Monday, October 27, 2025
बिहार निवडणुका 2025 - ज्योतिषीय विश्लेषण
Wednesday, October 22, 2025
वार्षिक राशिभविष्य
मेष रास :
राशीचक्रात अग्रणी असणारी, मंगळ सारख्या अग्नी तत्वाच्या ग्रहाची, अग्नी तत्वाची मेष राशीचे जातक नेहमी डोक्याने प्रक्टिकल विचार करतात. एक घाव दोन तुकडे असा आपला स्वभाव असल्याने अतिविचारापेक्षा अर्थपूर्ण कृती करण्यावर आपला विश्वास असतो . जे काम हाती घ्याल ते तडीस न्याल हा आपला आजवरचा अनुभव आहे. येणारे वर्ष आपणास कसे जाईल याचा आपण आता विचार करू. तीस वर्षांनी शनी महाराज आपली परीक्षा घेण्यासाठी साडेसातीत गेल्या मार्च २०२५ रोजी मीन राशीत आले आहेत. त्यामुळे गेल्या मार्च २०२५ पासून आपल्या सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात अचनक ब्रेक लागल्यचा अनुभव येत असेल तर काळजी करू नका मात्र काळजी नक्की घ्या "बारावा शनी अतिक्रूर स्थानी" अशी म्हण आहे. आपला साडेसाती चा पहिला टप्पा सुरु असून रोजच्या आयुष्यात येत असलेल्या अडथळे त्याची प्रचिती देत असतील. जानेवारी ते जून २०२६ या काळात आपल्या धन स्थानात हर्षल वक्री होत आहे शिवाय शनी महाराजांची तिसरी दृष्टी आहेच. याकाळात आपल्या आर्थिक नियोजनाची विशेष काळजी घ्या. वायफळ खर्च टाळा. अनावश्यक खर्च वाढतील. जून २०२६ नंतर आपल्याला वाहन व वास्तू सुख लाभेल. जून २०२६ पर्यंत शासकीय कागदपत्रांची कामे अडकली असतील तर पाठपुरावा करा निश्चित त्यात यश मिळेल. परदेश प्रवास सुखकर होईल. जून २०२६ नंतर नुकसानीत घट होईल. विद्यार्थ्यांकरिता २०२६-२७ हे वर्ष शिक्षणासाठी उत्तम जाईल. ऑगस्ट २०२६ मध्ये संतती संबंधी तक्रारी सुरु होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या शनी नेपच्यून ची रोग स्थानावर दृष्टी अधून मधून पोटाचे विकार संभवतात. जुने कुठले आजार असतील तर डॉक्टरांशी SOS वर सल्ला मसलत करून उपाय उपचार करा. जीवन शैलीत बदल करा . अन्यथा शनी महाराज स्वत: आपला ताबा घेऊन आपल्यावर अचानक रूग्णालयात पाहुणचार घ्यायची वेळ आणू शकतात. विवाहेच्छुकांनी जून पर्यंत विवाहासाठी नक्की प्रयत्न करावेत. जून २०२६ नंतर वारसाहक्काच्या संबंधी काही सकारत्मक बातम्या मिळू लागतील. तरुणांना उच्चशिक्षण, परदेश प्रवास या दृष्टीने काळ अनुकूल आहे. नोकरी निमित्त परदेश प्रवास घडू शकतो. दशमेश शनी व्यय स्थानात नेपच्यून च्या युतीत असल्याने काही जुन्या राजकिय सामाजिक जीवनात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना कष्टदायी ठरत आहे. एप्रिल २०२६ मध्ये काही लोकांना उच्च अध्यात्मिक अनुभव मिळू शकतो. फेब्रुवारी २०२६ मध्ये होणारे ग्रहण लाभात कमतरता आणेल आणि ऑगस्ट चे ग्रहण आपल्या पंचम स्थ्नात होणार असल्याने या काळात शेअर्स मध्ये लॉस होण्याची शक्यता आहे. व्यय स्थानातील शनी आपल्या जीवाला शिवाचे रूप दाखवेल.
