Saturday, November 30, 2024

जोडगोळी

 पूर्वप्रसिद्धी : क्रिककथा दिवाळी अंक २०२४

संपादक : कौस्तुभ चाटे

१९८३ चे जसे महत्त्व भारतीय क्रिकेट मध्ये अनन्यसाधारण आहे, अगदी तसेच काहीसे २००७ चे म्हणावे लागेल. या एका वर्षात भारतीय क्रिकेट ने दुसऱ्यांदा कात टाकली. २००७ च्या वन डे वर्ल्ड कप ला  जो भारतीय संघ उतरला होता तो कुठल्याही अर्थाने लेचापेचा संघ नव्हता तरी श्रीलंका, बर्मुडा, बांग्लादेश असलेल्या गटातून तो  दिग्गज क्रिकेटपटू असलेला संघ प्राथमिक फेरीतून बाहेर पडला आणि सौरव गांगुली ने २००० सालानंतर उभ्या केलेल्या या संघात थोडा फार बदल करण्याची गरज भासू लागली. प्राथमिक फेरीतून लवकर बाहेर पडल्यामुळे भारतीय संघ चक्क दोन महीने बसून होता. विचार करायला बदल घडवण्यासाठी, क्रिकेट वर्तुळात नवीन रक्त शोधण्यासाठी व्यवस्थापनाला वेळ मिळाला होता.

भारताचा युके दौरा २००७

वर्ल्ड कप नंतर भारतीय संघाची पहिली मोठी परीक्षा भारताचा आयर्लंड, स्कॉटलंड, इंग्लंड चा दौरा होता. आयर्लंड मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन डे सामन्यांची मालिका होती. तगडा आफ्रिकी संघासमोर तुलनेने अनुभव आणि युवा चा भरणा असलेला भारतीय संघ बीसीसीआय ने उतरवला होता. भारतीय क्रिकेट ला नवीन राग - रंग द्यायचा असेल तर ही करणं गरजेचं  होत. या संघात मुंबई चा नवीन मुलगा रोहित शर्मा ही होता. रोहित शर्मा ही नाव पहिल्यांदा भारतीय क्रिकेट प्रेमींना ऐकायला मिळाले त्या आधी रोहित शर्मा  २००६ साली पीयूष चावला  च्या नेतृत्वात अंडर १९ वर्ल्ड कप खेळला होता. पण,खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर रोहित आयर्लंड च्या दौऱ्यात वन डे मध्ये दिसला. पहिल्या काही सामन्यात फारशी संधी न मिळाल्याने अजून रोहित शर्मा आजचा हिटमॅन  व्हायचा होता.

आयसीसी वर्ल्ड टी २० २००७

रोहित खऱ्या अर्थाने अवतरला तो २००७ च्या वर्ल्ड टी २० मध्ये. धोनी च्या नेतृत्वात अगदी नवखा संघ त्या स्पर्धेत उतरला होता. सचिन, द्रविड, गांगुली, झहीर, कुंबळे यांच्या शिवाय गेल्या १० वर्षात पहिल्यांदा कुठल्याही आयसीसी स्पर्धेत उतरणार होता भारतीय प्रेक्षकांनी फार अपेक्षा ही ठेवल्या नव्हत्या. स्पर्धेतल्या सुपर ८ गटात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होता, त्या एका सामन्यावर भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका  तिघांचे स्पर्धेतलं भवितव्य अवलंबून होतं. त्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताची ३ बाद ३३ अशी बिकट अवस्था झाली होती. त्यावेळी रोहित शर्मा खऱ्या अर्थाने उभा राहीला. आधी रॉबिन उत्थापा नंतर धोनी सोबत भागीदारी करून त्याने डाव नुसता सावरला नाही तर भारतीय गोलंदाजांना संधी दिली. ३ बाद ३३ वरुन ५ बाद १५३ अशी समाधानकारक धावसंख्या उभी राहिली त्याला आधार रोहीत शर्माच्या अर्ध शतकाचा होता . पुढे आफ्रिकेच्या डावात त्याने जस्टीन केम्प चा केलेला रन आऊट अजुनही नजरेसमोर तरळतो. पुढे त्याच स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात अखेरच्या काही षटकात त्याने केलेली फटकेबाजी भारताच्या  विजेतेपदात निर्णायक ठरली.   रोहित शर्मा ही नाव घरोघरी घेतलं जाऊ लागलं.

पुढची काही वर्ष रोहित शर्मा मधल्या फळीत खेळत राहील पण त्याची कारकीर्द बहरली ती  २०१३ नंतर जेव्हा त्याने सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली. रोहित शर्मा सातत्याने टी २० प्रकारात नवनवे विक्रम करत राहीला  ते अगदी २०२४ च्या त्याच्या निवृत्ती पर्यन्त. २०२२ साली रोहित शर्मा च्या नेतृत्वात टी २० वर्ल्ड  कप  मध्ये अगदी जवळ जाऊन सेमी फायनल मध्ये भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला. पण २०२४ मध्ये रोहित च्याच  नेतृत्वात भारतीय संघाने टी २० वर्ल्ड कप जिंकला. ज्या स्पर्धेमुळे आणि ज्या दक्षिण आफ्रिकेमुळे रोहित शर्माला ओळख मिळाली त्याच स्पर्धेत त्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा ने विजेतेपद मिळवून टी २० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला.

रोहित च्या टी २० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील लक्षात राहणाऱ्या आणखी काही खेळी:

1. ७९* वि ऑस्ट्रेलिया, ब्रिजटाउन २०१०

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2010 च्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये सुपर 8 च्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ने उभ्या केलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा ने एकट्याने खिंड लढवली. दुसऱ्या बाजूने विकेट पडत असताना रोहित ने 79 धावांची नाबाद खेळी केली, त्या सामन्यात भारताची इतर कोणताही फलंदाज 20 धावा करू शकला नाही  आणि  तो सामना भारताने गमावला.

2. 118 वि  श्रीलंका, इंदूर, 2017

श्रीलंका तसं रोहित च आवडतं  गिऱ्हाईक जेव्हा जेव्हा रोहित श्रीलंकेविरुद्ध खेळला हमखास चालला. असाच एक टी 20 मालिकेच्या सामन्यात श्रीलंका रोहीत च्या तडाख्यात सापडली. इंदूर इथे झालेल्या त्या सामन्यात रोहित ने लंकेच्या गोलंदाजांची तूफान धुलाई केली. 12 चौकार आणि 10 षटकारांसह केलेल्या 118 धावा लंकेच्या जिव्हारी लागल्या.

3. 92 वि ऑस्ट्रेलिया, सेंट लुशिया 2024

घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया कडून वन डे वर्ल्ड कप चा पराभावाने रोहित बेचैन होता. हातातोंडाशी आलेला वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया ने हिरवला होता. त्याचा वचपा काढायची संधी रोहित ला  2024 च्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये मिळाली होती. पहिल्यांदा बॅटिंग करताना रोहित अक्षरश: मिशेल स्टार्क वर तुटून पडला. त्याच्या एक ओव्हर मध्ये  23 रन वसूल केल्या.

रोहीत शर्माची टी २० आंतरराष्ट्रीय कारकीर्द:

सामने

धावा

सरासरी

स्ट्राईक रेट

५०/100

१५९

४२३१

३२.०

१४०.९

३२/5



जशी रोहित ची कारकीर्द 2007 च्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये सुरु झाली अगदी काहीच महिन्यानी भारतीय संघ 2007/08 च्या ऑस्ट्रेलिया च्या दौऱ्यावर कॉमनवेल्थ बँक तिरंगी मालिका जिंकत असताना एक नवीन झंझावात मलेशिया इथे सुरु असलेल्या  अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये जन्म घेत होता. इकडे ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच  एकदिवसीय मालिका जिंकण्याचा जल्लोष भारतीय क्रिकेट चाहते साजरा करत असताना विराट कोहली च्या नेतृत्वात भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. विराट कोहली या नावाची कुजबूज सुरू झाली होती. विराट ची गुणवत्ता त्याला फार काळ भारतीय संघाच्या बाहेर ठेवणार नव्हती आणि झालंही तसंच.  2008 च्या श्रीलंका दौऱ्यावर विराट कोहली ने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आणि पुढे घडलेला इतिहास भारतीय क्रिकेट रसिकांनी याची दही याची डोला पाहिला.  2009, 2010, 2011 चा वन डे वर्ल्ड कप वर्षा मागून वर्ष सरत होती आणि विराट प्रत्येक वर्षी त्याची कारकीर्द सजवत होता. कव्हर ड्राइव्ह, तंत्रशुद्ध फटके मारत विराट नावाप्रमाणे दिवसागणिक विराट होत चालला होता. त्याने एके काळी एकदिवसीय शतकांची मालिकाच लावली होती. काही काळ विराट चे शतक आणि भारताचा विजय अगदी परवली चे शब्द झाले होते.

2012 ते 2018: विराट युग

2012 च्या आपल्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिरंगी मालिकेत होबार्ट च्या मैदानावर लसिथ मलिंगा ची पिसे काढल्यानंतर क्रिकेट जगताला  विराट कोहली ची धडकी भरू लागली होती. 2012 पासून कोहली जी स्पर्धा किंवा मालिका खेळला त्यावर त्याने स्वत:ची छाप पाडली. टेस्ट, वन डे , टी 20 सगळ्या प्रकारात यत्र तत्र सर्वत्र विराट कोहली चा दबदबा होता. आयपीएल मध्ये सुद्धा त्याच्या रॉयल चॅलेंजर बंगलोर या फ्रांचायजी साठी ख्रिस गेल, विराट कोहली ए बी डिव्हिलीयर्स अक्षरश: धुमाकूळ घालत होते. 2014/15  चा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात  विराट कोहली किंग कोहली झाला. अचानक आलेलं कसोटी कर्णधार पद तोंडावर आलेला वन डे वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलिया ने कसोटी मालिकेत काढलेला घाम या सगळ्यातून कोहली तावून सुलाखून निघाला. वर्ष सरत होती आणि कोहली शतकामागुन शतके सहज करत सुटला होता. तो इतका पुढे निघून गेला की कारकीर्दीचा एका टप्प्यावर कोहली सचिन तेंडुलकर च्या 100 शतकांची बरोबरी कधी करेल यावर क्रिकेट प्रेमींमध्ये पैजा लागल्या. पण 2019 च्या वन डे वर्ल्ड कप नंतर विराट कोहली च्या फॉर्म ला ग्रहण लागलं आणि गंमत म्हणून शतके करणारा विराट कोहली ला कधी कधी दोन  आकडी धावसंख्या ही हुलकावणी देऊ लागली.

2022: रिटर्न ऑफ द किंग:

2019 च्या अखेरी पर्यन्त कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये तब्बल 70 शतके झाली होती. पण त्यानंतर एकाहत्तरावे शतक यायला खूप वाट पहावी लागली. 2022 साली होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप आधी संयुक्त अरब अमिराती मध्ये टी 20 आशिया कप झाला. वर्ल्ड कप ची  तयारी म्हणूनच त्याकडे पाहिलं गेलं. त्या आशिया कप स्पर्धेत तब्बल चार वर्ष विराट कोहली वर रुसून बसलेला त्याचा बॅटिंग फॉर्म परतला. अफगाणिस्तान विरुद्ध च्या साखळी कोहली ला  फॉर्म गवसला आणि ते सातत्याने हुलकावणी देणारे एकाहत्तरावे शतक अखेर त्या सामन्यात झाले. त्या दिवशी विराट कोहली च्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासरखे होते. एकदाचे ते एकाहत्तराव्या शतकाचे भूत मानगुटीवरून उतरल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट  दिसत होतं. त्यानंतर कोहली ने परत मागे वळून पाहिले नाही. पुन्हा एकदा शतकांची गाडी सुरू झाली. हा लेख लिहीत असताना  80 आंतरराष्ट्रीय शतके  त्याच्या नावावर आहेत.

विराट च्या टी २० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील लक्षात राहणाऱ्या आणखी काही खेळी:

1. 82* वि पाकिस्तान, मेलबर्न 2022

2021 साली संयुक्त अरब अमिराती मध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाच्या जखमा अजूनही ताज्या होत्या. मेलबर्न सारख्या भरगच्च मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान ब्लॉकबस्टर ठरण्याची सगळ्यांनाच अपेक्षा होती. भारताने पहिल्यांदा गोलंदाजी करून पाकिस्तान 159/8 अश्या आवाक्यातल्या धावसंख्येवर रोखलं. 160 धावांचे लक्ष मेलबर्न च्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना फारसे अवघड जायला नको  होतं पण, नियतीने असे काही डाव खेळले की त्या धावांचा पाठलागाचा कर्ता करविता कोहली झाला. सगळे आघाडी चे फलंदाज बाद होऊन तंबूत परतले होते. 10 षटकात जेमतेम 60 धावा झाल्या होत्या आणि हार्दिक पांड्या आणि कोहली पाकिस्तान चा तोफखाना परतवून लावत होते. सामना इतका उत्कंठेला पोहोचला की 8 बॉल मध्ये 28 धावा गरजेच्या असताना कोहली, विराट झाला. समोर हारिस  रौफ 150 च्या स्पीड ने गोलंदाजी करत होता आणि.. भारतीय क्रिकेट इतिहासातील ते दोन अजरामर बॉल टाकले गेले. 18.5 आणि 19.0 हे दोन बॉल भारतीय क्रिकेट इतिहासात दंतकथा झाले. कॉमेंटरी मध्ये हर्षा भोगले चे ते शब्द Kohli goes down the ground, kohli goes out of the ground क्रिकेट रसिकांच्या कानात आजही ताजे आहेत. भारताने तो सामना शेवटच्या बॉल वर जिंकला आणि 2021 फ्लूक असल्याचे दाखवून दिले.

2. 82* वि ऑस्ट्रेलिया, मोहाली 2016

2016 च्या टी 20 वर्ल्ड कप मधली सुपर 10 मधला तो सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो चा होता. हरणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार होता. ऑस्ट्रेलिया ने पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतासमोर 160 धावांचे आवाहन ठेवले होते. धावांचे पाठलाग सुरू असताना आठव्या षटकात 3 बाद 49 असा येऊन सामना निर्णायक टप्प्यावर फसळा होता. गरज होती शांत संयमी खेळीची. कोहली ने संधी साधली आधी युवराज सिंग मग महेंद्रसिंग धोनी ळा बरोबर घेत ऑस्ट्रेलिया ला मायदेशाचे तर भारताला सेमी फायनल चे तिकीट काढून दिले. 2016 साली तसंही विराट आपल्या यशाच्या शिखरावर होता.

3. 74* वि दक्षिण आफ्रिका, ढाका 2014

2014 च्या टी 20 वर्ल्ड कप ची ती सेमी फायनल होती. आफ्रिकेच्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेस मास्टर विराट कोहली पुन्हा एकदा उभा राहीला. सुरेश रैना सोबत महत्त्वाची भागीदारी करून आफ्रिकेला त्यांच्या पहिल्या अंतिम फेरी पासून दूर ठेवलं. 

4. 76 वि दक्षिण आफ्रिका, ब्रिजटाउन 2024

विराट कोहली, रोहित शर्मा दोघांचाही हा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप होता. दोघांनाही त्याची पुरेपूर जाणीव होती. भारत आणि आफ्रिका दोन्ही संघ अंतिम सामन्यात अपराजित आले होते. या दिवशी कोणतातरी एक संघ नक्की हरणार होता. आफ्रिका 1998 नंतर पहिल्यांदाच कुठल्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचलं होतं. ते इतिहास पुसायला निघाले होते तर भारत गेल्या एका कॅलेंडर वर्षातले तिसरी फायनल खेळत होता. विराट कोहली या स्पर्धेत येताना त्याच्या स्ट्राईक रेट साठी प्रचंड ट्रोल झाला होता आणि स्पर्धेत ही अंतिम सामन्यात येईपर्यंत 8 सामन्यात केवळ 70 च्या आसपास धावा केल्या होत्या. कोहली सलामीला यायचा अट्टहास का करत आहे ? असाही प्रश्न क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट पंडित विचारत होते. पण आपण शेवटचा  टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहोत ही कोहली  ला पक्क माहीत होतं. भारताने पहिली बॅटिंग केली. रोहित, पंत, सूर्यकुमार यादव  लवकर बाद झाले. कोहली ने अक्षर पटेल, शिवम  दुबे या नवख्या खेळाडूंना हाताशी घेऊन डाव सावरायला घेतला. 59 चेंडूत 76 धावा करत भारतीय डाव 176/7 सारख्या आवाहनात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवला. कोहली च्या कष्टाचं गोलंदाजांनी सोनं केलं आणि भारताने 13 वर्षांचा वर्ल्ड कप चा दुष्काळ संपवला.

विराट कोहली ची टी 20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द:

सामने

धावा

सरासरी

स्ट्राईक रेट

५०/100

125

4188

48.69

137.04

38/1



रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप च्या विजेतेपदासह क्रिकेटचा टी 20 प्रकराला राम राम केला. आणि अश्या रीतीने भारतीय टी 20 संघातली 1980 ची पिढी संपली. गेली दीड दशक दोघांनी ही भारतीय क्रिकेटला टी 20 मध्ये अनेक आठवणी दिल्या. पुढील आणखी काही वर्ष रोहित आणि विराट वन डे आणि कसोटी खेळताना दिसतील,त्याचा आनंद क्रिकेट रसिक घेतील.

-         हर्षद मोहन चाफळकर

वडगावशेरी, पुणे- 411014

मोबाईल: 9765417361  

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला