पूर्वेतिहास
क्रिकेट तस सतराव्या शतकापासून इंग्लंड मध्ये खेळलं जातंय.. पण ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणामुळे क्रिकेट सर्वदूर पसरले.. आजच्या तारखेला १०८ देशात क्रिकेट खेळलं जातं. अश्या या विस्तारलेल्या खेळातली सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे क्रिकेट विश्वचषक अर्थात वर्ल्ड कप.. दर चार वर्षांनी भरणारा हा क्रिकेटचा कुंभमेळा नक्की कधी आणि कसा सुरू झाला ते आपण पाहूया..
क्रिकेटची पहिली मॅच आश्चर्य म्हणजे कॅनडा आणि अमेरिका यांच्यात सप्टेंबर १८४४ साली खेळली गेल्याची नोंद आहे. तर पहिली अधिकृत कसोटी सामना १८७७ साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे खेळला गेला.. त्यालाच आज आपण एशेस म्हणतो. कालांतराने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ होत गेली दक्षिण आफ्रिका १८८९, वेस्ट इंडिज १९२८, न्यूझीलंड १९३०, भारत १९३२, पाकिस्तान १९५२ अशी संघ वाढत गेले.. दरम्यान १९०० सालच्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट चा समावेश झाला आणि आणखी आश्चर्य म्हणजे क्रिकेट चे एकमेव ऑलिम्पिक सुवर्ण फ्रांस कडे आहे. १९६० च्या दशकात क्रिकेट थोडे वेगवान आणि मर्यादित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्याची सुरुवात कौंटी क्रिकेट पासून झाली ८ चेंडूंचे अष्टक असलेली ४० ओव्हर चे सामने खेळवले जाऊ लागले.. त्याची लोकप्रियता आणि विविध देशात मर्यादीत ओव्हर्स च्या सामन्यांची लोकप्रियता वाढल्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. १९७१ साली ऑस्ट्रेलिया च्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड वर पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला गेला.. आणि आयसीसी ला वर्ल्ड कप चे डोहाळे लागले...
प्रुडेन्शियल पर्व(१९७५-१९८३):
वर्ल्ड कप आयोजनाचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आयोजक आणि प्रायोजक दोघांची गरज असते. १९७० च्या दशकात इंग्लंड इतका सक्षम आयोजक त्या काळात नव्हता आणि ब्रिटिश इन्श्युरन्स कंपनी प्रुडेन्शियल च्या पुढाकाराने पहिला विश्वचषक इंग्लंड मध्ये १९७५ साली खेळला गेला.
वेस्ट इंडिज पहिला मानकरी (१९७५)
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, कॅनडा आणि पूर्व आफ्रिका हे आठ संघ पहिला विश्वचषक खेळले.. वर्णद्वेषाची पार्श्वभूमी असलेल्या दक्षिण आफ्रिकेवर क्रीडा जगताने बहिष्कार टाकल्याने दक्षिण आफ्रिका हा विश्वचषक खेळू शकली नाही.भारत श्रीनिवास वेंकटराघवन यांच्या नेतृत्वात पहिली स्पर्धा खेळला. पहिल्या स्पर्धेत भारताने पूर्व आफ्रिका विरुद्ध चा एकमेव सामना जिंकला आणि परतीची वाट धरली. कृष्णामचारी श्रीकांत च्या शब्दात पूर्व आफ्रिका हौशी गुजरात्यांचा संघ होता.. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड,वेस्ट इंडिज यांनी उपांत्य फेरी गाठली.
पहिल्या वर्ल्ड कप ची पहिली फायनल ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाली, क्लाइव्ह लॉइड कॅब्या वेस्ट इंडिज ने ऑस्ट्रेलिया ला १८ धावांनी हरवून पहिल्या विश्वचषकावर आपले नाव कोरले..
दुबार वेस्ट इंडिज (१९७९):
दुसरी स्पर्धा पुन्हा चार वर्षांनी इंग्लंड मध्ये प्रुडेन्शियल ने प्रायोजित केली होती. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड,वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा हे आठ संघ दोन गटात विभागले गेले १२ गटवार साखळी सामन्यानंतर इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत पोहोचले अंतिम सामना यावेळी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान झाला. भारत या स्पर्धेत आपले तिन्ही सामने हरला आणि मोकळ्या हाती परतला.. कसोटी न खेळणाऱ्या श्रीलंके कडून भारताला या स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला.
अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज ने विव रिचर्डस च्या शतकाच्या जोरावर इंग्लंड ला ९२ धावांनी पराभूत करून सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.