वृषभ रास:
शुक्राच्या अंमलाखाली असणारी पृथ्वी तत्वाची स्त्री रास. आपण काम करताना मन लावून करता आणि प्रत्येक कामात व्यवस्थित पण दाखवता. आजकाल चा परवली चा शब्द असणारा aesthetics हे आपल्याकडे उपजत असते. आपण एखाद्या कलेचा ही मनमुराद आस्वाद घेता. आपल्या राशीचे चिन्ह बैल आहे. जे कष्ट, शरीर सौष्ठव याचे प्रतिक आहे. कामाच्या वेळी काम आणि आरामाच्या वेळी आराम असे आपले वागणे असते. आपणास एक कलात्मक सौंदर्य दृष्टी निसर्गदत्त देणगी आहे.आपणास येणारे वर्ष कसे जाईल हे पाहूया. लग्नातला हर्षल , धन स्थानातील गुरु आपणास सध्या उत्तम धनलाभ मिळवून देत असतील. मार्च एप्रिल च्या appraisal मध्ये उत्तम रिटर्न्स मिळवणारे आपली रास ठरेल. जून २०२६ चा गुरु पालट सरकारी कागदपत्रातून लाभ मिळवून देईल. इन्श्युरन्स म्युच्युअल फंड च्या रिटर्न्स मध्ये वाढ होईल. सध्या राहत्या घरात अस्थिर अशांत वातावरण असेल तर तो काळ अतिशय अल्प आहे. वाहने बदलायचे असल्यास नक्की बदलून घ्यावे. आपल्याला आपल्या पुत्रांच्या बाबतीत सतावत असेल तो काही काळ आहे हे समजून वाटचाल करावी. शेअर्स आणि लॉटरी या विषयात पुढील काही काळ सावध गिरी ने पावले टाकावीत. आरोग्याच्या बाबतीत जुलै २०२६ चा महिना विशेष सांभाळावा. एप्रिल २०२६ हा महिना वाहन अपघात या दृष्टीने विशेष सांभाळावा. विवाहेच्छुकांनी जून २०२६ नंतर काळ अनुकूल आहे. मिळणारे स्थळ कदाचित जवळच्या गावातील असेल. विवाह आपल्या लहान भावंडांच्या मदतीने जमू शकतो. अष्टम स्थानात जानेवारी २०२६ मध्ये मंगळ येत आहे. त्या काळात सासुरवाडीत कुरबुरी संभवतात. धार्मिक यात्रेतून लाभ दिसत आहे. मेकानिकल, सिव्हील इंजीनियरिंग चे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यासाठी काळ अनुकूल आहे. दशमातील राहू राजकारण्यांचे राजकिय वजन वाढवण्यास उपयुक्त ठरत आहे. नोकरीत long due promotion शक्य आहे. फेब्रुवारी २०२६ मधील होणारे सूर्यग्रहण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्याना त्रासदायक ठरेल. मानहानी चे प्रसंग उद्भवतील. नोकरीतील वरिष्ठांशी वाद घडवेल. हा काळ सांभाळल्यास पुढे बढती निश्चित. मित्र मंडळी कडून फसवणुकीचा अनुभव काही लोकांना येऊ शकतो. ऑगस्ट २०२६ चे ग्रहण वाहन आणि वास्तू संबंधी त्रास दायक ठरण्याची शक्यता. शनी महाराज २०२८ पर्यंत अकरावे आहेत. ते लाभच मिळवून देतील. आपण जोरात प्रयत्न करावेत. यश निश्चित आहे.
मिथुन रास :
राशीचक्रातील तिसरी रास. विनोद बुद्धी कायम जागृत असणारे मिथुन वाले, बोले हसतमुख असणारे, कठीण प्रसंगात वातावरण हलकेफुलके हेच करतात. Happy go lucky माणसे. राशिचीन्हातील युगुलातली मुलगी लाजते आहे या चिन्हातूनच काय ते समजा. घरात मिथुन वाला वातावरण हसत ठेवतो. तसेच हे अतिशय चौकस असतात. भल्याभल्यांची गुपिते यांना माहीत असतात. राशीस्वामी बुध असल्याने पैसे मिळवण्याचे अनेक मार्ग माहीत असतात. आगामी वर्ष आपल्यासाठी कसे आहे याचा अंदाज घेऊया. लग्नातले गुरु महाराज आपणास अतिशय उत्तम फळ देत आहेत. विशेषत: वैवाहिक जीवन आनंदात सुरु आहे. संपूर्ण गुरुबल असल्याने विवाहेच्छुक नवतरुणांनी अजूनही संधी चा लाभ घ्यावा. आर्थिक बाबतीत आपल्याला कायमच चंचलता राहते. पैसा येतो आणि खर्च होत राहतो. तृतीयातला केतू लहान भावंडे, छोटे प्रवास यांच्या बाबतीत असंख्य अडचणी व चिंता निर्माण करत असेल. कागदपत्रे सांभाळा अचानक इकडे दस्तऐवज गायब होण्यासारखे प्रकार घडू शकतील. वाहन व वास्तू सौख्य चांगले राहील. वास्तू चा जुना प्रश्न मार्गी लागेल. एखादी कला विद्या उपयुक्त सर्टीफिकेट कोर्स निश्चित पणे शिकता येईल . आपली साधना फळास येईल. संतती सौख्य लाभेल. आरोग्य सांभाळा. मे जून मध्ये हॉस्पिटल मध्ये शोर्ट व्हिजीट होऊ शकते. डिसेंबर २०२५ मध्ये प्रेमप्रकरणात यश येईल. नोकरीत गुप्त शत्रूंचा त्रास होऊ शकतो. अचानक परदेश घडू शकतो. घरातील वडीलधाऱ्याशी वाद टाळा. उच्च शिक्षणात अडथळे येऊ शकतात. दशमातली शनी नेपच्यून युती नोकरीत अस्थिरता दर्शवत असली तरी आपल्या कल्पकतेला चालना देऊन नवीन व्यवसायाची चाचपणी करू शकता. दीर्घकालीन व्यवसाय फायदेशीर ठरू शकतात. सेवा क्षेत्रातले व्यवसाय निश्चित बहरतील. एप्रिल - मे २०२६ मध्ये वडिलांचे आजार पण दुखणे अचानक डोके वर काढेल. राजकीय व सामाजिक जीवनातील लोकांची फसगत होऊ शकते. कोर्ट कचेरीच्या बाबतीत निकाल आपल्या बाजूने अनुकूल लागू शकतो. व्यय स्थानातील वक्री हर्षल घश्यासंबंधी विकार अचानक उत्पन्न करू शकेल. एकूणच हे वर्ष आपणास संमिश्र स्वरूपाचे असेल . जून २०२६ नंतर आर्थिक आवक वाढेल. भागीदारीतील व्यवसायातून उत्पन्न सुरु होईल. आर्थिक फटके कमी होतील. दशमातील शनी आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय घेण्यास भाग पाडेल.
