व्यतिरिक्त डिजिटल लाईव्ह स्ट्रीमिंग मुळे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अल्ट्रा स्लो मोशन , पिच मॅप , बॉल ट्रॅकिंग, स्टंप व्हीजन यामुळे क्रिकेट प्रक्षेपण अधिक युझर फ्रेंडली झाले आहे. आता प्रेक्षक स्वत: टीव्हीच्या स्क्रीन वर पाहून पायचीत चे निर्णय कसे चूक की बरोबर हे ओळखू लागला आहे. तंत्रज्ञानाचा अफाट वापर होऊन देखील कसोटी सामन्यातील रोजच्या खेळपट्टीचा आढावा घेताना कार ची चावी खेळपट्टीला पडलेल्या भेगेत घालून ती भेग किती मोठी झाली आहे, ही कल्पकता केवळ इयन चॅपल सारखा अनुभवी समालोचकच दाखवू शकतो.

नजीक च्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I.) आणि आभासी वास्तव (Virtual Reality) याचा खूप वापर होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे सामन्याचे प्रक्षेपण, सादरीकरण, विश्लेषण यात क्रांति होऊ शकते. डिजिटल लाईव्ह स्ट्रीमिंग मुळे प्रादेशिक भाषा आणि उप भाषा मध्ये समालोचन ऐकणे क्रिकेट रसिकांना सहज शक्य झाले आहे. V.R. Headset चा उपयोग करून तुम्ही घरबसल्या स्टेडियम मध्ये सामना पाहत असल्याचा आनंद घेऊ शकता. आपल्याला हव्या त्या  अॅंगल ने रिप्ले, rewind, slow motion अश्या सगळ्याचा आनंद घेऊ शकता. तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की आपल्या आवडत्या समालोचकांच्या आवाजात आपण संपूर्ण सामना  आपण ऐकू शकतो आणि आपण हे  करत आहोत हे त्या समालोचकाला ठाऊक ही नसेल. तो आपल्या कुटुंबाबरोबर मस्त सुट्टी वर असेल. यालाच V.R. 360 experience म्हणता येईल.

जसेजसे क्रिकेट विकसित होईल तसेतसे समालोचन ही विकसित होईल. हा खेळ अजून गतिमान आणि आकर्षक होईल. Airwave असो, V. R. 360 असो किंवा screen असो क्रिकेट रसिकांना आणखी जवळ आणेल, मोठे करेल क्रिकेटचा आत्मा प्रत्येक शब्दाद्वारे प्रतिध्वनित करेल आणि त्याचा वारसा टिकेल हे ही सुनिश्चित करेल.

सिंहावलोकन चॅम्पियन्स चे

 

चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसी च्या एफटीपी मधली अशी एक स्पर्धा आहे जिथे गेल्या काही स्पर्धांपासून केवळ उत्कृष्ट आठ संघ सहभागी होतात आणि पंधरवड्यात आपल्याला विजेता मिळतो. अशी ही स्पर्धा या वर्षी पकिस्तान मध्ये आयोजित केली होती. स्पर्धेत सहभागी संघांचा विचार केला तर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका (२००२ चे संयुक्त विजेते) हे स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत आणि गेले दीड दशक हळूहळू प्रगती करू पाहणारा अफगाणिस्तान या वेळी चॅम्पियन्स ट्रॉफी ल पात्र झाला.