वेस्ट इंडीज च्या हॅट्ट्रिक ला कपिल्स डेविल्स चा खो (१९८३):
सलग तिसऱ्यांदा स्पर्धा इंग्लंड मध्ये आयोजित होत असताना प्रुडेन्शियल ट्रॉफी चा ही शेवटची स्पर्धा होती. स्पर्धा सुरू होताना सगळ्यांना जवळपास खात्री होती की वेस्ट इंडिज हॅट्ट्रिक करणार वेगवान गोलंदाजांचा तोफखाना आणि बेदरकार फलंदाजी करणारे फलंदाज यांच्या जोरावर वेस्ट इंडिज कोणालाही लोळवेल अशी सगळ्यांना खात्री होती. स्पर्धा सुरू झाली आणि वेस्ट इंडिज ला पहिला धक्का बसला. मागच्या दोन स्पर्धा हजेरी लावणाऱ्या भारताकडून साखळीतील एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.. भारत आपल्या गटातील इतर संघ ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे यांच्या विरुद्धचे अनुक्रमे एक आणि दोन सामने जिंकून गटात दुसरे राहून उपांत्य फेरीत पोहोचले.. या दरम्यान झिम्बाबवे विरुध च्या एका सामन्यात ५ बाद १७ अशी स्थिती असताना कपिल ने १७५* धावांची खेळी केली जी भारतीय क्रिकेट इतिहासात अजरामर आहे... दुर्दैवाने त्या दिवशी बीबीसी च्या कर्मचाऱ्यांचा संप असल्याने त्या मैदानावर उपस्थित असलेले क्रिकेट रसिक फक्त त्या खेळीचे साक्षीदार आहेत. उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंड शी पडली, कपिल ची बॉलिंग आणि संदीप पाटील मोहिंदर अमरनाथ च्या महत्त्वपूर्ण धावांमुळे भारत अंतिम फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध उतरला.
अंतिम सामन्यात भारताची फलंदाजी फारशी बहरली नाही रडतखडत श्रीकांत, अमरनाथ, संदीप पाटील, मदनलाल, किरमाणी यांनी धावसंख्या १८३ पर्यंत पोहोचवली.. मध्यंतराला संपूर्ण भारत देशाने आशा सोडून दिली होती.. १८३ धावा वेस्ट इंडिज ६० षटकात आरामात करेल म्हणून लोकांनी टीव्ही बंद करून आपल्या कामाला लागले. १८३ चा पाठलाग करताना वेस्ट इंडिज १ बाद ५० अश्या सुस्थितीत होता. नंतर मात्र आधी डेसमंड हेन्स आणि आणखी पाच धावा करून कपिल च्या त्या आश्चर्यकारक कॅच ने सामना बघता बघता भारतच्या पारड्यात वळला होता. भारत आणि इतिहास यांच्यात फक्त एक जण उभा होता वेस्ट इंडिज चा किपर जेफ दुजॉन.. त्याचा अडसर ११९ धावा असताना जिमी अमरनाथ ने दूर केला आणि १८३ धावा आता वेस्ट इंडिज ला अशक्यप्राय वाटू लागल्या अखेर १४३ धावात वेस्ट इंडिज चा डाव संपला आणि क्रिकेट विश्वाला नवा कोरा विश्वविजेता संघ भारत मिळाला..
हे सारं कल्पनेच्या पलीकडलं होतं.. स्पर्धा सुरू होताना कोणी म्हटलं असतं भारत विश्वचषक जिंकेल तर लोकांनी आणि स्वतः खेळाडूंनी त्याला वेड्यात काढला असता. कोट्यवधी भारतीयांच्या सामर्थ्याचे प्रतीक म्हणून कपिल लोर्ड्स च्या गॅलरीत विश्वचषक घेऊन उभा होता...
ऑस्ट्रेलिया चा श्रीगणेशा (१९८७):
आजच्या काळात ५० षटकांचा एकदिवसीय सामना पहिल्यांदा या स्पर्धेपासून सुरू झाला. पहिल्यांदा स्पर्धा इंग्लंड च्या बाहेर आली. आणि प्रुडेन्शियल हे नाव जाऊन ही स्पर्धा रिलायन्स कप म्हणून ओळखली गेली. आठ संघांची दोन गटात विभागणी आणि गटात दुहेरी साखळी अश्या प्रकारात ही स्पर्धा खेळवली गेली. भारत पाकिस्तान संयुक्त यजमान, जोडीला इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, झिम्बाबवे, वेस्ट इंडिज हे आठ संघ सहभागी झाले भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचले लाहोर येथे पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया ने पाकिस्तान ला हरवून अंतिम फेरी गाठली मुंबईत वानखेडे स्टेडियम वर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ग्रॅहम गुच आणि माईक गॅटिंग यांच्या बहारदार फलंदाजी मुळे इंग्लंड ने भारताला ३५ धावांनी पराभूत केले.. अंतिम सामन्यात दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आमनेसामने आले..
कलकत्त्याच्या इडन गार्डन वर माईक गॅटिंग चा एक रिव्हर्स स्वीप शॉट चुकला आणि इंग्लंड च्या हातातोंडाशी आलेला वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया ने ७ धावांनी जिंकून आपला पहिला विश्वचषक जिंकला..