कर्क रास :
हळवे, लाघवी, खेकड्यानी एखादी गोष्ट पकडली की ती सहसा सुटत नाही, म्हणजेच ही माणसे एकनिष्ठ असतात.. चंद्र स्वामी असल्याने व तो मनाचा कारक असल्याने कदाचित आपण लवकर दुखावले जाता. कर्क राशीच्या स्त्रिया या आदर्श माता ठरतात. आपली रस ही घराला घरपण देणारी रास. आपल्या राशीला आगामी वर्ष कसे जाईल ते पाहूया. कर्क राशीला सध्या शनी महाराज नववे, गुरु महाराज बारावे आहेत. सध्या थोडा आत्मविश्वास कमी पडत असेल, गुरुबळ नाही मात्र जून २०२६ मध्ये होणारा गुरु पालट आपल्या या स्थितीत सुधारणा होईल. लाभातला हर्षल पुढील काही वर्षे रखडलेले, अडकून पडलेले लाभ झटक्यासरशी मिळवून देईल. त्याचा अनुभव गेले काही वर्ष घेतही असाल. आर्थिक बाबतीत धन स्थानाचा स्वामी रवी असल्याने आपण अतिशय सावध आणि आर्थिक व्यवहारात स्वच्छ कारभार करत असता तृतीयाचा स्वामी बुध आपल्याला अधून मधून लहान जवळचे प्रवास घडवत असतो. आपले संवाद कौशल्य उत्तम आहे. जनसंपर्क वाढवल्यास निश्चित फायदे मिळतील. येत्या वर्षात मार्च एप्रिल २०२६ मध्ये आपणास नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. मुलांना येणारे वर्ष शिक्षणसाठी उत्तम जाईल. मुलांच्या admission चा प्रश्न सुटेल. एखादी long term shares मध्ये गुंतवणूक फादेशीर ठरेल. आरोग्याच्या बाबतीत जानेवारी २०२६ हा महिना विशेष काळजी घेण्यासारखा. विवाहेच्छुकांनी जून २०२६ नंतर प्रयत्न करावेत. शनी महाराज नेपच्यून च्या युतीत आपल्या नवम स्थानात आहेत. अनेक वर्ष मानत असलेली तीर्थयात्रा येत्या वर्षात एप्रिल २०२६ मध्ये शकेल. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवकांना काही अडथळे येऊ शकतात, जसे की परीक्षेचा फोर्म भरताना चूक होणे किंवा तत्सम. मे २०२६ पर्यंत परदेश प्रवास करण्यास अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या युवकांना जून २०२६ नंतर यश मिळेल. जानेवारी २०२६ महिना नोकरीच्या ठिकाणी कटकटीचा ठरू शकतो, manager शी वाद संभवतात. फेब्रुवारी २०२६ मध्ये होणारे ग्रहण मानसिक पातळीवर अशांतता निर्माण करू शकेल. राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी फेब्रुवारी २०२६ चे ग्रहण विशेष त्रासदायक ठरू शकते. कर्क राशीच्या जातकांना या वर्षी सासुरवाडीची जवाबदारी पडू शकते. एकुणात हे वर्ष आपणास विवाह, गुंतवणूक, शिक्षण या बाबतीत उत्तम जाणार असून नोकरी, आरोग्य आणि मानसिक दृष्ट्या आपली परीक्षा पाहणारे ठरेल.
सिंह रास :
सिंहाप्रमाणेच राजा माणसे, तत्ववादी, स्वतः कोणाच्या पुढे झुकणार नाहीत,राशी स्वामी रवी, अग्नी राशी, आपल्याला अपमान सहन होत नाही, स्वतः कोणाच्या वाट्याला जाणार नाहीत, दुसरे कोणी यांना आडवे गेले तर फडशा पडल्याशिवाय राहणार नाहीत . स्वाभिमान जपणारी , तत्वाला ठेच लागली की आपण अस्वस्थ होता. कोणाची हांजी हांजी करणे आपल्या रक्तातच नाही. येणारे वर्ष आपल्यला काय घेऊन येईल त्याचा आढावा घेऊया. गेली तीन- एक वर्ष आपली फसवणूक, विश्वासघात झाला असण्याची भावना झाली असावी. गेल्या काळात कुंभ राशीतील शनी महाराज आपल्या वर करडी नजर ठेऊन होते नजर हटी , दुर्घटना घटी या उक्तीचा आपण पदोपदी अनुभव गेल्या काही काळात घेतला असण्याची शक्यता आहे. आगामी वर्ष ही आपणास संमिश्र स्वरूपाचे जाणार आहे. आर्थिक बाबतीत वर्षाच्या पूर्वार्धात चांगले लाभ मिळतील. छोटे प्रवास, सरकारी कागदपत्रे मिळवणे याबाबत ही आपल्याला या वर्षी अडचण येणार नाही. वास्तू वाहन खरेदी जून २०२६ मध्ये शक्य आहे. सध्या शेअर्स मधून चांगले रिटर्न्स मिळतील. शेअर्स मधील गुंतवणूक वाढवण्यास कालावधी अनुकूल आहे. सोन्यात गुंतवणूक वाढवा. आरोग्याच्ग्या बाबतीत जुनी दुखणी डोके वर काढतील. गुडघेदुखी, हाडांचे दुखणी याने आपण जेरीस येऊ शकता. काहींच्या वैवाहिक जीवनात जून २०२६ नंतर छोटे वादळे येतील. फेब्रुवारी २०२६ मध्ये ग्रहण आपल्या सप्तम स्थानात होत असल्याने जोडीदाराशी विसंवाद टाळा. व्यावसायिक भागीदाराशी खटके उडू शकतात. मुक्कामी प्रवासात मनस्ताप होऊ शकतो. कोर्ट कचेरीतील प्रकरणे त्रासादायक ठरतील. शक्यतो कोर्ट प्रकरणात फेब्रुवारी महिन्यातील तारखा टाळा.अष्टमातील शनी नेपच्यून युती आपल्याला मानसिक पातळीवर बेचैन करणारी आणि प्रसंगी मानसिक धैर्य खचवणारी ठरेल. उच्च शिक्षण, नवीन अध्ययन साठी कालावधी अनुकुल आहे जून २०२६ नंतर परदेश प्रवास घडेल. नोकरीत मे जून महिन्यात अचानक नवीन मोठ्या जवाबदाऱ्या पडतील . राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याऱ्या लोकांना मोठ यश मिळेल. काहींना प्रमोशन मिळेल. लाभातील गुरु महाराज जून मध्ये कर्केत जायच्या आधी मोठे लाभ देऊन जातील. ऑगस्ट २०२६ मध्ये आपल्या राशीत ग्रहण होणार आहे. तेव्हा ही शांतता राखणे गरजेचे राहील. जून नंतर व्यय स्थानातील गुरु अध्यात्मिक अनुभव देईल.
