HarshadWrites
Tuesday, December 2, 2025
Sunday, November 30, 2025
किस्से क्रिकेटचे
समर ऑफ '25
बोलंदाजी- क्रिकेट समालोचन काल, आज आणि उद्या
“Dhoni finishes off in style….”, “Carlos Brathwaite! Carlos Brathwaite!! Remember the name…”, “England have won the world cup by the barest of the margins…”, “Kohli goes down the ground, Kohli goes out off the ground….” ही सगळी वाक्य आजही कानावर पडली की आपल्या समोर तो प्रसंग आजही डोळ्यासमोर उभा राहतो... ही सगळी किमया तो प्रसंग वर्णन करणाऱ्या क्रिकेट समालोचकांची. आज आपण या लेखात एकूणच क्रिकेट समालोचन याचा इतिहास आजचे वास्तव आणि भविष्यातील वाटचाल याबाबत माहिती घेणार आहोत. समालोचन ही एक कला आहे. आणि जसे जसे क्रिकेट वाढत गेलं तसं तसं क्रिकेट समालोचन ही विकसित हॉट गेलं. क्रिकेट रसिकांना सामन्याचा अनुभव कसं येतो त्यातील भावना, बारकावे आणि किस्से हे सर्व समालोचनाचे अविभाज्य घटक बनले आहेत.
भारतातील क्रिकेट हे नेहमी भावना , परंपरा आणि नाविन्यावर कसरत करते आहे. क्रिकेट ला मोठे करण्यात समालोचनाची मोठी भूमिका राहिली आहे. रुक्ष, रटाळ आणि संथ समालोचनाची कल्पना करून पहा. छे ! शक्यच नाही.ते नाट्य, प्रेक्षकांचा आवाज, बॅट बॉलला लागल्यानंतरचा आवाज या सर्वाचे हे अद्भुत मिश्रण आहे.
समालोचनाची सुरुवात १९२० – ३० च्या दशकात रेडियो बरोबर झाली. जॉन अर्लॉट, अॅलन मॅकगिलव्रे या दिग्गजांनी त्यांच्या वक्तृत्वाने आणि खास शैलीतून सर्वसामान्य क्रिकेट रसिकांसमोर सामने सादर केले, रंगवले. हे समालोचन क्रिकेट सामन्याचा अहवाल कमी आणि कथाकथन जास्त अश्या प्रमाणात होते. त्यात विनोद, कविता किस्से आणि खेळातील बारकावे यांचे मिश्रण ही होते. यामुळे क्रिकेट रसिकांबरोबर त्यांची एक नाळ जुळली आणि क्रिकेटचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला.
भारतात क्रिकेट समालोचन ची सुरुवात ए. एफ. एस ऊर्फ बॉबी तल्यारखान, नरोत्तम पुरी आणि महाराज ऑफ विझीयानगरम यांनी केली. सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेगौरव कपूर ला दिलेल्या एका पॉडकास्ट मध्ये तल्यारखान यांच्याबाबत आठवण सांगताना म्हणतात की, “अगदी सुरुवातीच्या काळात बॉबी तल्यारखान आपल्या सोबत एक व्हिस्की ची बॉटल घेऊन एकटे संपूर्ण कसोटी सामना समालोचन करायचे पाच दिवस दररोज.” मराठी मध्ये क्रिकेट समालोचन ची परंपरा वि. वि. करमरकर, बाळ. ज. पंडीत , चंद्रशेखर संत यांनी त्यांच्या अनोख्या शैलीने रंगवली. आखूड टप्प्याचा चेंडू,फलंदाजाने सीमापार फटकवला, उंचावरून षटकार मारला अश्या वाक्यांनी अक्षरश: डोळ्यासमोर सामना सुरू असल्याचे जाणवायचे.