कॉर्नर्ड टायगर्स ची फिनिक्स भरारी (१९९२):
ही स्पर्धा सर्वार्थाने नाविन्यपूर्ण होती पहिल्यांदाच स्पर्धेचे आयोजन दक्षिण गोलार्धात ऑस्ट्रेलियन खंडात झाले होते. कॅरी पेकर ची सर्कस सुरू होऊन आता १५ वर्ष झाली होती. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच सहभागी झाली होती. पांढरे कपडे जाऊन रंगीत पोशाख, पांढरा चेंडू, काळा साईट स्क्रीन, दिवस रात्र प्रकारात सामने, आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे गटवार साखळी जाऊन सगळे सहभागी ९ संघ एकमेकांशी एकदा खेळले. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, झिम्बाबवे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे नऊ संघ स्पर्धेत सहभागी झाले. भारतीय संघ महंमद अझरुद्दीन च्या नेतृत्वात सहभागी झाला. या स्पर्धेत काही विलक्षण लक्षात राहणाऱ्या गोष्टी म्हणजे भारत- पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी पहिल्यांदा विश्वचषकात आमनेसामने आले. या सामन्यात किरण मोरे - जावेद मियाँदाद च्या माकड उड्या सगळ्यांनी पहिल्या. दुसरीकडे स्पर्धेचा फॉरमॅट पाहता प्रत्येक संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी किमान पाच सामने जिंकणे अत्यावश्यक होते. न्यूझीलंड सर्वाधिक ७ सामने जिंकून अव्वल राहिले तर पाकिस्तानने पहिले तीन सामने गमावल्यानंतर आणि इंग्लंड विरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यावर जोरदार मुसंडी मारत पुढचे सलग सामने जिंकत चौथ्या नंबर वर उपांत्य फेरीत दाखल झाले. न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत खेळले, पदार्पणात उपांत्य फेरी गाठून दक्षिण आफ्रिका ने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. उपांत्य फेरीत पाकिस्तान ने न्यूझीलंड ला लीलया हरवले पण चर्चा झाली ती दुसऱ्या उपांत्य सामन्याची. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातला हा सामना वादग्रस्त "रेन रुल" मुळे चर्चेत राहिला. २५२ धावांचे लक्ष गाठत असताना दक्षिण आफ्रिकेच्या डावात पावसाचा व्यत्यय आला आणि १३ चेंडूत २२ हे समीकरण अचानक १ चेंडूत २२ असे अन्याय कारक ठरले. इंग्लंड ने अंतिम फेरीत सलग दुसऱ्या वेळी प्रवेश केला. समोर इम्रान खान च्या प्रेरणेने उभा राहिलेला आणि एकवेळ स्पर्धेबाहेर जाईल अशी शक्यता असलेला कॉर्नर्ड टायगर्स म्हणून संबोधलेला पाकिस्तान चा संघ.. इम्रान खान- जावेद मियाँदाद च्या भागीदारी मुळे इंग्लंड ला २५० धावांचे लक्ष मिळाले.
इंग्लंड ची सुरुवात निराशाजनक झाली ४ बाद ६९ अशी स्थिती असताना, अॅलन लॅम्ब आणि फेअरब्रदर ने ७१ धावांची भागीदारी करून इंग्लंड ला सामन्यात जिवंत ठेवले.. अखेर वसीम अक्रम, अकीब जावेद आणि इम्रान खान यांनी इंग्लंड चा डाव गुंडाळला आणि पाकिस्तान पहिल्यांदा विश्वविजेता ठरला..