कन्या रास:
कायम द्विधा मनःस्थिती, गोंधळलेले, प्रत्येक गोष्टीची चिकित्सा, चिरफाड करणारे म्हणून आपण ख्यात आहात. आपल्याला प्रश्न पण विचित्र पडतात, बऱ्याचदा आपण गोंधळतात आणि दुसर्यालाही गोंधळात टाकतात. मात्र हे कायम सावध असल्याने कामे full proof करतात, कन्या राशीचे जातक आर्थिक व्यवहार चोख ठेवतात. अतिचिकीत्सेतून कधी कधी आपण अप्रिय होता. गोष्टींचे निर्णय घेण्यावर आपण वेळ घेता. या गोष्टीत आपली सदा सावध आणि मोजून मापून पावले टाकण्याची तळमळ असली तरी ती इतरांना वेळ खाऊ वाटते. तरी आपण आपल्या या स्वभावात थोडा बदल केला तर आपण लोकप्रिय व्हाल. आगामी वर्षाच्या विचार करता, शनी महाराज आपल्यावर नजर ठेऊन आहेत. अगदी साडेसाती नाही पण आपला चंद्र शनी च्या दृष्टीत आल्याने मनावर काहीसे अनावश्यक दडपण चिंता वाटत असेल तर त्याचा अजिबात विचार करू नका. चिकित्सा तर अजिबात करू नका. आलेला दिवस स्वच्छंद पणे जगा. आर्थिक बाबतीत आपणास जून २०२६ पर्यंत आवक उत्तम राहील. लहान भावंडांशी जानेवारी २०२६ आणि एप्रिल २०२६ मध्ये किरकोळ वाद होतील ते टाळल्यास उत्तम. नवीन वाहन वास्तू घ्या ते लाभदायक ठरेल. लहान मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल. पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेणे सुलभ होईल. teenagers ना आपल्या आवडीचे कॉलेज मिळेल. मातृसौख्य उत्तम राहिल. आईसाठी नवीन खरेदी होईल. शेअर बाजारात शोर्ट टर्म गुंतवणूक फसवणूक करेल. जून २०२६ नंतर इन्फ्रा च्या शेअर्स मध्ये फायदा होईल. आरोग्याच्या बाबतीत फेब्रुवारी २०२६ चे ग्रहण त्रासदायक ठरू शकेल. तळपाय सांभाळा. डायबेटिक लोकांनी विशेष काळजी घ्या. सप्तमात शनी नेपच्यून युती आपल्या जोडीदाराशी नातेसंबंध तावून सुलाखून घेतील. रखडलेले विवाह जून २०२६ नंतर अचानक जमतील. काहीचे घटस्फोट, परस्पर सामंजस्याने वेगळे होण्याचे प्रकार होतील. एप्रिल २०२६ हा आपणासाठी अपघाताचा महिना. जून जुलै २०२६ मध्ये वडिलोपार्जित स्थावर चे प्रकरणात लाभ होईल. उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्याना पुढील काही वर्षांचा काळ सर्वोत्तम आहे. नोकरीत गुरु महाराज प्रमोशन देऊन जातील . राजकीय सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या लोकांना पुढील दोन वर्षे उत्तम यशदायी आहेत. जून २०२६ च्या गुरु पालट वैवाहिक जीवनात स्थैर्य आणेल. लाभात वाढ करेल. ऑगस्ट २०२६ चे ग्रहण आपल्या व्यय स्थानात होत असल्याने तेव्हा आजारपणे डोके वर काढतील. एकूणच वर्ष चांगले जाईल.