पुढे टीव्ही वर सामने सुरू झाले. मग दूरदर्शन च्या राष्ट्रीय वाहिनी वरुन हिंदी- इंग्रजी आलटून पालटून समालोचन होत असे. यातही कालानुरूप अनेक बदल झाले. १९९१ च्या आर्थिक उदरीकरणानंतर अनेक खासगी उपग्रह क्रीडा वाहिन्या सुरू झाल्या. भारताचे परदेशातील क्रिकेट सामने टीव्हीवर दिसू लागले. न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया मधले सामने भल्या पहाटे, इंग्लंड- आफ्रिकेतील सामने दुपारी आणि वेस्ट इंडिज मधील कॅरेबियन बेटावरील सामने संध्याकाळी सुरू होत असत. त्यावेळी भारतीय प्रेक्षक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचन ऐकू लागला. ऑस्ट्रेलियातील बिल लॉरी, रिची बेनो, इयन चॅपल, ग्रेग चॅपल, मार्क निकोलस ते दीर्घकाळ रेडियो समालोचन करणारे मात्र गेल्या काही वर्षात प्रसिद्धी पावलेले केरी - ओ- किफ पर्यन्त ऑस्ट्रेलियन समालोचकांची मांदियाळी भारतीय प्रेक्षकांच्या कानावर पडू लागली. ऑस्ट्रेलियातील समालोचन ऐकून कधी कधी शांतता सुद्धा खूप काही वर्णन करून जाते हे क्रिकेट रसिकांच्या लक्षात आले. या शिवाय इंग्लंड चे टोनी ग्रेग, सर जेफ्री बॉयकॉट, डेविड गावर, डेविड लॉईड, ते अलिकडचे नासिर हुसेन माईक आथरटन पर्यन्त इंग्रजांची समालोचने ऐकू लागली. त्यात वेस्ट इंडिज चे मायकल होल्डिंग, टोनी कोझीएर, जेफ दूजॉ, इयन बिशप यांनी त्यांच्या खास कॅरेबियन लहेजा ने रंगत आणली.
२००३ साली इंग्लंड मध्ये पहिला टी २० सामना खेळला गेला. तो एक प्रकारे एकूणच क्रिकेट खेळासाठी मैलाचा दगड म्हणावा लागेल. कारण त्या सामन्याने जसे क्रिकेट आणि क्रिकेटचे नियम थोडेफार बदलले तसेच क्रिकेट समालोचनात ही बदळ झाले. आधी समालोचन केवळ स्टेडियमवरील एका कॉमेंटरी बॉक्स मधून व्हायचं. पण टी २० मध्ये समालोचन करण्याच्या पद्धतीत ही प्रयोग झाला. खेळाडू क्षेत्ररक्षण किंवा फलंदाजी करत असताना त्याला थेट वर्णन करता येऊ लागले. त्याचे अनेक गमतीदार किस्से ही घडले. असाच एक किस्सा ऑस्ट्रेलियामधील बिग बॅश स्पर्धेत घडला. मिशेल मार्श बॅटिंग करत होता आणि समोर जगद्विख्यात लेग स्पिनर शेन वॉर्न त्याला गोलंदाजी करत होता. इकडून कॉमेंटरी बॉक्स मधून समालोचकांनी शेन वॉर्न ला विचारलं, “आता तू मार्श ला कसा बाद करशील?” त्यावर शेन वॉर्न पुटपुटला, “मी त्याला ऑफ स्टंप च्या बाहेर लेग स्पिन टाकेन. तो मला पुढे सरसावत येऊन मारण्याचा प्रयत्न करेल. या प्रयत्नात तो अयशस्वी ठरला तर यष्टीचीत होईल किंवा जरी मारला तर बॉल हवेत जाऊन मिड विकेट ला झेल बाद होईल.” अक्षरश: वॉर्न बोलला तसाच बॉल त्याने टाकला, मार्श ने पुढे येऊन त्याला उंच फटकावला आणि वॉर्न म्हटल्याप्रमाणे मार्श मिड विकेट ला झेल देऊन बाद झाला. हा चमत्कार, कमाल केवळ समालोचनात आलेल्या तंत्रज्ञानामुळे झाली.
काळ बदलला तस तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाचा क्रिकेट प्रक्षेपण आणि समालोचनात वापर वाढला. उपग्रह वाहिन्या आणि डिजिटल क्रांति मुळे क्रिकेट प्रक्षेपणाचा दर्जा आणखी सुधारला. भारतात क्रिकेट प्रक्षेपण आणि समालोचन हा कायमस्वरूपी चालणारा फायद्यातला व्यवसाय झाला आहे. सुनील गावस्कर, रवी शास्त्री, संजय मांजरेकर, नवज्योत सिंग सिद्धू, अंजुम चोप्रा यांचे सारखे माजी खेळाडू आणि हर्षा भोगले, जतीन सप्रू, संजना गणेशन, मयांती लँगर सारखे समालोचक आता आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामने अगदी सहज सरल भाषेत रसिकांपर्यंत पोहोचवतात. वर्षारंभी संपलेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात या समालोचकांना प्रचंड मागणी होती. आता केवळ टीव्ही हे माध्यम न राहता, मोबाइल, लाईव्ह स्ट्रीमिंग, क्रिकेट वेबसाइट वरचे पॉडकास्ट असे असंख्य मार्गाने क्रिकेट प्रसवले जात असल्याने समालोचक, क्रिकेट जाणकार, विश्लेषक यांना प्रचंड मागणी आहे.
टीव्ही व्यतिरिक्त डिजिटल लाईव्ह स्ट्रीमिंग मुळे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अल्ट्रा स्लो मोशन , पिच मॅप , बॉल ट्रॅकिंग, स्टंप व्हीजन यामुळे क्रिकेट प्रक्षेपण अधिक युझर फ्रेंडली झाले आहे. आता प्रेक्षक स्वत: टीव्हीच्या स्क्रीन वर पाहून पायचीत चे निर्णय कसे चूक की बरोबर हे ओळखू लागला आहे. तंत्रज्ञानाचा अफाट वापर होऊन देखील कसोटी सामन्यातील रोजच्या खेळपट्टीचा आढावा घेताना कार ची चावी खेळपट्टीला पडलेल्या भेगेत घालून ती भेग किती मोठी झाली आहे, ही कल्पकता केवळ इयन चॅपल सारखा अनुभवी समालोचकच दाखवू शकतो.
नजीक च्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I.) आणि आभासी वास्तव (Virtual Reality) याचा खूप वापर होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे सामन्याचे प्रक्षेपण, सादरीकरण, विश्लेषण यात क्रांति होऊ शकते. डिजिटल लाईव्ह स्ट्रीमिंग मुळे प्रादेशिक भाषा आणि उप भाषा मध्ये समालोचन ऐकणे क्रिकेट रसिकांना सहज शक्य झाले आहे. V.R. Headset चा उपयोग करून तुम्ही घरबसल्या स्टेडियम मध्ये सामना पाहत असल्याचा आनंद घेऊ शकता. आपल्याला हव्या त्या अॅंगल ने रिप्ले, rewind, slow motion अश्या सगळ्याचा आनंद घेऊ शकता. तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की आपल्या आवडत्या समालोचकांच्या आवाजात आपण संपूर्ण सामना आपण ऐकू शकतो आणि आपण हे करत आहोत हे त्या समालोचकाला ठाऊक ही नसेल. तो आपल्या कुटुंबाबरोबर मस्त सुट्टी वर असेल. यालाच V.R. 360 experience म्हणता येईल.
जसेजसे क्रिकेट विकसित होईल तसेतसे समालोचन ही विकसित होईल. हा खेळ अजून गतिमान आणि आकर्षक होईल. Airwave असो, V. R. 360 असो किंवा screen असो क्रिकेट रसिकांना आणखी जवळ आणेल, मोठे करेल क्रिकेटचा आत्मा प्रत्येक शब्दाद्वारे प्रतिध्वनित करेल आणि त्याचा वारसा टिकेल हे ही सुनिश्चित करेल.सिंहावलोकन चॅम्पियन्स चे
चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसी च्या एफटीपी मधली अशी एक स्पर्धा आहे जिथे गेल्या काही स्पर्धांपासून केवळ उत्कृष्ट आठ संघ सहभागी होतात आणि पंधरवड्यात आपल्याला विजेता मिळतो. अशी ही स्पर्धा या वर्षी पकिस्तान मध्ये आयोजित केली होती. स्पर्धेत सहभागी संघांचा विचार केला तर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका (२००२ चे संयुक्त विजेते) हे स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत आणि गेले दीड दशक हळूहळू प्रगती करू पाहणारा अफगाणिस्तान या वेळी चॅम्पियन्स ट्रॉफी ल पात्र झाला.