स्पर्धा पाकिस्तानात होणार म्हटल्यावर भारताच्या सहभागाचा प्रश्न होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट चे अर्थकारण बघता भारताशिवाय स्पर्धा घेणं म्हणजे आयसीसी ने आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होतं. म्हणून मग यजमान पाकिस्तान आणि भारताचे सगळे सामने दुबईत असा जुगाड जमला  आणि स्पर्धा सुरू झाली. गेल्या जून २०२४ मध्ये वेस्ट इंडिज मध्ये वर्ल्ड टी २० जिंकल्यानंतर भारताची आयसीसी ट्रॉफी ची भूक वाढली होती. या स्पर्धेसाठी भारताची संघनिवड पाहिली असता  त्यावर खूप टीका झाली. मूळ  संघात तीन तीन स्पिनर आणि वन डे  वर्ल्ड कप नंतर पुनरागमन करणारा महमंद शमी हा एकमेव अनुभवी वेगवान गोलंदाज घेऊन जाण्यामागचा विचार भल्याभल्या क्रिकेट पंडितांना  पचला नाही रुचला नाही. त्यात भरीस भर म्हणून दुखापतग्रस्त यशस्वी जायस्वाल च्या जागी चौथा स्पिनर वरुण  चक्रवर्ती आणला. हे सगळे पाहून गौतम गंभीर वर KKR इफेक्ट च्या चर्चा सुरू झाल्या.आणि अनेक स्वयंघोषित क्रिकेट जाणकारांनी इंस्टा आणि फेसबुक रिल्स च्या माध्यमतून अजून ई – कचरा वाढवायला सुरुवात केली.  या लेखात आपण प्रामुख्याने भारताच्या कामगिरीचा मागोवा घेणार आहोत.

v  भारत वि  बांग्लादेश, २० फेब्रुवारी २०२५

गेल्या काही वर्षात बांग्लादेश कहा संघ अतिशय बेभरवशयचा झाला आहे. कधी कोणत्या दिवशी कसे खेळतील याची कोणीही शाश्वती देत नाही. पण पहिल्याच सामन्यात भारताच्या सुंदर, संयत आणि वेगवान गोलंदाजी मुळे बांग्लादेश ची अवस्था लवकरच ५ बाद ३५ अशी होऊन बसली. त्यानंतर हृदोय आणि जकेर आली च्या भागीदारी मुळे बांग्लादेश च्या डावाला थोडा आकार आला. हृदोय ने ११८ चेंडूत १०० धावा केल्या आणि भारताकडून महंमद शमी ने ५३ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या.

धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात उत्तम झाली. शुभमन गिल ने सुरुवातीपासूनच कमाल फटके मारत एक बाजू लावून धरली. त्याने १२९ चेंडूत १०१ धावा केल्या त्याला के एल राहुल च्या ४१ धावांची चांगली साथ मिळाली आणि भारताने हा सामना ४६.३ षटकात ६ विकेट्स ठेऊन जिंकला.  शतकवीर शुभमन गिल ला सामनावीर चा पुरस्कार मिळाला. भारताचा हा विजय परिपूर्ण खेळाचे दर्शन होते. तर दुसरीकडे बंगालदेश ला ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि कचखाऊ फलंदाजी चांगलीच महागात पडली. या विजयामुळे भारताचा पुढच्या फेरीत जाण्याच्या शक्यता  बळावल्या. पुढचा सामना न्यूझीलंड कडून स्पर्धेचा पहिला सामना हरलेल्या पाकिस्तान विरुद्ध होता.

v  भारत वि पाकिस्तान, २३ फेब्रुवारी २०२५.

या सामन्यात पाकिस्तान ने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग चा निर्णय घेतला आधीच्या सामन्यात न्यूझीलंड चे मोठे आव्हान गाठू न शकलेल्या पाकिस्तान ने बॅटिंग करून मोठा स्कोअर उभा करायचे ठरवले होतं. पण मागच्या सामन्याचे दडपण पाकिस्तान च्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं किंबहुना हा सामना गमावला तर घरच्या मैदानावर एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपली पहिली गच्छंती  होणार या भीतीने पाकिस्तान कहा डाव अतिशय संथ आणि कंटाळवणा झाला होता. ३ बाद १५१ वरुन सर्वबाद २४१ हे केवळ पाकिस्तान च करू शकतो हे त्या दिवशी पुन्हा क्रिकेट जगताने पाहिलं. भारताकडून शमी वगळता सर्वानी विकेट्स घेतल्या मो. रिझवान आणि सौद शकिल यांनी १०४ धावांची भागीदारी केली पण ती अतिशय संथ भागीदारी झाली.