तूळ रास :
राशी चिन्हप्रमाणेच आपल्या आयुष्यात एक प्रकारचा balance असतो.. कोणत्याही प्रकारचा आतातायीपणा नाही, राशीस्वामी शुक्र असला तरी वृषभेसारखा शृंगार यांना जमत नाही. जे काही करायचं ते मोजून मापून आणि योग्य तेच जे न्याय्य आहे तेच करायचं. वायू रास असल्याने प्रचार प्रसार करण्याची इच्छा दिसते. म्हणून शनी महाराजांची तूळ आवडती रास. येणारे वर्ष आपणास कसे जाईल त्याचा आढावा घेऊया. आपला राशीस्वामी शुक्र हाच आपला अष्टम स्थानाचा स्वामी असल्याने आपणास अनेकदा स्वघातकी निर्णय घेण्याची बुद्धी होत असते. अनेकदा आपले निर्णय आपल्याला त्रासदायक ठरत असतात. तरी लाभात सिंह रास असल्याने सरकारी माध्यमातून अनेक लाभ होतात. आर्थिक बाबतीत एप्रिल २०२६ मध्ये अडचणी येऊ शकतात. पैश्यांचा फ्लो कमी होऊ शकतो पण तो तात्पुरता असेल. भावंडे, मित्र ममंडळी शेजारी यांच्याशी आपले सहृदयी चे संबंध राहतील. जून २०२६ नंतर वाहन आणि वास्तू सौख्य लाभेल. नवीन खरेदी करण्यास जून २०२६ नंतर अनुकुल काळ आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासात प्रगती दिसेल. दहावी बारावी चे विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होतील. फेब्रुवारी २०२६ चे ग्रहण आपल्या पंचमात होत असल्याने आपले जर शेअर बाजारात गुंतवणूक असेल तर त्यावर नकारात्मक परिणाम जाणवतील . आपले शेअर्स ची गुंतवणूक इतर शाश्वत मार्गांकडे वळवावी. अर्थात ही स्थिती कायमस्वरूपी किंवा दीर्घकालीन नसून फेब्रुवारी ते मे २०२६ या कालावधी पुरती आहे. रोग स्थानात शनी नेपच्यून आपल्या आरोग्यासाठी काळजी करण्यासारखी स्थिती निर्माण करू शकतील. अचानक मेडिकल रिपोर्ट्स बिघडून अचनक उपचार करण्याची वेळ येऊ शकते आरोग्याच्ग्या दृष्टीने मार्च २०२६ हा महिना महत्वाचा आहे. विवाहेच्छुक लोकांना यावर्षी गुरुबल नाही तरी पालकांच्या पुढाकाराने विशेषत: वडिलांच्या पुढाकाराने विवाह जमू शकतात. काहीच्या घरात चोरी वगैरे असे प्रकार एप्रिल २०२६ च्या आसपास घडू शकतात आपले दागिने, सोन्याच्या वस्तू सांभाळा. जून २०२६ च्या आधी एखादे तीर्थाटन होऊ शकते. उच्च शिक्षण, MBAसारख्या व्यवस्थापन पदवी शिक्षण घेऊ इच्छिणार्यांसाठी हा काळ उत्तम आहे. काहीच नंबर IIM सारख्या प्रतिष्ठीत संस्थेत लागू शकतो. जून २०२६ नंतर आपल्यावर कामाच्या ठिकाणी जवाबदारी वाढू शकते. एखादे नवीन प्रोजेक्ट वर लीड ची जवाबदारी आपल्या गळ्यात पडू शकते. आधी म्हटल्याप्रमाणे आपणास सरकारी कामात कधी फारसे अडथळे येत नाहीत. ते यापुढेही सुरु राहील. ऑगस्ट २०२६ मध्ये आपल्या लाभात होणारे ग्रहण काही प्रमणात आपल्या मोठ्या भावंडांना त्रासादायक ठरण्याची शक्यता. व्यय स्थानावर शनी नेपच्यून ची युती सप्टेंबर २०२६ मध्ये आरोग्य विषयक चिंता निर्माण करू शकते.
वृश्चिक रास :
कल्पना करा की स्थिर भांड्यात पाणी घेऊन त्यात विंचू उकळत ठेवलाय हे जितकं दिसायला भयानक आहे तेवढंच आपलं आयुष्य खडतर, टक्क्याटोणप्यांनी भरलेलं असतं. मात्र वृश्चिक वाले हे सगळे आपल्या कर्तृत्वावर निभावून नेतात. आपण अचाट स्वरूपाचे धाडस ही दाखवतात, आणि यशस्वी ही होतात कारण मालक मंगळ आहे आयुष्याच्या कसोटीवर तावून सुलाखून निघालेली माणसे वृश्चिक वाले.मुलांवर जीवापाड प्रेम करणारे वृश्चिकवाले, हे प्रचंड possesive असतात. येणारे वर्ष हे आपल्यासाठी अनेक नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. सध्या गुरुमहाराजांची दृष्टी आपल्या धन स्थानावर आहे. आर्थिक उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. तृतीयेश आणि चतुर्थ स्थानाचे स्वामी शनी महाराज आपल्या पंचमात नेपच्यून बरोबर आहेत शेजारी लहान भावंडे यांच्याशी असलेले वाद मिटण्यास काळ अनुकूल आहे. स्थावर संबंधी कागदपत्रे नव्याने करताना काळजी घ्या एखादा शब्द आपल्या स्थावर मालकीच्या आड येऊ शकतो. करार मदार करताना काळजी घ्यावी. पंचम स्थानातील शनी नेपच्यून युती आपणास संतती विषयी चिंता घडवू शकते. आरोग्याविषयी डिसेम्बर २०२५ हा महिना सांभाळा. चटका बसणे, कापले जाणे असे प्रकार होतील. विवाहच्या बाबतीत जून २०२६ पर्यंत गुरुबळ नाही कारणाने जून २०२६ पर्यंत थांबा. कोर्ट कचेरी खटले यासंदर्भात जानेवारी २०२६ व एप्रिल २०२६ हे महिने विशेष लक्ष देण्याचे. स्पर्ध परीक्षा देणाऱ्या युवकांना मर्यादित यश मिळेल. शालेय मुलांनी अभ्यास विशेष लक्ष देण्याची गरज आहे. छंद जोपासण्याच्या नादात मुख्य अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते. जून २०२६ चा गुरु पालट आपला भाग्योदय घेऊन येईल . गुरु महाराज आपल्या भाग्य स्थानात उच्च राशीत येतील आणि काळ अनुकूल होईल. उच्च शिक्षण साठी वर्ष उत्तम आहे. नोकरीत सध्या सारखे बदलाचे वारे वाहत आहेत. एका ठिकाणी एका नोकरीत मन लागत नसेल. सारखी नोकरी बदलायची खुमखूमी स्वस्थ बसू देत नसेल तरी नोकरीच्या बाबतीत संयम बाळगणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०२६ चे ग्रहण नोकरीच्या संदर्भात विशेष काळजी घेण्याचे आहे. परदेश प्रवासासाठी कालावधी अनुकूल आहे. राजकीय सामाजिक जीवनात काम करणाऱ्याच्या मनाला अस्वस्थता जाणवते. एका संघटनेत मन रमत नाही. पक्षांतर करण्याची वेळ राजकीय व्यक्तींना येऊ शकते. काहींना सत्तेचा त्याग ही करावा लागेल.