स्पर्धा पाकिस्तानात होणार म्हटल्यावर भारताच्या सहभागाचा प्रश्न होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट चे अर्थकारण बघता भारताशिवाय स्पर्धा घेणं म्हणजे आयसीसी ने आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होतं. म्हणून मग यजमान पाकिस्तान आणि भारताचे सगळे सामने दुबईत असा जुगाड जमला आणि स्पर्धा सुरू झाली. गेल्या जून २०२४ मध्ये वेस्ट इंडिज मध्ये वर्ल्ड टी २० जिंकल्यानंतर भारताची आयसीसी ट्रॉफी ची भूक वाढली होती. या स्पर्धेसाठी भारताची संघनिवड पाहिली असता त्यावर खूप टीका झाली. मूळ संघात तीन तीन स्पिनर आणि वन डे वर्ल्ड कप नंतर पुनरागमन करणारा महमंद शमी हा एकमेव अनुभवी वेगवान गोलंदाज घेऊन जाण्यामागचा विचार भल्याभल्या क्रिकेट पंडितांना पचला नाही रुचला नाही. त्यात भरीस भर म्हणून दुखापतग्रस्त यशस्वी जायस्वाल च्या जागी चौथा स्पिनर वरुण चक्रवर्ती आणला. हे सगळे पाहून गौतम गंभीर वर KKR इफेक्ट च्या चर्चा सुरू झाल्या.आणि अनेक स्वयंघोषित क्रिकेट जाणकारांनी इंस्टा आणि फेसबुक रिल्स च्या माध्यमतून अजून ई – कचरा वाढवायला सुरुवात केली. या लेखात आपण प्रामुख्याने भारताच्या कामगिरीचा मागोवा घेणार आहोत.
v भारत वि बांग्लादेश, २० फेब्रुवारी २०२५
गेल्या काही वर्षात बांग्लादेश कहा संघ अतिशय बेभरवशयचा झाला आहे. कधी कोणत्या दिवशी कसे खेळतील याची कोणीही शाश्वती देत नाही. पण पहिल्याच सामन्यात भारताच्या सुंदर, संयत आणि वेगवान गोलंदाजी मुळे बांग्लादेश ची अवस्था लवकरच ५ बाद ३५ अशी होऊन बसली. त्यानंतर हृदोय आणि जकेर आली च्या भागीदारी मुळे बांग्लादेश च्या डावाला थोडा आकार आला. हृदोय ने ११८ चेंडूत १०० धावा केल्या आणि भारताकडून महंमद शमी ने ५३ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या.
धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात उत्तम झाली. शुभमन गिल ने सुरुवातीपासूनच कमाल फटके मारत एक बाजू लावून धरली. त्याने १२९ चेंडूत १०१ धावा केल्या त्याला के एल राहुल च्या ४१ धावांची चांगली साथ मिळाली आणि भारताने हा सामना ४६.३ षटकात ६ विकेट्स ठेऊन जिंकला. शतकवीर शुभमन गिल ला सामनावीर चा पुरस्कार मिळाला. भारताचा हा विजय परिपूर्ण खेळाचे दर्शन होते. तर दुसरीकडे बंगालदेश ला ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि कचखाऊ फलंदाजी चांगलीच महागात पडली. या विजयामुळे भारताचा पुढच्या फेरीत जाण्याच्या शक्यता बळावल्या. पुढचा सामना न्यूझीलंड कडून स्पर्धेचा पहिला सामना हरलेल्या पाकिस्तान विरुद्ध होता.
v भारत वि पाकिस्तान, २३ फेब्रुवारी २०२५.
या सामन्यात पाकिस्तान ने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग चा निर्णय घेतला आधीच्या सामन्यात न्यूझीलंड चे मोठे आव्हान गाठू न शकलेल्या पाकिस्तान ने बॅटिंग करून मोठा स्कोअर उभा करायचे ठरवले होतं. पण मागच्या सामन्याचे दडपण पाकिस्तान च्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं किंबहुना हा सामना गमावला तर घरच्या मैदानावर एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपली पहिली गच्छंती होणार या भीतीने पाकिस्तान कहा डाव अतिशय संथ आणि कंटाळवणा झाला होता. ३ बाद १५१ वरुन सर्वबाद २४१ हे केवळ पाकिस्तान च करू शकतो हे त्या दिवशी पुन्हा क्रिकेट जगताने पाहिलं. भारताकडून शमी वगळता सर्वानी विकेट्स घेतल्या मो. रिझवान आणि सौद शकिल यांनी १०४ धावांची भागीदारी केली पण ती अतिशय संथ भागीदारी झाली.