लंकन लायन्स ची गरुडझेप (१९९६):
विश्वचषक स्पर्धा ९ वर्षांनी पुन्हा एकदा भारतीय उपखंडात आली. भारत पाकिस्तान, श्रीलंका संयुक्त यजमान होते एकूण १२ संघ सहभागी झाले कसोटी खेळणारे ९ देश यांच्या जोडीला केनिया, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड यांनी स्पर्धेत भाग घेतला. १२ संघ दोन गटात विभागले जाऊन प्रत्येक गटातले चार संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल होणार होते गटसाखळी स्पर्धा पार पडल्यावर भारत, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड हे आठ संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले. योगायोगाने भारत- पाकिस्तान पुन्हा एकदा उपांत्यपूर्व फेरीत एकमेकांशी लढले त्या सामन्यात चिन्नास्वामी मैदानावर अमीर सोहेल- व्यंकटेश प्रसाद यांच्यातील कलगीतुरा आणि अजय जडेजा ने वकार युनूस ला फटकावलेले षटकार चांगलेच गाजले. इतर सामन्यात श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आपआपले सामने जिंकून उपांत्य फेरीत दाखल झाले. भारत- श्रीलंका, ऑस्ट्रेलिया- वेस्ट इंडिज अश्या लढती निश्चित झाल्यानंतर सर्व लक्ष ईडन गार्डन्स वर होतं भारत श्रीलंकेविरुद्ध खेळत होता पहिली फलंदाजी करताना अरविंद डिसिल्व्हा, रोशन महानामा, रणतुंगा यांच्या फटकेबाजी जोरावर श्रीलंका ८ बाद २५१ पर्यंत पोहोचली. धावांचा पाठलाग करताना भारत एकवेळ १ बाद ९८ अश्या सुस्थितीत होता त्यानंतर मात्र जयसूर्या, धर्मसेना, अरविंद डिसिल्व्हा यांच्या फिरकी पुढे भारत ८ बाद १२० अश्या लाजिरवण्या स्थितीत पोहोचला.. विनोद कांबळी चा रडका चेहरा सगळ्यांनी टीव्हीवर पाहिला. इडन गार्डन्स चे स्टँड प्रेक्षकांनी पेटवून दिले अखेर सामनाधिकारी क्लाइव्ह लॉइड यांनी सामना श्रीलंकेला बहाल केला.. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ने सुरक्षेच्या कारणास्तव आपला श्रीलंके विरुद्धचा साखळी सामना श्रीलंकेला बहाल केला. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज ने ऑस्ट्रेलिया विरूद्ध चा आपला सामना अखेरच्या काही षटकात ५ धावांनी गमावला.
अंतिम सामन्यात मार्क टेलर च्या ७४ धावांचा खेळीने ऑस्ट्रेलिया २४१/७ अशी समाधान कारक धावसंख्या उभी करू शकली. अरविंद डिसिल्व्हा ने अंतिम सामन्यात शतक करून श्रीलंकेला पहिल्यांदा विश्वविजेता झाली..
ऑस्ट्रेलियन दादागिरी ची सुरुवात (१९९९):
ही स्पर्धा १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा इंग्लंड मध्ये आली आणि " आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप " या अधिकृत नावाने ओळखली गेली. स्पर्धेत ९ कसोटी खेळणारे देश सोबत केनिया, बांगलादेश, स्कॉटलंड असे बारा देश खेळले. स्पर्धेचा फॉरमॅट थोडा बदलला आधी गट साखळी आणि नंतर सुपर सिक्स अशी मांडणी झाली यात गट साखळीत मिळवलेले विजय अतिशय महत्त्वाचे ठरणार होते. भारत तिसऱ्यांदा अझरुद्दीन च्या नेतृत्वात सहभागी झाला.
गटसाखळीतील एका सामन्यात सचिन तेंडुलकर आपल्या वडिलांच्या निधनानंतर केनिया विरुद्ध खेळला आणि शतक केले.. गटसाखळी तुन भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाबवे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड,पाकिस्तान सुपर सिक्स साठी पात्र झाले. भारताने दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाबवे दोघांविरुद्ध आपले गटसाखळीतील सामने गमावल्याने अडचणीत होता सुपर सिक्स मध्ये फक्त पाकिस्तान विरुद्ध चा सामना जिंकता आल्याने व ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कडून पराभूत झाल्याने भारताची वाटचाल सुपर सिक्स मध्ये संपली. सुपर सिक्स मध्ये आणखी एक चर्चेतला सामना म्हणजे ऑस्ट्रेलिया- दक्षिण आफ्रिका
या सामन्यामुळे खरतर ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचली. एकवेळ अशी होती की ऑस्ट्रेलिया ला सलग सगळे सामने जिंकणे अत्यावश्यक होते त्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यापासून झाली.. या सामन्यात हर्शल गिब्ज ने स्टीव्ह वॉ चा सोडलेल्या कॅच चे कवित्व आजही संपलेल नाही..
सुपर सिक्स मधून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत आले. पाकिस्तान ने सईद अन्वर च्या शतकाच्या जोरावर आणि भेदक गोलंदाजी च्या जोरावर न्यूझीलंड ला झोपवले.. दुसऱ्या उपांत्य सामन्यात खरा रोमांच होता. ऑस्ट्रेलिया ने पहिली फलंदाजी करताना सर्वबाद २१३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला फायनल दिसत होती सुरुवात ही चांगली झाली होती. बिनबाद ४८ धावा असताना शेन वॉर्न १३व्या षटकात बॉलिंग ला आला आणि २१ व्या षटकापर्यँत ४ बाद ६१ अशी दक्षिण आफ्रिकेची अवस्था झाली. पण पॉलोक, कालीस, ऱ्होड्स , क्लुजनर यांनी किल्ला लढवला. अखेरच्या काही षटकात क्लुजनर अक्षरशः ऑस्ट्रेलियन बॉलिंग वर तुटून पडला.. शेवटच्या षटकात अॅलन डोनाल्ड क्लुजनर ने मारलेला बॉल कडे बघत बसला आणि २१३ धावसंख्येवर आफ्रिकेचा डाव संपला.
सुपर सिक्स मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवल्यामुळे सामना टाय होऊन ही ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात पोहोचली..
अंतिम सामन्यात पाकिस्तान ने ऑस्ट्रेलिया ला १३२ धावांचे माफक आव्हान ठेवले जे ऑस्ट्रेलिया ने ९ विकेट राखून सहज पार केले आणि ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज नंतर दोन विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला..
भारताचे स्वप्नभंग (२००३):
स्पर्धा पहिल्यांदाच आफ्रिका खंडात आयोजित केली गेली दक्षिण आफ्रिका, केनिया, झिम्बाबवे संयुक्त यजमान होते आणि १० कसोटी खेळणारे संघ सोबत केनिया, नामीबिया, नेदरलँड, कॅनडा असे १४ देश सहभागी झाले गटसाखळी आणि सुपर सिक्स अशी स्पर्धेची रचना होती.. भारत, ऑस्ट्रेलिया, झिम्बाबवे, श्रीलंका, न्यूझीलंड, केनिया सुपर सिक्स साठी पात्र ठरले . स्पर्धा सुरू व्हायच्या आधी पासून भारत- ऑस्ट्रेलिया अंतिम सामना होईल अशी चर्चा होती. भारत सौरव गांगुली च्या नेतृत्वात आणि तरुण खेळाडू घेऊन खेळला..१ मार्च २००३ चा महाशिवरात्री च्या दिवशी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध चा सामना पिढ्यानपिढ्या चर्चिला जाईल.. सचिन च्या ९८ धावा सईद अन्वर च्या शतकावर त्या दिवशी भारी पडले.. सचिन ने अँड्र्यू काडीक ला मारलेला षटकार आणि शोएब आखतर ला मारलेला अप्पर कट स्पर्धेची हायलाईट ठरली.
झिम्बाबवे विरुद्ध जिंकलेला सामना आणि सुपर सिक्स मधील केनिया, न्यूझीलंड, श्रीलंकेविरुद्ध चे विजय भारताला उपांत्य फेरीत घेऊन गेले. या स्पर्धेत न्यूझीलंड ने केनिया वर बहिष्कार टाकल्याने केनिया ला त्याचा फायदा झाला आणि केनिया आश्चर्यकारक रित्या उपांत्य फेरीत दाखल झाला. भारत- केनिया, ऑस्ट्रेलिया- श्रीलंका अशी उपांत्य लढती झाल्या. कर्णधार सौरव गांगुली ने शतक करून भारताला अंतिम सामन्यात नेले. ऑस्ट्रेलिया ने श्रीलंकेला हरवून अंतिम फेरी गाठली.
२३ मार्च २००३ ला अंतिम सामन्यात सौरव गांगुली ने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, झहीर खान ची ती पहिली ओव्हर अजूनही झोप उडवते. वाईड बॉल टाकून पहिल्या ओव्हर पासून सामना ऑस्ट्रेलिया च्या बाजूने झुकला. नंतर रिकी पॉंटिंग, डेमियन मार्टिन यांनी शतके करून भारतासमोर ३६० धावांचे लक्ष ठेवले. प्रत्युत्तर देताना सचिन पहिल्या ओव्हर मध्ये मॅक्ग्रा कडून बाद झाला, नंतर सेहवाग ची एकाकी लढाई कमी पडली आणि १९८३ नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले..
ऑस्ट्रेलिया ची अजेय हॅट्ट्रिक (२००७):
विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदाच कॅरेबियन बेटावर आयोजित केली गेली या स्पर्धेत बऱ्याच गोष्टी वादग्रस्त ठरल्या. नियोजन, स्पर्धेची रचना, स्पर्धेची लांबी आणि टीव्ही प्रक्षेपणाला अडचणीची ठरणारी रात्री ची वेळ या सगळ्या मुळे ही स्पर्धा सगळ्यात कंटाळवाणी ठरली असे बरेच जाणकार म्हणतात. या स्पर्धेत १० कसोटी संघ या शिवाय स्कॉटलंड, बर्म्युडा, नेदरलँड, आयर्लंड, कॅनडा,केनिया असे तब्बल १६ संघ सहभागी झाले यांची चार गटात विभागणी झाली. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ सुपर एट मध्ये खेळले.. गटसाखळीत भारताचा बांगलादेश, श्रीलंका कडून झालेला पराभव आणि पाकिस्तान चा वेस्ट इंडिज, आयर्लंड विरुद्ध झालेला पराभव दोन्ही संघाना स्पर्धेबाहेर घेऊन गेला. पाकिस्तान च्या गच्छंती नंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान चे प्रशिक्षक बॉब वुलमर हॉटेल मध्ये मृतावस्थेत आढळले..गट साखळीतील एका सामन्यात हर्शल गिब्ज ने नेदरलँड च्या डॅन व्हॅन बुंग याला एक षटकात सहा षटकार मारले..
गट साखळीतील ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, आयर्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका सुपर एट या टप्प्यासाठी पात्र ठरले.. सुपर एट मध्ये बांगलादेश ने दक्षिण आफ्रिकेला पराभावाचा धक्का दिला..
सुपर एट मधून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, आणि श्रीलंका उपांत्य फेरीत दाखल झाले श्रीलंकेने महेला जयवर्धने च्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंड ला मात दिली, ऑस्ट्रेलिया ने पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला सहज हरवले. बार्बाडोस च्या ब्रिजटाऊन मध्ये अंतिम सामना झाला ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका मध्ये ही १९९६ ची पुनरावृत्ती होती, मात्र यावेळी ऑस्ट्रेलिया विजयी ठरले..
पहिल्यांदा फलंदाजी करताना ऍडम गिलख्रिस्ट याने ग्लोव्हज मध्ये स्क्वॅश बॉल घालून धडाकेबाज शतक ठोकले. श्रीलंकेच्या डावात पावसाचा व्यत्यय आला आणि सामना डकवर्थ ल्युईस नियमाने खेळवला गेला. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे पाच संपलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ने श्रीलंकेला ५३ धावाने हरवून ऑस्ट्रेलिया ने सलग तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला आणि हॅट्ट्रिक पूर्ण केली..
ही स्पर्धा जिंकताना १९९९ च्या स्पर्धेपासून ऑस्ट्रेलिया एकही सामना हरली नव्हती...
सचिन ची स्वप्नपूर्ती (२०११):
सचिनच्या २२ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत कमतरता होती ती एका विश्वचषकाची.. एकीकडे समकालीन पॉंटिंगने तीन, इंझमाम, जययसूर्या ने प्रत्येकी एक विश्वचषक जिंकला असताना सचिन ची झोळी २२ वर्षांनंतरही रिकामीच होती.. २००७ च्या लाजिरवण्या एग्झिट नंतर सचिन ची ही अखेरची संधी होती ती देखील घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर.. १५ वर्षांनी भारतात विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार होती.. सोबत श्रीलंका बांगलादेश हे सहयजमान होते एकूण संघाची संख्या १४ होती गट साखळी, आणि बाद फेरी अशी स्पर्धेची रचना होती. या विश्वचषकात काही धक्कादायक निकाल लागले इंग्लंड बांगलादेश आणि आयर्लंड कडून पराभूत झाले. दक्षिण आफ्रिकेने भारताला नमवले, पाकिस्तान आपले सर्व गटातील सामने श्रीलंकेत खेळला.. गटसाखळीनंतर ऑस्ट्रेलिया,भारत,न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड बाद फेरीत पोहोचले. भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी अहमदाबाद च्या मोटेरा मैदानावर होता.. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा बॅटिंग करताना पॉंटिंग च्या शतकाने ६ बाद २६० पर्यंत पोहोचली. धावांचा पाठलाग करताना धोनी सहित निम्मा संघ २०० च्या अलीकडेच गडगडला होता.. अखेर युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनी सहाव्या विकेट साठी ७४ धावांची अभेद्य भागीदारी करून भारत उपांत्य फेरीत दाखल झाला, इतर सामन्यात पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड यांनी सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली.. पाकिस्तान विरुद्ध च्या उपांत्य सामन्यात सचिन ने महत्त्वपूर्ण ८५ धावा केल्या भारत ९ बाद २६०, वहाब रियाझ ने पाच बळी टिपले होते.. पाकिस्तान ने हाफिज, शफीक, मिसबाह उल हक यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या गोलंदाजी समोर पाकिस्तान २३१ धावात गारद झाला आणि अब्जावधी भारतीयांच्या स्वप्नाच्या मध्ये उभी होती फक्त श्रीलंका...
अंतिम सामना मुंबई च्या वानखेडे मैदानावर खेळला गेला दिवस होता २ एप्रिल २०११ अंतिम सामन्यात दोनदा नाणेफेक झाली कारण प्रेक्षकांच्या आवाजात कर्णधाराचा आवाज एकमेकांना ऐकू गेला नाही.. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी केली महेला जयवर्धने ने अंतिम सामन्यात शतक झळकावले.. आणि श्रीलंका ६ बाद २७४ धावा केल्या.. भारताची फलंदाजी ची सुरुवात चांगली झाली नाही सेहवाग दुसऱ्या बॉल ला बाद झाला काही वेळेने सचिन ही परतला आणि भारतीयांच्या काळजाचे ठोके चुकले.. सचिन बाद झाला तेव्हा धावफलक होता २ बाद ३१ अजून विजय बराच लांब होता.. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गौतम गंभीर ने आधी कोहली मग धोनी ला साथीने घेऊन धावफलक हलता ठेवला.. कोहली, गंभीर बाद झाल्यावर धोनी ने सूत्र आपल्या हाती घेतली आणि युवराज सिंग च्या साथीने षटकार मारून सामना संपवला आणि रवी शास्त्री चे ते शब्द अब्जावधी भारतीयांच्या कानात घुमले.. Dhoni.... finishes off in style, India win the World Cup after 28 years.. गेली २२ वर्ष जे स्वप्न सचिन पाहत होता ते २ एप्रिल २०११ ला पूर्णत्वास गेले.. सामन्यानंतर विराट कोहली ची प्रतिक्रिया बोलकी होती.. ज्या सचिन ने गेली कित्येक वर्षे भारतीयांचे आशा, अपेक्षा आपल्या खांद्यावर उचलल्या त्या सचिन ला खांद्यावर घेण्याची जवाबदारी आमची आहे.. याच स्पर्धेचा मानकरी युवराज सिंग ठरला. तो या स्पर्धेत कॅन्सर ची प्राथमिक लक्षणे दिसत असताना ही खेळत राहिला... ती रात्र भारतीयांच्या मनात अजूनही रुंजी घालते...
ऑस्ट्रेलियाचा "पंच "(२०१५):
विश्वचषक स्पर्धा दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे २३ वर्षानंतर खेळवली गेली यावेळी स्पर्धा २०११ प्रमाणेच गटसाखळी आणि बाद फेरी या रचनेत खेळली गेली.. स्कॉटलंड, आयर्लंड, संयुक्त अरब अमिराती, अफगाणिस्तान यांचा समावेश असलेले १४ संघ सहभागी झाले.. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पिढी बदलणारी होती.. नव्वदीच्या दशकातील अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळत नव्हते. ऑस्ट्रेलिया चा पॉंटिंग, भारताचे सचिन, सेहवाग, युवराज,झहीर या स्पर्धेत नव्हते.. भारताला नवीन सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या रुपात मिळाले.. गटसाखळीतील सर्व सामने जिंकून भारताने बाद फेरीत प्रवेश केला या स्पर्धेतही इंग्लंड बांगलादेश कडून, वेस्ट इंडिज आयर्लंड कडून, आयर्लंड स्कॉटलंड कडून हरले.. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामना लो स्कोरिंग थ्रिलर ठरला.. ऑस्ट्रेलिया च्या १५१ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड ची ९ बाद १४६ अशी अवस्था झाली असताना केन विल्यमसन याने षटकार मारून सामना न्यूझीलंड ला जिंकून दिला.. या स्पर्धेत इतिहासात पहिल्यांदाच दोन द्विशतकी खेळी झाल्या वेस्ट इंडिज च्या ख्रिस गेल ने झिम्बाबवे विरुद्ध २१५ व न्यूझीलंड च्या मार्टिन गपटील ने वेस्ट इंडिज विरुद्ध २३७* धावा केल्या..
भारत बाद फेरीत बांग्लादेश विरुद्ध खेळला, रोहित शर्मा च्या शानदार शतकाने भारत बांगलादेश ला हरवून उपांत्य सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला.. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया ने भारतासमोर ३२९ धावांचे लक्ष ठेवले. स्टीव्ह स्मिथ ने शतक केले.. भारत पाठलाग करताना केवळ २३३ धावात गारद झाला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आले, सामना ओकलंड च्या मैदानावर होता.. सामना रंगात आला असताना मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असलेल्या ग्रांट एलियट ने शेवटच्या षटकात डेल स्टेन ला षटकार मारला आणि दक्षिण आफ्रिका चौथ्यांदा उपांत्य फेरीतून माघारी गेली..
ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड शी अंतिम सामना खेळली पहिली फलंदाजी करताना न्यूझीलंड ची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार मॅक्युलम पहिल्याच ओव्हर मध्ये बाद झाला. ग्रांट एलियट, केन विल्यमसन यांनी धावसंख्या १८३ पर्यंत नेली, मात्र छोट्या धावसंख्येचा पाठलाग अगदी सहज केला आणि ७ गडी राखून ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा जगज्जेते झाले..
इंग्लंडच्या मुकुटाला नियमाचा आधार (२०१९):
इंग्लंड या स्पर्धेत खेळण्यापूर्वी १९८७ आणि १९९२ अशी सलग दोन अंतिम सामने हरले होते.. त्यानंतर जवळ जवळ तीन दशक त्यांची एकदिवसीय क्रिकेट संघाची घडी बसूच शकली नाही.. २०११, २०१५ असे सलग दोन स्पर्धेत आयर्लंड बांगलादेश कडून लाजिरवाणे पराभव स्वीकारल्यावर २०१९ ची तयारी इंग्लंड ने २०१५ पासून लगेचच केली वन डे स्पेशालिस्ट खेळाडू कौंटी च्या मैदानातून शोधून शोधून काढले, वन डे ला साजीशी बॉलिंग करू शकणारे गोलंदाज इंग्लंड ने शोधून काढले.. कुक, अँडरसन, ब्रॉड,बेल,ट्रॉट ही कसोटी खेळणारे खेळाडू एकदिवसीय संघातून कायमचे बाद करून नव्या दमाचे रूट, बटलर,बेअरस्टो, बेन स्टोक्स, जेसन रॉय, ऑईन मॉर्गन, असे फटकेबाज फलंदाज, आणि प्लंकेट, आर्चर, वोक्स, राशीद, वूड्स शोधून काढले.. स्पर्धा सुरू होताना सबंध ब्रिटिश वर्तमान पत्रात इंग्लंड च्या विजयाची भाकिते केली जाऊ लागली. गेल्या स्पर्धेतील गटवार साखळी पद्धत जाऊन सहभागी संघाची संख्या कमी करून ती १० वर आणली, या स्पर्धेत झिम्बाबवे, आयर्लंड, नेदरलँड सारखे संघ खेळत नव्हते फक्त अफगाणिस्तान आणि ९ नियमित कसोटी संघ या स्पर्धेत खेळले साखळी स्पर्धा पार पडली. या साखळीत महंमद शमी आणि ट्रेंट बोल्ट यांनी हॅट्ट्रिक घेतली.. उपांत्य फेरीत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड दाखल झाले भारत न्यूझीलंड विरुद्ध चा उपांत्य सामना पावसाच्या व्यत्ययामुळे राखीव दिवसावर गेला २३० धावांचे माफक आवाहन भारताला पेलवले नाही आणि न्यूझीलंड सलग दुसऱ्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचले.. इंग्लंड ने ख्रिस वोक्स च्या भेदक माऱ्याच्या जोरावर ऑस्ट्रेलिया ला ८ गडी राखून पराभूत केले आणि अंतिम फेरी गाठली..
१४ जुलै २०१९, लोर्ड्स, बाराव्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड. दोघांपैकी जो जिंकेल तो पहिल्यांदाच विश्वचषकावर आपले नाव कोरणार होता. न्यूझीलंड ने पहिल्यांदा फलंदाजी करताना हेन्री निकोलस, केन विल्यमसन , टॉम लेथम यांच्या बॅटिंग ने २४१ धावा केल्या, इंग्लंड प्रत्युत्तर देताना अडखळत होतं. शेवटच्या दोन ओव्हर मध्ये विजयासाठी इंग्लंड च्या हाती दोनच विकेट शिल्लक राहिल्या बेन स्टोक्स अजूनही फलंदाजी करत होता..
शेवटच्या पन्नासाव्या षटकात विजयासाठी १३ धावा पाहिजे होत्या बेन स्टोक्स एक चोरटी धाव घेताना सीमेवरून आलेला एक थ्रो त्याच्या बॅट ला लागून विरुद्ध दिशेला सीमेपार गेला, १३ धावांच्या अचानक ६ धावा झाल्या. स्कोर टाय असताना आधी आदिल रशीद बाद झाला आणि पुढच्या चेंडूवर मार्क वूड. १०० षटकांचा खेळानंतर दोन्ही संघ बरोबरी वर होते , स्पर्धेच्या नियमानुसार पुन्हा एक एक सुपर ओव्हर खेळली गेली.. इंग्लंड ने पहिली सुपर ओव्हर खेळताना १५ धावा केल्या.. न्यूझीलंड च्या सुपर ओव्हर ला जेमी निशम आणि मार्टिन गपटिल आले. निशम ने पाच बॉल मध्ये १३ धावा कुटल्या. शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंड ला विजयासाठी दोन धावा हव्या असताना गोलंदाज जोफ्रा आर्चर ने अगदी पायात बॉल टाकला, गपटिल तो बॉल केवळ मिड विकेट पर्यत ढकलू शकला दुसरी धाव घेताना गपटिल धावबाद झाला १०२ ओव्हर खेळून ही इंग्लंड आणि न्यूझीलंड बरोबरी वर.. स्पर्धा नियमात जर सुपर ओव्हर टाय झाली तर बाऊंडरी काऊंट वर सामन्याचा निकाल ठरणार होता तिथे इंग्लंड (२६ - १७)न्यूझीलंड च्या पुढे होत आणि नियमाच्या आधारे इंग्लंड ने विजेतेपदला गवसणी घातली...
चार वर्षांनी क्रिकेटचा हा कुंभमेळा पुन्हा भारतात होत आहे. कोणीतरी जिंकेल कोणीतरी हरेल.. पण या game of glorious uncertainties ने गेल्या बारा स्पर्धांमध्ये अनेक चढउतार दाखवले यंदाची स्पर्धा ही अशीच होवो ही प्रत्येक क्रिकेट प्रेमीची इच्छा असेल..
तूर्तास लेखनसीमा..
- हर्षद मोहन चाफळकर,पुणे
chapharshad@gmail.com