धनू रास :
आपण सकाळी सुर्योदयी उमदे घोडे असतात, मावळतीला थकलेले पिचलेले माणसे होतात. कार्यतत्पर, घासाघीस न जमणारे, प्रचंड moody, म्हणजे यांचा mood क्षणात बदलतो समोरच्या माणसाला कळत नाही. आता बरा होता अचानक याच काय बिघडलं, हे चांगल्या mood मध्ये असल्यास मिथुनेपेक्षा उच्च प्रतीचे विनोद करू शकतील, मूड बिघडलं तर मात्र कदाचित रागाच्या भरात स्वतः वर कलम 302 ही लावून घेतील, बहुतांशी तुमचा राग सात्विक असतो, लवकर रागवता तेवढेच लवकर शांत होता. त्याआधीच ते बहुतांशी शांत होतात हे बाण ताणण्या इतके आक्रमक आहेत पण न सोडण्याइतके विवेकी ही आहेत. ताणलेला बाण त्यांच्यातील potential दाखवतो फक्त, कोणीतरी त्यांना ते kinetic मध्ये परिवर्तीत करणारा हवा असतो. कित्येक लोकांना कष्टसाध्य असणाऱ्या गोष्टी आपण धनू जातके केवळ अंगी असलेल्या potential वर निभावून नेता. आगामी वर्ष हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सध्या आपण शनी महाराजांची पनोतीमध्ये आहात. तीन वर्षापूर्वी साडेसाती संपली आणि आपण मुक्त झालो असे वाटत असतानाच पनोती ने गाठलं आहे. काळजी करू नका. काळजी घ्या. आर्थिक बाबतीत आपले धन स्थानाचे स्वामी शनी महाराज नेपच्यून च्या युतीत आहेत. तरी निश्चित गुंतवणुकीकडे लक्ष द्या. धनसंचय वाढणार आहे. फक्त शेअर्स, भीशी तत्सम गोष्टींमध्ये गुंतवणूक वाढवू नका. जुनी रखडलेली वास्तू आणि वाहन बदलण्याची वेळ आली आहे. वास्तू आणि वाहन बदलणार असाल तर काळ अनुकूल आहे. फक्त त्या संबंधी कागदपत्रे करार करताना सर्व कायदेशीर बाबी तपासून घ्या. शनी महाराजांची दृष्टी आपल्या राशी चंद्रावर आहे कारणाने आळस, नाकर्तेपण बळावण्याची शक्यता आहे. आळस झटकून काम करा. यश आपलेच आहे. रोग स्थानातील हर्षल घश्याचे विकार (उदा. थायरोईड सारखे) वाढवेल. सप्तमात गुरु महाराज बसले आहेत. विवाह रखडले असतील तर असे योग पुन्हा लवकर येणार नाही. तेव्हा संधी साधून विवाह जमवूनच टाका. जून २०२६ मध्ये गुरु महाराज अष्टम स्थानात जातील तेव्हा आपल्या पत्नीचे उत्पन्न वाढेल. जुनी येणी हाती लागतील. बँक बँलन्स वाढेल. उच्च शिक्षणात अडथळे संभवतात. एखाद्या शांत एकांत असणाऱ्या तीर्थस्थानाला भेट घडेल. दशम स्थानावर शनी नेपच्यून ची दृष्टी आहे जी नोकरीतली तुमची प्रगती रोखून आहे. नोकरीच्या अनेक फसव्या संधी आपल्यासमोर हात जोडून उभ्या आहेत पण शनी महाराज कायम दीर्घकालीन फायदे देणारे असल्याने आपण त्या जाळ्यात न अडकलेलेच बरे. राजकारण्यांना आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्याना संयम दाखवणे आणि प्रसंगी backseat घेणे गरजेचे आहे.
मकर रास:
प्रपंचाचा खडतर पाठशाळेत प्रवेश घेतलेले मकर वाले, प्रचंड सकारत्मक, प्रयत्नवादी, म्हणून मंगळाची उच्च राशी, पृथ्वी तत्व असल्याने कार्य धसास नेणारे. शनी महाराजांची नम्रता, कर्तव्यकठोरता, संयम, शांत स्वभाव यामुळे आयुष्य सहज तरुन जातात. शनी स्वामी असल्याने साडेसातीतील safe राशी. प्रपंच परमार्थ एकत्र घेऊन जाणारे मकर वाले काळाला खंबीरपणे तोंड देणारे मकर जातकांनो तुमच्या संयमाला सलाम ! साडेसातीतून बाहेर पडल्यावर संधीचे नवे आकाश खुले झाल्याची आपली भावना झाली असेल. आगामी वर्ष आपल्याला सुखद जाणार आहे. राशीस्वामी आणि धन स्थानाचे स्वामी शनीमहाराज , गुरु महाराजांच्या दृष्टीत येतील तेव्हा आर्थिक उत्पन्न वाढेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. तृतीय स्थानात शनी महाराज जुनी कागदपत्रे, शोधून काढण्यास भाग पडतील. शेजाऱ्याचा स्वभाव काहीसा चमत्कारिक वाटेल. घराशेजारी काहींना अचानक पाण्याचा स्रोत सापडेल. शालेय मुलांना आगामी शैक्षणिक वर्ष उत्तम जाईल. धन स्थानात फेब्रुवारी २०२६ मध्ये होणारे ग्रहण कुटुंबात काही काळ वातावरण दुषित करतील मात्र ते तात्पुरते स्वरूपाचे असेल. वाहन आणि वास्तू सौख्य बरे राहील. नवीन खरेदी फायदेशीर ठरेल. शेअर्स गुंतवणूक फायदेशीर ठरेल . सध्या जीवनशैलीचे आजार बळावतील. विवाह करू इच्छीणाऱ्यानी जून २०२६ पर्यंत वेळ काढावा. जून २०२६ नंतर गुरुबळ येईल तेव्हा संधी साधावी. डिसेम्बर २०२५ मध्ये सरकारी योजना अथवा निर्णयातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट २०२६ चे ग्रहण सासुरवाडी आणि वडिलोपार्जित गोष्टी मिळण्याच्या दृष्टीने तापदायक. वाताघाटीचे निर्णय आधी घ्या अथवा ते ऑक्टोबर २०२६ पर्यंत लांबवा. जनसंपर्क वाढवा, लोकांशी संवाद साधा अन्यथा विसंवादातून गैरसमज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. गाठीभेटी घ्या. जानेवारी २०२६ आणि एप्रिल २०२६ हे दोन महिने वाहन अपघात आणि नुकसानीचे या दोन महिन्यात वाहन चालवताना विशेष लक्ष राहू द्या. जून जुलै २०२६ हे महिने आर्थिक लाभाचे. खांद्याला इजा सारख्या गोष्टी फेब्रुवारी मार्च या काळात शक्य आहे. व्यवसायिक भागीदाराशी करार मदार होईल. व्यवसायानिमित्त एखादा परदेशी मुक्कामी प्रवास होईल . चिकित्सा , विश्लेषण, डेटा अनालिसिस अश्या विषयात रस असणाऱ्यानी त्यात उच्च शिक्षण घेण्यास काळ अनुकूल आहे. नोकरीत एप्रिल २०२६ मध्ये काही कुरबुरी होतील बाकी तसा विशेष त्रास नाही. राजकारणी लोकांना फसवणुकीचा अनुभव येऊ शकतो.
कुंभ रास:
सर्व भौतिक गोष्टींपासून विरक्त झालेली माणसे कुंभ राशीची. कुंभ राशीच्या स्त्रियांना मेकअप च अप्रूप नसत, चिन्हतील निर्वस्त्र पुरुष विरक्ती दाखवतो तर भरलेला घडा ज्ञानी पण दाखवतो, ऐहिक गोष्टींची विरक्ती आल्याने ही माणसे संशोधन, अभ्यास, चिकाटीची कामे सहज करतात. कुठल्याही गोष्टीत गुंतून न राहण्याचा यांचा स्वभाव त्यांना लवकर परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करतो. निर्णय घेताना तो विचारपूर्वक आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय कुंभ राशीचे जातक घेतात. साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात असणारे कुंभ जातक राशीमध्ये असणाऱ्या राहूच्या प्रतापाने त्रस्त आहेत. धन स्थानचा स्वामी पंचमात असल्याने अनेक मार्गांनी पैसे मिळण्याचे स्रोत तयार झाले असावेत. धन स्थानी असलेले शनी नेपच्यून अधून मधून आर्थिक फटका बसवत असतील. तृतीय चा स्वामी मंगळ आपणास नवीन गोष्टीत हात घालण्यास. नवीन एखादा उपक्रम, नवीन संधी आपल्याला खुणावत असल्यास त्याचा निश्चित पणे सकारात्मक विचार करावा. वाहन वास्तू सौख्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना कला शिक्षणात यश लाभेल. पंचमातला गुरु नवीन विद्याभ्यास सुरु करण्यास पोषक आहे. शेअर्स मधील गुंतवणूक लाभेल. नवपरीणीतांना संततीचे योग आहेत. आरोग्याच्या बाबतीत विशेष काही अडचणी नाहीत. रोजचे आयुष्य आनंदाने जगा. साडेसातीतील गेली पाच वर्ष अनेक फटके खाल्ले असले तरी आता शेवटच्या टप्प्यात आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत थोडा धीर धरावा. वैवाहिक जीवन उत्तम राहील. तरुणांच्या विवाहाला कदाचित उशीर लागू शकतो. विवाहासाठी प्रयत्न चालू ठेवावेत. आपल्या मित्र मैत्रीण गोतावळ्या मधूनच आपल्याला आपला भविष्याचा साथीदार मिळू शकतो. डिसेम्बर २०२५ - जानेवारी २०२६ मध्ये एखादी पोलिसी, इन्श्युरन्स, सेव्हिंग सर्टीफिकेट मधून पैसे मिळतील. विधी, न्याय, त्वचारोग बाबतीत उच्च शिक्षण घेण्यास कालावधी अनुकूल आहे. नोकरी बाबतीत काही मोठ्या अडचणी दिसत नाहीत. लोकांना नियमित प्रमोशन मिळू शकते. व्यय स्थानचे स्वामी धन स्थानात असल्याने अनावश्यक खर्च, प्र्वासावरील खर्च वाढतील . आर्थिक व्यवहारात फसवणूक होऊ शकते. राजकारणी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोकांना एप्रिल महिना तापदायक. आपल्या राशीत फेब्रुवारीत ग्रहण होणार असल्याने ग्रहणाच्या आसपास चे १० - १२ दिवस मानसिक अस्वास्थ्य जाणवू शकेल. ऑगस्ट २०२६ मध्ये सप्तमात होणारे ग्रहण वैवाहिक जीवनात कुरबुरी करेल. एकूणच साडेसातीचा शेवटचा काळ हा शांत पणे विचारपूर्वक पावले उचलण्याचा आहे.
मीन रास :
राशीचक्रातील शेवटची रास , सात्विक, पापभिरू, माश्यांप्रमाणेच चंचल, कृतज्ञ, नम्र, हळवे, प्रपंच परमार्थ दोन्हीकडे ओढ असणारे मीन वाले बऱ्याच वेळा आपले बोलणे अगम्य किंवा द्वैअर्थी असते. आपण नकळत भाबडेपणे बोलून जातात नंतर त्यांच्या चूक लक्षात येते. म्हणून बऱ्याचदा मीन मितभाषी असू शकतात.. "मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है" या म्हणी प्रमाणे हे आपल्या कम्फर्ट झोन मध्ये उत्तम काम करतात.. कम्फर्ट झोन च्या बाहेर फारसे जात नाहीत. आगामी वर्ष हे मीन राशीस कसे जाईल ते पाहूया. राशीस्वामी गुरु चतुर्थ स्थानात आहे या कारणाने आपणास या वर्षी वाहन व वास्तू सौख्य लाभेल. धनाचा स्वामी मंगळ आपणास स्थिर आर्थिक उत्पन्न मिळवून देईल. भावंडांशी, शेजाऱ्याशी संबंध चांगले राहतील. चतुर्थात गुरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबतीत उत्तम यश मिळवून देईल . दहावी बारावी नंतरचे प्रवेश सुलभ होतील. मातृसौख्य चांगले राहील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी . ऑगस्ट २०२६ चे ग्रहण आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकते. विवाहाच्या बाबतीत जून २०२६ नंतर प्रयत्न करावेत. आपल्या मनासारखा जोडीदार मिळू शकेल जून २०२६ नंतर आर्थिक नुकसान कमी होऊन आवक वाढेल. एखादी नवीन वास्तू वाहन खरेदी होईल. सप्टेंबर २०२६ मध्ये वडिलोपार्जित संपत्तीचा काही वाटा काही लोकांना मिळू शकतो. तांत्रिक आणि यांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी आपल्या राशीच्या लोकांना कालावधी पुरक आहे. काहींना ध्यानी मनी नसताना अष्टविनायकाची यात्रा घडेल. परदेश प्रवास सुखकर होईल . जून २०२६ नंतर मनोभावे केलेली साधना फळाला येईल. सुप्त इच्छा पूर्ण होतील. लाभ वाढतील. मित्र मंडळी यांच्याकडून लाभ होतील. नोकरीत स्थैर्य असले तरी जून २०२६ नंतर नोकरी बदलाचा विचार असल्यास त्यात यश येईल. मीन राशीचे राजकारणी सामाजिक कार्यात रस असणार्यांना जून २०२६ नंतर अधिकार पद असल्यास सोडावे लागेल. दशम स्थानावर शनीची दृष्टी लोकसेवकांना काही काळ त्रासदायक ठरू शकते. साडेसातीच्या मधल्या टप्प्यावर आपली रोज घालमेल होत असावी. कधी कधी भरकटल्यासारखे होते. मनी असलेल्या योजना प्रत्यक्षात येत नाही हा साडेसातीतील सार्वत्रिक अनुभव आहे. तरी राशीत असलेल्या शनी महाराजांचा आदर करा, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात सायं बाळगा. हि आलेली साडेसाती मागच्या तीस वर्षांचे audit करण्यासाठी आली आहे असा सकारत्मक दृष्टीकोन ठेऊन वाटचाल करा. आज जरी चारही बाजूनी वेढल्यासारखे वाटत असले तरी त्याला उत्तर संयम हेच आहे. संयमानेच तुम्ही साडेसातीतून मुक्त होणार आहात.भूत्क्लात केलेल्या चुका आणि दुर्लक्ष केलेल्या गोष्टी साडेसातीत डोके वर काढतात ते मागचे अर्धवट काम पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पुढचा रस्ता सापडणार नाही. आणि नवीन कोणत्याही चुका करू नका. आपण नम्र आहातच. पण कधी संयम सुटू शकतो त्याला आवर घाला. थोडा वेळ काढून आत्मचिंतन करा. आपले गेल्या तीस वर्षातल्या कुठल्या गोष्टी अपूर्ण राहिल्यात ज्या आता अडथळा ठरत आहेत याचा मागोवा घ्या एकदा मागच्या सगळ्या अर्धवट गोष्टी मार्गी लावल्या कि मग आपणास पुढचा मार्ग प्रशस्त शनी महाराजच करतील.
|| शुभं भवतु ||
- हर्षद मोहन चाफळकर
ज्योतिष विशारद , पुणे
मोबाईल: ९७६५४१७३६१
-
जवळ जवळ तीन चार वर्ष झाले रोजच्या अनुभवातून आमचे फ्रेंड फिलॉसोफर आणि गाईड दीपक पंडीत आणि एक साधारण पाचशे एक पत्रिका डोळ्याखालून घातल्यावर मा...
-
सुप्रभात, बऱ्याच दिवसांनी काही तरी डोक्याला खाद्य मिळालं म्हणून हा ब्लॉग लिहित आहे. आणि कृष्णमूर्ती पद्धत नाही तुम्हाला आम्हाला कुठल्याही स...