२४२ धावांचे माफक आव्हान घेऊन उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात छान झाली. जलदगतीने ४६ धावा झाल्यानंतर किंग कोहली ने धावांचा पाठलाग आपल्या हाती घेत शतकी खेळी करत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. त्याला श्रेयस अय्यर च्या ५६ धावांची साथ मिळाली. विराट कोहली ला शतक आणि दोन झेल या कामगिरी साठी सामनावीर घोषित करण्यात आले. या विजयामुळे भारताचा सलग दूसरा विजय आणि पाकिस्तान चा सलग दूसरा पराभव यामुळे भारत उपांत्य फेरीत दाखल झाला आणि पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर झाला. घरच्या मैदानवर सगळ्यात आधी स्पर्धेतून बाद व्हायची नामुष्की पाकिस्तान वर ओढावली .
v भारत वि न्यूझीलंड, २ मार्च २०२५
एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर भारताचा गटसाखळीतला शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होता. परंपरा नुसार भारताने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आणि पहिल्यांदा बॅटिंग करावी लागली. भारताची अवस्था ७ व्या षटकात ३ बाद ३० अशी झाली आणि यावेळी श्रेयस अय्यर ने सुरेख फलंदाजी करत ७९ धावा केल्या त्याला हार्दिक पांड्या , अक्षर पटेल, जडेजा आणि के एल राहुल ची चांगली साथ मिळाली. भारताचा डाव ९ बाद २४९ वर संपला.
प्रत्युत्तरदाखल न्यूझीलंड ची सुरुवात अडखळत झाली. आणि केन विल्यमसन ने एक बाजू लावून धरली.पण दुसरीकडून नियमित फलंदाज बाद होत गेले. या सामन्यात पहिल्यांदा वरुण चक्रवर्ती ला संघात स्थान मिळाले. त्याच्या गोलंदाजी पुढे किवी संघाने सपशेल हार पत्करली. वरुण ने ४२ धावांत ५ विकेट्स घेतल्या त्याला जडेजा, कुलदीप यादव ने मधल्या षटकात दबाव आणून महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. किवींचा संघ ४७.२ षटकात २०५ धावांत गार्ड झाला आणि भारताने हा सामना ४४ धावांनी जिंकला. वरुण चक्रवर्ती च्या ५ विकेट्स घेण्याच्या कामगिरीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या विजयामुळे भारताचे गटातील अव्वल स्थान निश्चित झाले. या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया, आणि द. आफ्रिका दुबईला आले होते. कारण कोण भारत विरुद्ध उपांत्य सामना खेळणार हे निश्चित नसल्यामुळे तीन संघ या सामन्याच्या निकालाची वाट पाहत होते. आणि हा प्रवास ही काही काळ चर्चेचा विषय ठरला होता. न्यूझीलंड चा पराभव झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उपांत्य सामना खेळण्यासाठी पाकिस्तान ला रवाना झाले.
v उपांत्य फेरी: भारत वि ऑस्ट्रेलिया ४ मार्च २०२५
२०२३ ची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, भारतीय भूमीवर चा वन डे वर्ल्ड कप फायनल मधले पराभव अजूनही ताजे असताना वन डे फॉरमॅट मध्ये ऑस्ट्रेलिया ला फायनल ला न पोहचू द्यायची नामी संधी भारतीय संघाला मिळाली होती. या आधी बऱ्याच वेळा भारत ऑस्ट्रेलिया असे महत्त्वाच्या सामन्यात आंने सामने आले होते. पण, बहुतांश वेळी ऑस्ट्रेलिया ची सरशी झाली होती. या वेळी पुन्हा एक संधी चालून आली. टॉस जिंकल्यावर ऑस्ट्रेलिया ने पहिल्यांदा बॅटिंग घेतली. त्यांनी ४९.३ षटकात सर्व बाद २६४ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ ने सर्वाधिक ७३ आणि त्याला अॅलेक्स केरी ने ६१ धावा करून ऑस्ट्रेलिया च्या डावाला आकार दिला. बाकीच्या सर्व फलंदाजांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला. शमी ने ४८ धावांत ३ तर चक्रवर्ती आणि जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
भारताच्या डावाची सुरुवात स्थिर झाली शुभमन गिल बाद झाल्यावर विराट कोहली ने रोहित (२८ धवा ) आणि श्रेयस अय्यर (४५ धावा ) यांच्या मदतीने डाव सावरला. कोहली ने ९८ चेंडूत ८४ धावांची उत्कृष्ट संयमी खेळी केली. के एल राहुल (४२*धावा) आणि हार्दिक पांड्या (२२ धावा) यांच्या मुळे भारताने लक्ष ४८.१ षटकात ४ गडी राखून गाठले. विराट कोहली या स्पर्धेत दुसऱ्यांदा सामनावीर ठरला. या विजयाने भारतीय संघ गेल्या दोन वर्षातील आयसीसी स्पर्धेच्या चौथ्या फायनल मध्ये पोहोचला होता. ऑस्ट्रेलिया ने मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षणात चुका केल्या. या सामन्यात भारताची फलंदाजी फलंदाजी आणि गोलंदाजी मधील सखोलता आणि लवचिकता ही दिसली. वरुण चक्रवर्ती सारख्या छुप्या अस्त्राचा खुबीने वापर या स्पर्धेत झाला . या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया च्या स्टीव्ह स्मिथ ने वन डे सामन्यातन आपली निवृत्ती जाहीर केली. भारताच्या या विजयाने आणखी एक गोष्ट झाली ती म्हणजे यजमान पाकिस्तान असूनही अंतिम सामना पाकिस्तानात होणार नव्हता. यजमान म्हणून ही देखील एक प्रकारची नामुष्की होती.
v अंतिम सामना: भारत वि न्यूझीलंड, ९ मार्च २०२५
दुबईत झालेल्या या अंतिम सामन्यात न्यूझीलंड ने टॉस जिंकून पहिली बॅटिंग केली. डॅरेल मिशेल (१०१ चेंडूत ८३) मायकेल ब्रेसवेल (४० चेंडूत ५३) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या पैकी कुलदीप ने रचिन रविंद्र ची घेतलेली विकेट खास लक्षात राहिली. न्यूझीलंड चा डाव ५० षटकात ७ बाद 2५१ धावा केल्या.
धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात स्वप्नवत झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेट साठी शतकी भागीदारी केली आणि विजयाचा पाया घातला. रोहित ने ८३ चेंडूत ७६ धावा केल्या. विराट कोहली, शुभमन गिल नियमित अंतराने बाद होऊन देखील श्रेयस अय्यर (४८ धावा) के एल राहुल (४३* धावा ) यांच्यामुळे भारताने लक्ष ४ विकेट आणि १ षटक बाकी ठेऊन साध्य केले.
या विजेतेपदाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य राहीला. न्यूझीलंड च्या रचिन रविंद्र ला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. भरतकरत ही स्पर्धा अनेक अर्थाने महत्त्वाची ठरली. प्रत्येक सामन्यात वेगवेगळे खेळाडू विजय मिळवून देताना दिसले. हा एक सांघिक विजय ठरला. कोण्या २-३ खेळाडूंच्या कामगिरीवर भारताने ही स्पर्धा जिंकली नाही. सलामीवीर लवकर बाद झाले तर मधल्या फळीने धावा केल्या. कधी मधल्या फळीने खालचे फलंदाज साथीला घेऊन धावसंख्या वाढवली. मुळात दुबई सारख्या ठिकाणी तिथल्या हवामानाचा खेळपट्टीचा आणि परिस्थितीचा भारताने अतिशय कल्पकतेने उपयोग करून घेतला. ४ पूर्णवेळ फिरकी गोलंदाज, शमी आणि हार्दिक पांड्या ची वेगवान गोलंदाजी याचा अभ्यास प्रतिस्पर्धी संघांना करता आला नाही.
या सतत्यापूर्ण कामगिरी साठी सर्व क्रिककथाच्या वाचकांकडून भारतीय संघाचे पुन्हा एकदा मनपसून अभिनंदन २०२६ च्या टी २० वर्ल्ड कप कडे पाहत – “इजा झाला, बीजा झाला आता तिज्याची वाट पाहतोय” असे म्हणावेसे वाटते.
-
जवळ जवळ तीन चार वर्ष झाले रोजच्या अनुभवातून आमचे फ्रेंड फिलॉसोफर आणि गाईड दीपक पंडीत आणि एक साधारण पाचशे एक पत्रिका डोळ्याखालून घातल्यावर मा...
-
सुप्रभात, बऱ्याच दिवसांनी काही तरी डोक्याला खाद्य मिळालं म्हणून हा ब्लॉग लिहित आहे. आणि कृष्णमूर्ती पद्धत नाही तुम्हाला आम्हाला कुठल्याही स...