२४२ धावांचे माफक आव्हान घेऊन उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात छान झाली. जलदगतीने ४६ धावा झाल्यानंतर किंग कोहली ने धावांचा पाठलाग आपल्या हाती घेत शतकी खेळी करत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. त्याला श्रेयस अय्यर च्या ५६ धावांची साथ मिळाली. विराट कोहली ला शतक आणि दोन झेल  या कामगिरी साठी सामनावीर घोषित करण्यात आले. या विजयामुळे भारताचा सलग दूसरा विजय आणि पाकिस्तान चा सलग दूसरा पराभव यामुळे भारत उपांत्य फेरीत दाखल झाला आणि पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झाला. घरच्या मैदानवर सगळ्यात आधी स्पर्धेतून बाद व्हायची नामुष्की पाकिस्तान वर ओढावली .

v  भारत वि न्यूझीलंड, २ मार्च २०२५

एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर भारताचा गटसाखळीतला शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होता. परंपरा नुसार भारताने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आणि पहिल्यांदा बॅटिंग करावी लागली. भारताची अवस्था ७ व्या षटकात ३ बाद ३० अशी झाली आणि यावेळी श्रेयस अय्यर ने सुरेख फलंदाजी करत ७९ धावा केल्या त्याला हार्दिक पांड्या , अक्षर पटेल, जडेजा आणि के एल राहुल ची चांगली साथ मिळाली. भारताचा डाव ९ बाद २४९ वर संपला.

प्रत्युत्तरदाखल न्यूझीलंड ची सुरुवात अडखळत झाली. आणि केन विल्यमसन ने एक बाजू लावून धरली.पण दुसरीकडून नियमित फलंदाज बाद होत गेले. या सामन्यात पहिल्यांदा वरुण चक्रवर्ती ला संघात स्थान मिळाले. त्याच्या गोलंदाजी पुढे किवी संघाने सपशेल  हार पत्करली. वरुण ने ४२ धावांत ५ विकेट्स घेतल्या त्याला जडेजा, कुलदीप यादव ने मधल्या षटकात दबाव आणून महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. किवींचा संघ ४७.२ षटकात २०५  धावांत गार्ड झाला आणि भारताने हा सामना ४४ धावांनी जिंकला. वरुण चक्रवर्ती च्या ५ विकेट्स घेण्याच्या कामगिरीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या विजयामुळे भारताचे गटातील अव्वल स्थान निश्चित झाले. या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया, आणि  द. आफ्रिका दुबईला आले होते. कारण कोण भारत विरुद्ध उपांत्य सामना खेळणार हे निश्चित नसल्यामुळे तीन संघ या सामन्याच्या निकालाची वाट पाहत होते. आणि हा प्रवास ही काही काळ  चर्चेचा विषय ठरला होता. न्यूझीलंड चा  पराभव झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य सामना खेळण्यासाठी पाकिस्तान ला रवाना झाले.  

v  उपांत्य फेरी: भारत वि ऑस्ट्रेलिया ४ मार्च २०२५

२०२३ ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, भारतीय भूमीवर चा वन डे वर्ल्ड कप फायनल मधले पराभव अजूनही ताजे असताना वन डे फॉरमॅट मध्ये ऑस्ट्रेलिया ला फायनल ला न पोहचू द्यायची नामी संधी भारतीय संघाला मिळाली होती. या आधी बऱ्याच वेळा भारत ऑस्ट्रेलिया असे महत्त्वाच्या सामन्यात आंने सामने आले होते. पण, बहुतांश वेळी ऑस्ट्रेलिया ची सरशी झाली होती. या वेळी पुन्हा एक संधी चालून आली. टॉस जिंकल्यावर ऑस्ट्रेलिया ने पहिल्यांदा बॅटिंग घेतली. त्यांनी ४९.३ षटकात सर्व बाद २६४ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ ने  सर्वाधिक ७३ आणि त्याला अॅलेक्स केरी ने ६१ धावा करून ऑस्ट्रेलिया च्या डावाला आकार दिला. बाकीच्या सर्व फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. शमी ने ४८ धावांत ३ तर चक्रवर्ती आणि जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

भारताच्या डावाची सुरुवात  स्थिर झाली शुभमन गिल बाद झाल्यावर विराट कोहली ने रोहित (२८ धवा ) आणि श्रेयस अय्यर (४५ धावा )  यांच्या मदतीने डाव सावरला. कोहली  ने ९८ चेंडूत ८४ धावांची उत्कृष्ट संयमी खेळी केली. के एल राहुल (४२*धावा) आणि हार्दिक पांड्या (२२ धावा) यांच्या मुळे भारताने लक्ष ४८.१ षटकात ४ गडी राखून गाठले. विराट कोहली या स्पर्धेत दुसऱ्यांदा सामनावीर ठरला. या विजयाने भारतीय संघ गेल्या दोन वर्षातील आयसीसी स्पर्धेच्या चौथ्या फायनल मध्ये पोहोचला होता. ऑस्ट्रेलिया ने मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षणात चुका केल्या. या सामन्यात भारताची फलंदाजी फलंदाजी आणि गोलंदाजी मधील सखोलता आणि लवचिकता ही दिसली. वरुण चक्रवर्ती सारख्या छुप्या  अस्त्राचा खुबीने वापर या स्पर्धेत झाला . या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया च्या स्टीव्ह स्मिथ ने वन डे सामन्यातन आपली निवृत्ती जाहीर केली. भारताच्या या विजयाने आणखी एक गोष्ट झाली ती  म्हणजे यजमान पाकिस्तान असूनही अंतिम सामना पाकिस्तानात होणार नव्हता. यजमान म्हणून ही देखील एक प्रकारची नामुष्की होती.

v  अंतिम सामना: भारत वि न्यूझीलंड, ९ मार्च २०२५

दुबईत झालेल्या या अंतिम सामन्यात न्यूझीलंड ने टॉस जिंकून पहिली बॅटिंग केली. डॅरेल मिशेल (१०१ चेंडूत ८३) मायकेल ब्रेसवेल (४० चेंडूत ५३) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या पैकी कुलदीप ने रचिन रविंद्र  ची घेतलेली विकेट खास लक्षात राहिली. न्यूझीलंड चा डाव ५० षटकात ७ बाद 2५१ धावा केल्या.

धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात स्वप्नवत झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेट साठी शतकी भागीदारी केली आणि विजयाचा पाया घातला. रोहित ने ८३ चेंडूत ७६ धावा केल्या. विराट कोहली, शुभमन गिल नियमित अंतराने बाद होऊन देखील श्रेयस अय्यर (४८ धावा) के एल राहुल (४३* धावा ) यांच्यामुळे भारताने लक्ष ४ विकेट आणि १ षटक बाकी ठेऊन साध्य  केले.


या विजेतेपदाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला. न्यूझीलंड च्या रचिन रविंद्र ला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. भरतकरत ही स्पर्धा अनेक अर्थाने महत्त्वाची ठरली. प्रत्येक सामन्यात वेगवेगळे खेळाडू विजय मिळवून देताना दिसले. हा एक सांघिक विजय ठरला. कोण्या २-३ खेळाडूंच्या कामगिरीवर भारताने ही स्पर्धा जिंकली नाही. सलामीवीर लवकर बाद झाले तर मधल्या फळीने धावा केल्या. कधी मधल्या फळीने खालचे फलंदाज साथीला घेऊन धावसंख्या वाढवली. मुळात दुबई सारख्या ठिकाणी तिथल्या हवामानाचा खेळपट्टीचा आणि परिस्थितीचा भारताने अतिशय कल्पकतेने उपयोग करून घेतला. ४ पूर्णवेळ  फिरकी गोलंदाज, शमी आणि हार्दिक पांड्या ची वेगवान गोलंदाजी याचा अभ्यास प्रतिस्पर्धी संघांना करता आला नाही.

या सतत्यापूर्ण कामगिरी साठी सर्व क्रिककथाच्या वाचकांकडून भारतीय संघाचे पुन्हा एकदा मनपसून अभिनंदन २०२६ च्या टी २० वर्ल्ड कप कडे पाहत – “इजा झाला, बीजा  झाला आता तिज्याची वाट पाहतोय” असे म्हणावेसे वाटते.  

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला