Friday, June 30, 2023

२००५: एशेस चं प्लॅटिनम स्टँडर्ड


उद्या शुक्रवार 16 जून 2023 पासून या सहस्त्रकातील इंग्लंड मधली सहावी एशेस मालिका सुरू होईल. कसोटी इतिहासातील सर्वात जुनी किंवा आद्य म्हटली तरी चालेल अशी एशेस ची ख्याती आहे. ही मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दर दोन वर्षांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात खेळवली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया च्या खेळाडूंना सर्वात प्रतिष्ठेची कुठली मालिका असेल तर ती एशेस आहे.. अशीच एक मालिका इंग्लंड मध्ये २००५ साली खेळली गेली होती.. त्या संबंधी च्या आठवणी नव्या एशेस च्या पूर्वसंध्येला जागवूया...


पार्श्वभूमी: २००५ चा ऑस्ट्रेलियन संघ हा तत्कालीन क्रिकेट चा अनभिषिक्त सम्राट होता.. त्या संघात अकरा खेळाडू नव्हे तर अकरा मॅच विनर खेळायचे.. प्रत्येक जण आपल्या दिवशी एक हाती मॅच जिंकवायचा. या संघाने स्टीव्ह वॉ ने ठरवलेले भारतीय भूमीवरचे फायनल फ्रँटियर नुकतंच ऑक्टोबर २००४ मध्ये काबीज केलं होतं. समोर येईल त्या संघाला नामोहरम करायचं हा एक कलमी कार्यक्रम या संघाने राबवला होता... स्टीव्ह वॉ कडून कसोटीची सुत्र रिकी पॉंटिंग कडे आली होती. हेडन, लँगर, पॉंटिंग, क्लार्क, मार्टिन, गिलख्रिस्ट, कासप्रॉव्हिच, वॉर्न, ब्रेट ली, माकग्रा, गिलेसपी हे अकरा जण सहज मॅच जिंकायचे.. कधी कॅटीच अधून मधून खेळायचा..
इंग्लंड दुसऱ्या बाजूला उर्जितावस्था गाठत होती.. हुसेन,  रामप्रकाश, आलेक स्टुअर्ट, कॅडिक ही पिढी जाऊन आता कमान मायकल वॉन कडे आली होती..
सायमन जोन्स, मॅथ्यू होगार्ड, स्टीव्ह हार्मीसन, फ्लिन्टऑफ यांच्या जोडीला एकटा आश्ले जाईल्स स्पिनर... इंग्लंड ची बॅटिंग मुख्यत्वे करून ट्रेसकोथिक, स्ट्रोस, इयन बेल, मायकल वॉन, पिटरसन, फ्लिन्टऑफ यांच्यावर होती..

लोर्ड्स ची शरणागती:  मालिकेतील पहिला सामना सुरू झाला क्रिकेटची पंढरी लोर्ड्स वर.. इंग्लंड च्या माध्यमांनी ऑस्ट्रेलिया वर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली.. पण पहिल्या दिवशी चहापानानंतर इंग्लंड चा पहिला डाव आटोपला आणि ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून पलटवार केला..
पहिल्याच दिवशी माकग्रा ने कसोटीत ५०० बळी पूर्ण केले आणि संपूर्ण मालिकेत आपलेच वर्चस्व राहील याची नोंद इंग्लंड ला घ्यायला लावली..

एजबस्टन पुराण: सध्याच्या काळात एकही कसोटी क्रिकेट प्रेमी नसेल ज्याला एजबस्टन २००५ म्हटलं की अंगावर काटे येणार नाहीत.. सामनाच तसा झाला होता.. कसोटीच्या नाणेफेकी आधी माकग्रा दुखापती मुळे बाहेर झाला आणि ऑस्ट्रेलिया ची बॉलिंग काहीशी कमकुवत झाली.. त्याचा फायदा घेत इंग्लंड ने पहिल्या डावात 407 धावा केल्या ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 99 धावांनी पिछाडी वर पडला आणि इंग्लंड च्या दुसऱ्या डावात संपूर्ण इंग्लंड चा संघ ब्रेट ली (४ बळी)आणि शेन वॉर्न (६ बळी) ने वाटून खाल्ला.. सामना इथे संपत नाही.कसोटी क्रिकेटची खरी झिंग इथून सुरू होते.. चौथ्या दिवसाच्या चहापाना आधी ऑस्ट्रेलिया चा दुसरा डाव सूरु होतो.. विजयासाठी २८२ धावा हव्या असतात.. उपलब्ध वेळ, फलंदाजी ची खोली पाहून सगळ्यांना खात्री असते की ऑस्ट्रेलिया ही मॅच सहज जिंकणार.. चहापाना नंतर नाट्यमय घडामोडी घडतात.. हेडन, लँगर,  पॉंटिंग, मार्टिन, गिलख्रिस्ट एका पाठोपाठ एक बाद होत जातात.. दिवसाची शेवटची ओव्हर टाकायला हारमिसन आलेला असतो स्ट्राईक ला मायकेल क्लार्क.. नॉन स्ट्राईक ला शेन वॉर्न.. हारमिसन च्या हातून अलगद बॉल सुटतो क्लार्क चकतो.. आणि बोल अलगद जाऊन स्टंप वर आदळतो... संपूर्ण इंग्लंड जल्लोष करत असतं.. कारण त्यांना माहीत होतं की उद्या फक्त शेवटचे फलंदाज बाद केले की मालिकेत बरोबरी साधता येईल आणि १७-१८ वर्षांनी घरच्या मैदानावर एशेस मालिका जिंकण्याचं स्वप्न जीवंत राहील.. रात्र सरते आता फक्त शेन वॉर्न, ब्रेट ली, कासप्रॉव्हिच राहिले...
शेवटचा दिवसाचा खेळ सूरु होतो.. ब्रेट ली आणि शेन वॉर्न खिंड लढवत राहतात.. वॉर्न कधी नव्हे ते त्वेषाने खेळत दिसेल तो बॉल मारत सुटतो.. हा त्याचा जुगार ऑस्ट्रेलिया विजया पासून १२ धावा दूर असताना संपतो.. कासप्रॉव्हिच ब्रेट ली ला साथ द्यायला येतो.. ब्रेट ली दोन खणखणीत चौकार मारतो विजय ४ धावा दूर असतो.. पुढच्या ओव्हर ला स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी ब्रेट ली एक धाव घेतो आणि कासप्रॉव्हिच स्ट्राईक ला येतो.. विजय ३ धावा दूर.. स्टीव्ह हार्मीसन चा  पुन्हा एक उसळता बॉल कासप्रॉव्हिच च्या खांद्याकडे जातो.. बॉल ग्लोव्हज ची किनार घेऊन किपर गेरायन्त जोन्स च्या ग्लोव्हज मध्ये विसावतो आणि पाच दिवस सूरु असलेली तुंबळ लढाई अखेर दोन धावांचा अंतराने इंग्लंड च्या पदरी पडते.. It's coming home चा जल्लोष सुरू होतो.. आणि मालिका ओल्ड ट्राफर्ड कडे सरकते..

ओल्ड ट्राफर्ड ची समेट: एजबस्टन च्या झिंगातून ना इंग्लंड सावरलेले असते ना क्रिकेट प्रेमी तो ज्वर ती नशा अजूनही लोकांच्या डोक्यात असते.. मँचेस्टर च्या ओल्ड ट्राफर्ड वर हाय स्कोरिंग ड्रॉ खेळला जातो.. मायकेल वॉन, अँड्र्यू स्ट्रोस, रिकी पॉंटिंग शतके करतात.. मॅच ड्रॉ होते... मालिका ट्रेंटब्रिज ला पोहोचते..

ट्रेंटब्रिज ची आघाडी: एजबस्टन चा विजय, ओल्ड ट्राफर्ड ची समेट झाल्यानंतर शेवटच्या दोन कसोटीत आघाडी कोण घेणार यासाठी ट्रेंटब्रिज ची कसोटी महत्त्वाची ठरणार होती.. पहिल्या डावात इंग्लंड ४४४, ऑस्ट्रेलिया २१८. मायकेल वॉन ने ऑस्ट्रेलिया ला फॉलो ऑन दिला.. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया ३८७ धावा करते आणि इंग्लंड ला शेवटच्या डावात मालिकेत आघाडी घेण्यासाठी हव्या असतात फक्त १२९ धावा.. ऑस्ट्रेलिया त्या १२९ धावातील प्रत्येक धाव मिळवणे कठीण करते.. शेवटच्या दिवसाच्या खेळपट्टीवर शेन वॉर्न खेळणे केवळ अशक्य होतो...
३२ धावा असताना वॉर्न ट्रेसकोथिक ला माघारी धाडतो.. ३६ ला वॉन, ५७ ला , ५७ ला इयन बेल.. ३२/० वरून ५७/४ इंग्लंड च्या छाताडत धडकी भरते.. समोर ती एशेस ची कुपी दिसत असते पण हाताला अजून लागत नाही.. केविन पिटरसन ५७ चा स्कोर १०३ पर्यंत नेतो आणि ब्रेट ली ची शिकार होतो.. फ्लिन्टऑफ चा अडसर ब्रेट ली दूर करतो इंग्लंड साठी अजूनही विजय १८ धावा दूर असतो.. गेरायन्त जोन्स एक दोन फटके मारून अंतर कमी करतो असाच एक फटका मारताना तो वॉर्न च्या आमिषाला बळी पडतो.. विजय अजूनही १२ धावा दूर.. मैदानात आता फक्त जाईल्स आणि होगार्ड..
ब्रेट ली च्या पायात स्प्रिंग असल्यासारखा तो धावत सुटतो एक बॉल त्याच्या कडून फुल टॉस सुटतो होगार्ड नावाला जोरात येणाऱ्या बॉल ला मध्ये बॅट घालून दिशा देतो आणि बॉल गॅप मधून सीमेपार.. दुसरा बॉल पुन्हा ब्रेट ली भरकटतो.. लेग साईड वरून बॉल सीमे कडे जातो.. जिंकण्यासाठी आता फक्त ४ धावा पाहिजे असतात.. स्ट्राईक ला जाईल्स.. वॉर्न बॉलिंग करत असताना त्या ओव्हर मध्ये जाईल्स दोन चकतो.. दुसऱ्या वेळी कॅमेरा गॅलरीत बसलेल्या मायकल वॉन कडे जातो.. त्याच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात.. इलेक्ट्रॉनिक स्कोर बोर्ड वेळोवेळी ४ धावा दाखवत राहतो.. शेन वॉर्न च्या ओव्हर चा शेवटचा बॉल फुल टॉस जातो.. जाईल्स ऑन साईड ला बॉल ढकलत विजयला गवसणी घालतो.. सबंध इंग्लंड जल्लोषात नहातं.. दशकानंतर इंग्लंड ने एशेस मालिकेत पहिल्यांदाच आघाडी घेतली असते...
 आता एशेस वाचवायचा म्हणजे ऑस्ट्रेलिया ला ओव्हल वर विजय अनिवार्य असतो...

ओव्हल ची औपचारिकता: चार सामन्यात घमासान तुंबळ लढाई झाल्यानंतर मालिका ओव्हल वर पोहोचते.. दोन्ही संघांचे उद्दिष्ट स्पष्ट असतात.. ऑस्ट्रेलिया ला जिंकायचंच आहे.. इंग्लंड ला अनिर्णित राहणे पुरेसे आहे.. इंग्लंड ३७३, ३३५ ऑस्ट्रेलिया ३६७, ४/० मालिका जिंकण्याची संधी समोर दिसत असताना दुसऱ्या डावात केविन पीटरसन ऑस्ट्रेलिया वर तुटून पडतो.. शेवटच्या दिवशी शेवटच्या तासात इंग्लंड चा डाव संपून हेडन- लँगर ही जोडी खेळायला येऊन ४/० असताना दोन्ही संघात हस्तांदोलन होते आणि सामना अनिर्णित राहतो आणि इंग्लंड चे एशेस जिंकण्याचे स्वप्न साकार होते... It's coming home चं आता It has come home.. होतं.. हा विजय इंग्लंड जवळ जवळ महिनाभर साजरा करत  राहतं...
ऑस्ट्रेलिया मात्र वाट पाहत असते ती २००६/०७ च्या एशेस मालिकेची...

 हर्षद मोहन चाफळकर, पुणे

WTC ची अग्निपरीक्षा


आयपीएल चा धामधूम संपला.. आडवे बॅटीचे फटके संपले.. आता क्रिकेट इन व्हाईट्स चा सिझन इंग्लंड मधून सुरू होणार.. त्याचा श्रीगणेशा WTC च्या फायनल ने होईल.. याच WTC फायनल चे केलेले पूर्वावलोकन...

फायनल ची पार्श्वभूमी: रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, महंमद शमी, स्टीव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर या साऱ्यांची ही कदाचित शेवटची WTC फायनल असेल या पुढची WTC फायनल 2025 ला संपते तोपर्यंत या दिग्गजांमधले किती जणं खेळत असतील याबाबत माझ्या मनात शंका आहे.. हे सगळे दिग्गज आपल्या कारकिर्दीच्या उताराकडे झुकले आहेत..
त्यामुळे यातील प्रत्येक जण आपल्या कौशल्याची पराकाष्ठा करून ही WTC जिंकण्याचा प्रयत्न करेल..

 दोन्ही संघांची तयारी: WTC च्या फायनल ला पोहोचताना दोन्ही भारत आणि ऑस्ट्रेलिया ने साखळी स्पर्धेत उत्तम कामगिरी केली ऑस्ट्रेलिया ने घरच्या मैदानावरील तिन्ही मालिका जिंकल्याच त्याशिवाय पाकिस्तान, भारतात ही कसोटी विजय मिळवले..
भारताने इंग्लंड, बांगलादेश, आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी विजय मिळवले पण बांगलादेश वगळता इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत मालिका विजय दूर राहिला.. घरच्या मैदानावरील श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्ध च्या मालिका जिंकल्या..

 इंग्लंड चे हवामान: WTC फायनल होत असलेल्या इंग्लंड मधील हवामान लहरी असते.. क्षणात पाऊस, क्षणात ऊन असे हवामान असल्याने एक एक सेशन मध्ये सामन्याचा कल बदलू शकतो..
WTC फायनल च्या दिवसात पावसाची शक्यता सध्या जरी दिसत नसली.. तरी इंग्लंड मध्ये मेघ नभांवर कधीही आक्रमण करतात.. त्यामुळे खेळपट्टी ताजी राहिली तर बॉल हवेत आणि पिच दोन्ही वर हलतो.. फायनल होत असलेल्या ओव्हल चा स्क्वेअर मोठा आहे त्यामुळे मैदान मोठं असले तरी बॉल लवकर सीमेपार जाऊ शकतो.. सामन्यासाठी ICC ने राखीव दिवस ठेवला आहे, पण सामना सहाव्या दिवसापर्यंत जाईल असे वाटत नाही..

संभावित प्लेइंग ११*:
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, अलेक्स केरी(यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, मिचेल स्टार्क,  स्कॉट बोलन्ड,  जोश हेझलवूड, नॅथन लायन.
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के एस भरत(यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, महंमद शमी, महंमद सिराज, उमेश यादव..
* दुखापत वगळता

मेक ओर ब्रेक संधी: शुभमन गिल ने पदार्पण केल्यापासून फारसे निराश केलेले नाही.. पण कसोटी क्रिकेट मध्ये दोन- तीन नर्व्हस नाईनटीज मध्ये बाद झाल्यानंतर आता शतके करू लागला आहे.. करियर च्या सुरुवातीला इतकी चांगली संधी मागून मिळत नाही.  WTC सारख्या मोठ्या स्पर्धेत चमकदार कामगिरी कायम स्मरणात राहते..
फर्स्ट चॉईस रिषभ पंत जायबंदी झाल्यापासून आणि आणखी एक दीड वर्ष तो मैदानावर येणार नसल्याने किमान कसोटी संघात जागा पक्की करण्याची सुवर्ण संधी के एस भरत आणि ईशान किशन साठी चालून आली आहे.. WTC सारख्या मोठ्या व्यासपीठावर जर हे दोघे चमकले तर या दोघांची नावे भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली जातील.. उलटपक्षी कामगिरी न झाल्यास बाजूला पडलेला साहा, एव्हर वेटिंग सॅमसन सारख्याना पुन्हा संघाचे दरवाजे उघडले जातील...


बॅटल विदिन बॅटल: गिल, पुजारा, कोहली, रहाणे हे फॉर्मात असले तरी काळजीचे कारण कर्णधार रोहित शर्मा होऊ शकतो.. त्याचा फॉर्म आणि फिटनेस दोन्ही किमान ते सहा दिवस नीट राहणं भारतासाठी अत्यंत गरजेचे आहे.. लोवर बॅटिंग ऑर्डर मध्ये जडेजा, ठाकूर यांच्याकडून 50-60 धावांची भर पडेल अशी आशा करायला हरकत नाही.. बॉलिंग मध्ये मुख्य मदार शमी- सिराज या  जोडीवर राहील त्यांना साथ  द्यायला यादव-ठाकूर-जडेजा या त्रिकुट असतील..
ऑस्ट्रेलियात वॉर्नर, ख्वाजा, स्मिथ, लाब्युशेन ही चौकडी दोन्ही डावात लवकर बाद करणे भारताच्या दृष्टीने उत्तम राहील.. बॉलिंग मध्ये दोन्ही डावात हेझलवूड, स्टार्क, कमिन्स, बोलन्ड यांना लवकर विकेट न फेकणे अतिशय महत्त्वाचे राहील.. दोन्ही डावात दोन्ही संघात ओपनर ची भूमिका कळीची राहील कारण, दोन्ही संघांचा बॉलिंग अटॅक बॅलन्स वाटतो.

दशकाची प्रतीक्षा: भारताने शेवटची ICC ट्रॉफी जिंकली ती इंग्लंड मध्येच 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी!! त्याला जवळ जवळ दशक उलटलं.. त्यावेळी 4G नव्हतं, मोदी राष्ट्रीय स्तरावर आले नव्हते, काँग्रेस सत्तेत होती, सोशल मिडिया आजच्या इतका फोफावला नव्हता.. बराच काळ लोटून गेला..
इंतेहा हो गयी.. मधल्या काळात रोहित शर्मा जगातील सर्वोत्तम ओपनर झाला.. शिखर धवन चं करियर सुरू होऊन जवळजवळ संपलं... या वर्षी ही दशकाची प्रतीक्षा संपेल अशी प्रत्येक क्रिकेट प्रेमीची आशा असेल..

हर्षद चाफळकर, पुणे

Saturday, June 24, 2023

शेवटच्या ICC ट्रॉफी ची दशकपूर्ती

आजच्याच दिवशी 2013 साली भारतीय संघाने इंग्लंड च्या कार्डिफ च्या मैदानावर इंग्लंड ला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी  दुसऱ्यांदा जिंकली त्या विजयाची आज दशकपूर्ती त्यानिमित्ताने जागवलेल्या आठवणी आणि त्या विजयाची वैशिष्ठ्ये..
भारतीय संघ 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी इंग्लंड ला पोहोचला तो तसं म्हटलं तर अगदी नवखा आणि काही अनुभवी खेळाडू सोबत घेऊन पोहोचला होता.. 2011 च्या विश्वचषक विजयानंतर फारसे चांगले मालिका विजय हाती लागले नव्हते.. कित्येक वर्षांनि भारताने भारताच्या भूमीवर इंग्लंड कडून कसोटी मालिका 2012 साली गमावली होती.. आयपीएल चा ज्वर कमी होऊन भारतीय संघ त्या स्पर्धेत खेळायला उतरला होता..
धोनी(कर्णधार, यष्टीरक्षक), अश्विन, जडेजा, कार्तिक, धवन, रोहित शर्मा, मुरली विजय, विराट कोहली, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, इरफान पठाण, सुरेश रैना, उमेश यादव, अमित मिश्रा, विनय कुमार हा भारतीय संघ होता..

याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ठ म्हणजे या संघात दोन वर्षांपूर्वी वर्ल्ड कप जिंकणारे सेहवाग, सचिन, युवराज, झहीर, हरभजन सारखे रणधुरंधर नव्हते सचिन एकदिवसीय प्रकारातून रिटायर झाला होता, हरभजन, सेहवाग,झहीर यांना निवड समिती ने या संघात स्थान दिले नाही, युवराज कॅन्सर च्या आजारातून उभारी घेत होता...
या संघाचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे या संघात महेंद्र सिंग धोनी सोडला तर सगळे खेळाडू तिशी च्या आतले होते म्हणजे सरासरी या संघाचे वय 27 च्या आसपास होते...
संघाची निवड पाहता बहुतेक जणांना आपण सेमी फायनल गाठली तरी पुरे अशी आशा होती.. 

भारतीय संघाच्या गटात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज असे चार संघ होते.. एकदा दक्षिण आफ्रिका पार केलं की सेमी फायनल मध्ये आपला एक पाऊल पोहोचले अशी सगळ्यांना कल्पना होती...
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पहिला सामना बलाढ्य दक्षिण आफ्रिका बरोबर.. सलामी अगदी नवखी रोहित- शिखर ची जोडी.. कोणालाही आशा नव्हती समोर स्टेन, मोरकेल, सोत्सोबे अशी आग ओकणारी फौज..
शिखर- रोहित च्या आश्वासक बॅटिंग ने आपण 331 धावा केल्या शिखर धवन ने शतक ठोकले आणि आपण आफ्रिकेचा पेपर 26 रनानी पास झालो..

दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध,

जॉन्सन चार्ल्स च्या 60 धावांचा जोरावर वेस्ट इंडिज 230 पर्यंत पोहोचली आणि शिखर धवन ने स्पर्धेतल आणि करियर चे सलग दुसरे शतक साजरे करून भारतीय संघ सेमी फायनल मध्ये नेला...

साखळी मधला शेवटचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर,

आता पर्यंत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला असल्याने कोणताही दबाव न घेता पाकिस्तान विरुद्ध सहज खेळला.. दुसरीकडे पाकिस्तान पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामन्याच्या दबावाखाली येऊन केवळ 165 धावा करून गारद झाला.. पावसाच्या व्यत्ययाने भारतीय संघ डकवर्थ लुईस च्या नियमाच्या आधारे सलग तिसरा सामना जिंकून गटात अव्वल ठरून उपांत्य फेरीत पोहोचला..

उपांत्य फेरीत शेजारी श्रीलंका: या आधी भारत- श्रीलंका उपांत्य सामना झाला होता तेव्हा भारतीय संघाला 1996 च्या वर्ल्ड कप मध्ये लाजिरवण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.. विनोद कांबळी चा रडवेला चेहरा आजही सगळ्यांना आठवतो...
श्रीलंका रडत खडत 181 पर्यंत पोहोचली.. भारताने परत एकदा निवांत पणे 182 चे लक्ष्य शिखर धवन च्या अर्ध शतकाच्या जोरावर पार केले आणि इंग्लंड बरोबर फायनल निश्चित केली...


23 जून 2013, सोफिया गार्डन्स, कार्डिफ, इंग्लंड: इंग्लंड ला अजून आजच्या बॅझबॉल चा स्पर्श व्हायचा होता.. ते अजूनही नव्वद च्या दशकातले वन डे क्रिकेट खेळत होते. पारंपरिक टेस्ट क्रिकेट चे पाईक कुक, ट्रोट, बेल,  ही त्यांची बॅटिंग लाईन अप आणि ब्रॉड अँडरसन, ट्रेमलेट हे लाल ड्युक चे दिग्गज बॉलिंग करत होते.. 2011 च्या वर्ल्ड कप मध्ये बांगलादेश आयर्लंड कडून हरल्यानंतर इंग्लंड ची नाचक्की झाली होती, पण अजूनही 2015 च्या वर्ल्ड कप ची बांगलादेश च्या हातून पराभव व्हायची नामुष्की बाकी होती.. इयॉन मॉर्गन चा कॅप्टन मॉर्गन व्हायचा होता...
अंतिम सामन्याच्या दिवशी पाऊस असल्याने सामन्याला उशिरा सुरुवात झाली  दिवसभर पिरपीर पाऊस पडल्याने सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू झाला .50 ओव्हर चा सामना 20 ओव्हर वर आला, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून बॅटिंग केली आधी धवन कोहली आणि  शेवटी जडेजा यांच्या फटकेबाजी ने  भारतीय संघ 129/7 अश्या समाधान कारक धावसंख्ये पर्यंत पोहोचला..
बेल, बोपारा, ट्रॉट, यांनी सामना इंग्लंड च्या दृष्टीक्षेपात आणला होता... इंग्लंड च्या डावाची 18वी ओव्हर, मॉर्गन, बोपारा चांगले सेट होऊन खेळत होते.. इंग्लंड ला जिंकण्यासाठी 20 रन पाहिजे असताना धोनी ने इशांत शर्माच्या हाती बॉल दिला, त्या दिवशी इशांत ची बॉलिंग तितकीशी चांगली झाली नव्हती तरी सुद्धा धोनी ने इशांत शर्माला ओव्हर दिली..
पहिला बॉल.. wd
दुसरा बॉल.. 6
तिसरा बॉल.. 1w
चौथा बॉल 1w
पाचवा बॉल.. W (मॉर्गन)
सहावा बॉल W (बोपारा)

दोन्ही सेट बॅट्समन लागोपाठ बाद झाल्याने सामन्याचे पारडे फिरले...

एकोणिसाव्या ओव्हर मध्ये जडेजा ने बटलर आणि ब्रेसनन ची विकेट काढली आणि उरली सुरली इंग्लंड ची आशा आणखी धूसर केली..

शेवटच्या ओव्हर साठी अश्विन च्या हाती बॉल इंग्लंड ला जिंकण्यासाठी 15 धावा स्ट्राईक ला स्टुअर्ट ब्रॉड..

पहिला बॉल .
दुसरा बॉल 4
तिसरा बॉल 1
चौथा बॉल 2
पाचवा बॉल 2
शेवटच्या बॉल ला इंग्लंड ला जिंकण्यासाठी 6 धावा हव्या होत्या.. ट्रेडवेल च्या हाती बॅट सिक्स आणि इंग्लंड चॅम्पियन, दुसरं काहीही झालं तर भारत चॅम्पियन..
अश्विन ने बॉल थोडा हवेत ठेऊन ऑफ स्टंप वर बॉल ठेवला ट्रेडवेल च्या स्वीप मधून बॉल सुटला धोनी ने बॉल अडवला आणि आजतागायत भारतीय संघाने शेवटची ट्रॉफी त्या क्षणी जिंकली... भारतीय संघाने 11 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली महेंद्र सिंग धोनी आयसीसी च्या सगळ्या ट्रॉफी जिंकणारा पहिला कॅप्टन बनला...

ठळक नोंदी:
1. या स्पर्धेने रोहित शर्मा चे करियर ओपनर म्हणून सेट केले पुढे 5-6 वर्ष शिखर- रोहित जोडी ओपनिंग करत राहिली.. 
2. शिखर धवन आणि आयसीसी स्पर्धेतील त्याचा फॉर्म ही दंतकथा  झाली.  
3.भारतीय गोलंदाजी झहीर च्या सावली तुन बाहेर पडून स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करत होती.. सचिन शिवाय भारताची ही पहिली आयसीसी स्पर्धा होती...
4. भुवनेश्वर कुमार हा प्युअर स्विंग बॉलर गवसला..
5. रवींद्र जडेजा नावाचा अष्टपैलू सिद्ध झाला...

- हर्षद चाफळकर, पुणे

Pls use attached image,

Thank you!!!

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला